Lok Sabha Election 2019; रामटेकमध्ये होतेय काट्याची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 11:37 AM2019-04-04T11:37:24+5:302019-04-04T13:10:35+5:30

कालिदासाची भूमी म्हणून परिचित असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे देशाच्या राजकारणात ऐतिहासिक महत्त्व राहिले आहे.

Lok Sabha Election 2019; Tug of war in Ramtek | Lok Sabha Election 2019; रामटेकमध्ये होतेय काट्याची लढत

Lok Sabha Election 2019; रामटेकमध्ये होतेय काट्याची लढत

googlenewsNext
ठळक मुद्देजातींचे गणित की विकासाचा मुद्दा?प्रचारादरम्यान उमेदवारांची दमछाक

योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कालिदासाची भूमी म्हणून परिचित असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे देशाच्या राजकारणात ऐतिहासिक महत्त्व राहिले आहे. माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांनी दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानण्यात येतो व यंदा हा किल्ला राखणे हे शिवसेनेचे कृपाल तुमाने यांच्यासमोर आव्हान ठरणार आहे.
तुमाने यांना काँग्रेसकडून माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी आव्हान दिले आहे. या मतदारसंघातून एकूण १६ उमेदवार रिंगणात असले तरी, थेट लढत ही काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच राहणार आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला १९९९ साली सर्वप्रथम शिवसेनेने भेदला. त्यानंतर चारवेळा शिवसेनेचे खासदार येथून निवडून गेले. मागील निवडणुकीत कृपाल तुमाने यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांना पावणेदोन लाखाहून अधिक मतांनी पराभूत केले होते. मागील पाच वर्षांत केलेल्या विकास कामांचे ‘रिपोर्ट कार्ड’ घेऊनच ते मैदानात उतरले आहेत. ते त्याच आधारावर मतं मागत आहेत. शिवसेनेपेक्षा भाजपाचे कार्यकर्ते जोमाने प्रचार करताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे किशोर गजभिये यांची भिस्त मात्र जातीय समीकरणांवर जास्त दिसून येत आहे. याशिवाय या मतदारसंघातील वर्षानुवर्षे कायम असलेल्या समस्यांवर देखील ते भाष्य करीत आहेत. गेल्या वेळी बसपाच्या किरण पाटणकर यांनी ९५ हजारांहून अधिक मते घेतली होती. यावेळी त्या वंचित बहुजन आघाडीकडून लढत आहेत. तर बसपाच्या हत्तीला मतांची चाल देण्याची जबाबदारी सुभाष गजभिये या २९ वर्षांच्या उमेदवारावर सोपविण्यात आली आहे. मतदारसंघातील जातीय समीकरणे लक्षात घेता बसपा, वंचित बहुजन आघाडीची मतं महत्त्वाची ठरतील, असा राजकीय धुरिणांचा अंदाज आहे. सद्यस्थितीत या मतदारसंघात मोडणाऱ्या चार विधानसभा मतदारसंघात भाजप तर एका जागेवर काँग्रेसचा आमदार आहे. आमदारांसाठीदेखील ही मोठी परीक्षा मानण्यात येत आहे.

मागील पाच वर्षांत आम्ही रामटेक मतदारसंघाच्या विकासासाठी केलेले काम जनतेने पाहिले आहे. गावागावाच्या समस्या जाणून घेण्यापेक्षा त्या समस्या सोडविणे यात माझा विश्वास आहे आणि गावागावातील मूलभूत गरजा सोडविण्यास मी पूर्णपणे समर्थ आहे.
- कृपाल तुमाने, शिवसेना

भाजप-सेनेतर्फे रामटेक मतदारसंघातील समस्यांची उपेक्षाच करण्यात आली आहे. येथे बेरोजगारीची समस्या अतिशय गंभीर झाली आहे, शिवाय शेतकरी कठीण काळातून जात आहेत. सामाजिक मुद्यांकडे या सरकारने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. याची जाणीव जनतेला आहे.
-किशोर गजभिये, काँग्रेस

कळीचे मुद्दे
ग्रामीण भाग असून येथे दर्जेदार शिक्षणाचा अभाव आहे; सोबतच अनेक ठिकाणी मूलभूत सुविधादेखील नाहीत.
पाणीटंचाईची समस्या असून, बेरोजगारीमुळे तरुणांना शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. ‘एमआयडीसी’ ओसाड अवस्थेत.

Web Title: Lok Sabha Election 2019; Tug of war in Ramtek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.