बच्चू कडूंचा महायुतीवर आणखी एक प्रहार; रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वेंना पाठिंबा

By कमलेश वानखेडे | Published: April 6, 2024 08:11 PM2024-04-06T20:11:18+5:302024-04-06T20:12:20+5:30

Loksabha Election 2024: प्रहारच्या नागपूर जिल्हा कार्यकारिणीची २ एप्रिल रोजी रामटेक येथे बैठक झाली.

Ramtek loksabha Election: Bacchu Kadu Prahar Party Support to Congress Shyam Kumar Barve in Ramtech | बच्चू कडूंचा महायुतीवर आणखी एक प्रहार; रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वेंना पाठिंबा

बच्चू कडूंचा महायुतीवर आणखी एक प्रहार; रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वेंना पाठिंबा

नागपूर - अमरावती येथे खा. नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले प्रहार जनशक्तीचे आ. बच्चू कडू यांनी स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरविला. माघार घेण्यासाठी बच्चू कडू यांची समजूत काढली जाईल, अशी चर्चा सुरू असतानाच कडू यांनी महायुतीवर आणखी एक प्रहार केला आहे. रामटेक मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना समर्थन जाहीर करीत आता भाजपशी जुळवून घ्यायचे नाही, असा संदेश आ. कडू दिला आहे.

प्रहारच्या नागपूर जिल्हा कार्यकारिणीची २ एप्रिल रोजी रामटेक येथे बैठक झाली. महायुतीत बच्चू कडू यांचा सन्मान राखला जात नाही. राणा दाम्पत्याने बच्चू कडू यांच्यावर खोटे आरोप करून बदनाम करण्याच्या प्रयत्न केला. त्याच खा. नवनीत राणा यांना भाजपने अमरावतीतून उमेदवारी देऊन प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळले, अशी नाराजी या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

या बैठकीत रामटेकमध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर ३ एप्रिल रोजी नागपूर जिल्हाप्रमुख रमेश कारेमोरे यांनी अमरावती येथे आ. कडू यांची भेट घेतली. त्यावेळी आ. कडू यांनी रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांना समर्थन देण्यास संमती दिली. लोकमतशी बोलताना रमेश कारेमोरे म्हणाले, पदाचा दुरुपयोग करून व यंत्रणेवर दबाव आणून रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. मागासवर्गीय महिलेसोबत केलेले हे षडयंत्र जनतेला पटलेले नाही. जनता याचा हिशेब घेतल्याशिवाय राहणार नाही.

Web Title: Ramtek loksabha Election: Bacchu Kadu Prahar Party Support to Congress Shyam Kumar Barve in Ramtech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.