थँक्यू नागपूर पोलीस ! ७२ तासांपासून अविश्रांत परिश्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 01:08 AM2019-04-12T01:08:30+5:302019-04-12T01:09:41+5:30

मतदान शांततेत पार पाडण्यासाठी खास व्यूहरचना करून गेल्या ७२ तासांपासून अविश्रांत परिश्रम घेणाऱ्या पोलिसांमुळे नागपुरात कुठेही अप्रिय घटना घडली नाही. नागपूरकरांनी अत्यंत शांततेत आणि उत्साहात मतदान केले. निवडणुकीच्या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी अभूतपूर्व बंदोबस्त लावला होता. देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघातील लढतीवर देशाचे लक्ष लागले होते. त्यामुळे येथील पोलिसांवर सुरक्षेचा मोठा ताण होता. परिणामी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मतदानाच्या दोन दिवसांपूर्वीपासूनच बंदोबस्ताची व्यूहरचना केली होती. स्थानिक पोलीसांच्या मदतीला होमगार्डस्, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि मुंबई, नाशिक, सांगली तसेच धुळ्यावरूनही अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेतले होते.

Thank you Nagpur police! Extensive hard work from 72 hours | थँक्यू नागपूर पोलीस ! ७२ तासांपासून अविश्रांत परिश्रम

थँक्यू नागपूर पोलीस ! ७२ तासांपासून अविश्रांत परिश्रम

Next
ठळक मुद्देकोणतीही अप्रिय घटना नाही : शांततेत आणि उत्साहात मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मतदान शांततेत पार पाडण्यासाठी खास व्यूहरचना करून गेल्या ७२ तासांपासून अविश्रांत परिश्रम घेणाऱ्या पोलिसांमुळे नागपुरात कुठेही अप्रिय घटना घडली नाही. नागपूरकरांनी अत्यंत शांततेत आणि उत्साहात मतदान केले.
निवडणुकीच्या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी अभूतपूर्व बंदोबस्त लावला होता. देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघातील लढतीवर देशाचे लक्ष लागले होते. त्यामुळे येथील पोलिसांवर सुरक्षेचा मोठा ताण होता. परिणामी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मतदानाच्या दोन दिवसांपूर्वीपासूनच बंदोबस्ताची व्यूहरचना केली होती. स्थानिक पोलीसांच्या मदतीला होमगार्डस्, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि मुंबई, नाशिक, सांगली तसेच धुळ्यावरूनही अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेतले होते.
या सर्वांच्या मदतीने गेल्या ७२ तासांपासून पोलीस यंत्रणा रात्रंदिवस बंदोबस्तात गुंतली होती. गुंड तसेच अवैध दारू विक्री करणारे आणि धामधूम करणारे उपद्रवी समाजकंटक यांच्यावर कारवाईचा धडाका लावला होता. शहरातील सर्व संवेदशनशील वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. संवेदनशील, अतिसंवेदनशील भागातील मतदान केंद्रांवर सशस्त्र सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. विनाकारण वाद घालून शांतता भंग करण्याची सवय जडलेल्या गुन्हेगारांंना पोलिसांनी आधीच सज्जड दम दिला होता. त्यामुळे समाजकंटकांनी शांत बसण्यातच धन्यता मानली.
गुरुवारी रखरखत्या उन्हात सीपी (पोलीस आयुक्त) टू पीसी (पोलीस कॉन्स्टेबल) असे सर्वच जण बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळताना धावपळ करताना दिसत होते. कुठे काही गडबड गोंधळ झाला तर त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह शीघ्र कृती दलाचे पथक ५ ते १० मिनिटात पोहचेल, अशी बंदोबस्ताची व्यूहरचना करण्यात आली होती. त्यामुळे कुठलाही गडबड गोंधळ शहरातील कोणत्याच भागात झाला नाही.
मोमीनपुरा, ताजबाग, हसनबाग, ताजनगर, टेका नाका, सतरंजीपुरा आणि ठिकठिकाणच्या मुस्लीमबहुल मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह बघायला मिळाला. रखरखत्या उन्हात या भागात जागोजागी पोलीस रस्त्यावर दिसत होते. त्यात पोलीस आयुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्तांचाही समावेश होता. गस्तीवरील वाहनेही दर पाच मिनिटांनी इकडून तिकडून फिरताना दिसत होती.
दुपारच्या वेळी उत्तर नागपुरातील एका मतदान केंद्राजवळ मतदार यादीमुळे गोंधळ झाल्याचे कळताच स्वत: पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय पोहचले. मतदान संपल्यानंतर सर्व मतदार केंद्रातील ईव्हीएम मशीन्स कळमन्यातील स्ट्राँग रूममध्ये पोहचवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पोलिसांची धावपळ सुरू होती. पोलिसांनी घेतलेल्या अविश्रांत परिश्रमामुळे आणि त्यांनी केलेल्या चोख बंदोबस्तामुळेच शहरात कुठेही अप्रिय घटना घडली नाही.
नागपूरकरांनो धन्यवाद !  पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय
नागपूरकर जनतेने पोलिसांना केलेल्या सहकार्यामुळेच शहरात अत्यंत चांगल्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. कुठेही, कसलीच अनुचित घटना घडली नाही. यासाठी नागपूरकर जनतेला आपण मनापासून धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना दिली.

 

Web Title: Thank you Nagpur police! Extensive hard work from 72 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.