अमित देशमुखांच्या गडालाही खिंडार; पण लातूरकर ठाम !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 04:27 PM2019-07-11T16:27:32+5:302019-07-11T16:29:47+5:30

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय नेतृत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर मतदान केले जाते. स्थानिक प्रश्नांना या निवडणुकीत फारस महत्त्व नसते. परंतु, दुसऱ्यांदा आलेल्या मोदी लाटेत अमित देशमुखांच्या मतदार संघाला काही प्रमाणात फटका बसला आहे.

Vidhan Sabha Election tough for Amit Deshmukh in latur | अमित देशमुखांच्या गडालाही खिंडार; पण लातूरकर ठाम !

अमित देशमुखांच्या गडालाही खिंडार; पण लातूरकर ठाम !

Next

मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठमोठ्या दिग्गजांना पराभव टाळता आला नाही. २०१४ लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही ज्यांनी आपले मतदार संघ कायम राखले होते, यावेळी त्यांचाही पाडाव झाला. लोकसभा निवडणुकीतील भाजपने मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून आगामी विधानसभा निवडणूक भाजपसाठी काही प्रमाणात सोपी झाली आहे. परंतु, विधानसभा निवडणूक ही स्थानिक प्रश्नांवर आणि उमेदवारावर अवलंबून असल्याने भाजपसाठी विधानसभेचा मार्ग वाटतो तितका सुकर नक्कीच नाही.

२०१४ मध्ये काँग्रेसने नांदेड आणि हिंगोली मतदार संघ कायम राखले होते. नांदेड हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ मानला जातो. मात्र यावेळी भाजपने या मतदार संघाचाही पाडाव केला. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूर जिल्ह्यातही भाजपने दुसऱ्यांदा विजय मिळवला. यावेळी भाजपचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात वाढले. नरेंद्र मोदी यांची झालेली सभा आणि पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांभाळेली प्रचाराची धुरा यामुळे भाजपने लातूर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघात आघाडी घेतली. यामध्ये विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांच्या लातूर शहर मतदार संघाचाही समावेश आहे.

लातूर लोकसभेतील सातपैकी सहा विधानसभा मतदार संघात भाजपला २५ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले आहे. यामध्ये लोहा आणि अहमदपूर मतदार संघात भाजपला अनुक्रमे ६० आणि ६३ हजार मतांचे मताधिक्य मिळाले आहे. लातूरमध्ये लक्षवेधी ठरले ते अमित देशमुख यांच्या लातूर शहर मतदार संघातील भाजपचे मताधिक्य. येथे भाजपला इतर मतदार संघांच्या तुलनेत सर्वात कमी १४ हजार मतांची आघाडी मिळाली. यावरून लातूरकरांची आजही देशमुख कुटुंबियांवर माया असल्याचे दिसून आले, तरी ही माया काही प्रमाणात पातळ झाल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे काही प्रमाणात का होईना, मिळालेले मताधिक्य भाजपसाठी आनंद देणारे असून अमित देशमुख यांना विचार करायला भाग पाडणारे आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय नेतृत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर मतदान केले जाते. स्थानिक प्रश्नांना या निवडणुकीत फारसं महत्त्व नसते. परंतु, दुसऱ्यांदा आलेल्या मोदी लाटेत अमित देशमुखांच्या मतदार संघाला काही प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी अमित देशमुख यांना डावपेच आखावे लागणार आहे.

Web Title: Vidhan Sabha Election tough for Amit Deshmukh in latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.