घरीच मतदान करता आल्याने वयोवृद्ध मतदारही भारावले

By आनंद डेकाटे | Published: April 15, 2024 06:24 PM2024-04-15T18:24:36+5:302024-04-15T18:25:56+5:30

निवडणूक पथकांनाही संवेदनांची अनुभूती

elderly voters were also overwhelmed by being able to vote at home in nagpur lok sabha election 2024 | घरीच मतदान करता आल्याने वयोवृद्ध मतदारही भारावले

घरीच मतदान करता आल्याने वयोवृद्ध मतदारही भारावले

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : आयुष्याच्या शेवटच्या पर्वात असणाऱ्या ज्येष्ठ वयोवृद्धांच्या मनातील भावविश्वाचे अनेक कंगोरे या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतून समोर आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे जे वयोवृद्ध ८५ वर्षांपेक्षा अधिक आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मताचा अधिकार बजावता यावा, यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे जे वयोवृद्ध अंथरुणाला खिळून आहेत, त्यांना घरीच मतदान करता आल्याने ते भारावून गेले आहेत. लोकशाहीच्या या कर्तव्यतत्परतेत सहभागी होता आले, याचे अधिक समाधान असल्याच्या प्रातिनिधीक प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांकडून मिळत आहेत.

ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार यांच्या मातोश्रींचे वय ९८ वर्ष आहे. सरस्वती चिंतामणराव मारपकवार या आपल्या मुलासमवेत अंबाझरी परिसरात वास्तव्यास आहेत. गृह मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिल्याचे समजताच आईलाही मतदानाचा हा आनंद घेता यावा, यादृष्टीने आम्ही गृह मतदानाचा अर्ज भरला. यावर निवडणूक विभागाने निर्णय घेऊन सोमवारी त्यांच्या घरी मतदानासाठी विशेष पथक पाठवून मतदान करून घेतल्याबद्दल वेगळा आनंद झाल्याची प्रतिक्रिया विक्रम मारपकवार यांनी दिली.

वार्धक्य, आजारपणामुळे अनेक ज्येष्ठ मतदारांना त्यांचा मतदानाचा अधिकार बजावताना अडचणी येतात. इच्छा असूनही त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागते. हे टाळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून ८५ वर्षांपुढील ज्येष्ठ मतदारांसाठी गृह मतदानाच्या माध्यमातून घरातूनच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक घेत आहेत. १७ एप्रिलपर्यंत हे अभियान सुरू राहील. नागपूर लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील १,२०४ गृह मतदार आहेत तर रामटेक लोकसभा मतदारसंघात ८८९ गृह मतदार आहेत.

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची गृह मतदानस्थळी भेट

जिल्हा निवडणूक अधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी सोमवारी नागपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत होत असलेल्या विविध गृह मतदानस्थळांना भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदानाची गोपनियता पाळून भारत निवडणूक आयोगाच्या गृह मतदानाच्या विविध दिशानिर्देशांचे पालन करण्याच्या सूचना संबंधित मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या. यावेळी नागपूर शहरचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे उपस्थित होते.

Web Title: elderly voters were also overwhelmed by being able to vote at home in nagpur lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.