मतदारांपर्यंत ‘व्होटर्स स्लीप’ पोहोचल्याच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:41 AM2019-04-12T00:41:54+5:302019-04-12T00:42:57+5:30

प्रशासनाने प्रत्येक मतदारांच्या घरी व्होटिंग स्लीप पोहोचविण्याचा निर्णय घेतला होता. नियमानुसार मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी स्लीप मतदारांपर्यंत पोहोचविणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. बहुतांश मतदान केंद्रावर व्होटिंग स्लीपचे गठ्ठे पडून असल्याचे पाहायला मिळाले. काही केंद्रांवर कर्मचारी वेळेवर मतदारांना व्होटर्स स्लीप देत होते. हा सर्व प्रकार पाहून निवडणूक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Voters' slips has not reached the voters | मतदारांपर्यंत ‘व्होटर्स स्लीप’ पोहोचल्याच नाहीत

मतदारांपर्यंत ‘व्होटर्स स्लीप’ पोहोचल्याच नाहीत

Next
ठळक मुद्देमतदान केंद्रांवर होत्या पडून : कर्मचाऱ्यांनी वेळेवर वितरित केल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रशासनाने प्रत्येक मतदारांच्या घरी व्होटिंग स्लीप पोहोचविण्याचा निर्णय घेतला होता. नियमानुसार मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी स्लीप मतदारांपर्यंत पोहोचविणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. बहुतांश मतदान केंद्रावर व्होटिंग स्लीपचे गठ्ठे पडून असल्याचे पाहायला मिळाले. काही केंद्रांवर कर्मचारी वेळेवर मतदारांना व्होटर्स स्लीप देत होते. हा सर्व प्रकार पाहून निवडणूक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सूत्रांच्या मते, शहरात किमान १५ टक्के मतदारांपर्यंत प्रशासनाने व्होटिंग स्लीप पोहोचविली आहे. विशेष म्हणजे यावेळी प्रशासनानेच व्होटिंग स्लीप पोहोचविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राजकीय पक्षांनीसुद्धा या कामामध्ये फारशी तत्परता दाखविली नाही. ही स्लीप मतदारांसाठी सोयीची होती. कारण यात मतदान कुठे करायचे आहे. मतदाराचा क्रमांक, मतदार यादीचा क्रमांक, अनुसूची क्रमांक दिलेला होता. लोकमतला बऱ्याच मतदान केंद्रांवर मतदार सुचीचे गठ्ठे पडलेले दिसले. बहुतांश केंद्रांवर हीच अवस्था होती. गोधनी रोडवरील गुरुकुंज कॉन्व्हेंटवरील केंद्रावर मतदार गठ्ठ्यांमध्ये आपली स्लीप शोधत होते. येथील जबाबदार कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाने एक दिवसापूर्वी म्हणजे बुधवारी या स्लीप उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. एकीकडे ‘ऑनलाईन’ शोधामध्ये नाव सापडत नसताना मनपा प्रशासन व राजकीय पक्षांकडूनदेखील अनेक मतदारांच्या घरी ‘व्होटर स्लीप’ पोहोचलेल्या नव्हत्या. त्यामुळे शहरातील अनेक मतदारांची नाहक पायपीट झाली. आश्चर्याची बाब म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरातदेखील अशीच स्थिती होती. अनेकांना मनपाकडून ‘व्होटर स्लीप’ पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे नेमके मतदान कुठे करावे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. यामुळे मतदारांची नाहक पायपीट झाली. गोपालनगरातील कमलेश तिवारी यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
नवमतदारांचे कार्डही दिसले
काही मतदान केंद्रांवर नवमतदारांचे व्होटिंग कार्डसुद्धा पडलेले दिसले. नियमानुसार निवडणुकीच्या पूर्वी मतदार कार्ड मतदारांपर्यंत पोहोचविणे आवश्यक होते.
‘एम’, ‘टी’ फॅक्टर
नवीन मतदारांमध्ये एम.टी. फॅक्टर चालला. ज्या मतदारांचे नाव एम अथवा टी पासून सुरू होत होते त्यांचे नाव मतदार यादीतून गायब होते. विशेष म्हणजे त्यांना व्होटिंग कार्ड मिळाले होते. नवीन मतदारांमध्ये बहुतांश मतदार हे १८ ते २० वर्षांचे होते. विचारणा केल्यावर सांगण्यात आले की, टेंडर व्होटिंगसाठी ४९ क्रमांकाचा फॉर्म भरून द्यावा लागतो. परंतु मतदान केंद्रावर फॉर्मसुद्धा उपलब्ध नव्हते.
नवीन मतदार झाले निराश
व्होटर कार्ड असतानाही मतदान केंद्रावरून अनेक मतदारांना परत पाठविण्यात आले. उत्तर नागपूरच्या गुरूनानक हायस्कूलच्या मतदान केंद्रावर सुनीता वासनिक, श्रुती तिरपुडेसह अनेक मतदार मिळाले ज्यांच्याजवळ व्होटर कार्ड होते, परंतु मतदार यादीत त्यांचे नाव नव्हते. त्याचप्रकारे दक्षिण नागपुरातील मानवता हायस्कूल येथील केंद्रावर वासनिक कुटुंबातील मृत सदस्याचे नाव मतदार यादीत होते.

Web Title: Voters' slips has not reached the voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.