अजित पवारांची साथ सोडलेल्या सोनावणेंना शरद पवारांकडून संधी, बीडमधून दिली उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 07:56 AM2024-04-05T07:56:20+5:302024-04-05T07:57:15+5:30

Maharashtra Lok sabha Election 2024: काही दिवसांपूर्वी अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करणारे बजरंग सोनावणे यांना शरद पवार यांनी बीडमधून उमेदवारी दिली.  भिवंडीतून सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे उमेदवारी देण्यात आली आहे.

Sharad Pawar gave a chance to Bajarang Sonavane, who left Ajit Pawar's support, to contest from Beed | अजित पवारांची साथ सोडलेल्या सोनावणेंना शरद पवारांकडून संधी, बीडमधून दिली उमेदवारी

अजित पवारांची साथ सोडलेल्या सोनावणेंना शरद पवारांकडून संधी, बीडमधून दिली उमेदवारी

 मुंबई  - काही दिवसांपूर्वी अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करणारे बजरंग सोनावणे यांना शरद पवार यांनी बीडमधून उमेदवारी दिली.  भिवंडीतून सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी पहिल्या यादीत शरद पवार गटाने ५ उमेदवार जाहीर केले होते.
बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ज्योती मेटे आणि बजरंग सोनावणे हे दोघेजण इच्छुक होते.  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सोनावणे यांनी प्रीतम मुंडे यांना चांगली टक्कर दिली होती. ज्योती मेटे यांच्यापेक्षा बजरंग सोनावणे यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी असलेली यंत्रणा आणि क्षमता हे निकष लक्षात घेता शरद पवार गटाने बजरंग सोनावणे यांना बीडसाठी पसंती दिली.  बीडमध्ये आता पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे असा पुन्हा एकदा सामना होणार आहे.

मागील निवडणुकीत भिवंडीतून काँग्रेसचा उमेदवार होता. त्यामुळे काँग्रेस भिवंडीवरील दावा सोडायला तयार नव्हता. मात्र, या निवडणुकीत बाळ्यामामा यांच्यासारखा उमेदवार असल्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी, असा शरद पवार गटाचा आग्रह होता. भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना ते कडवी टक्कर देऊ शकतात, हे शरद पवार गटाने पटवून दिल्याने त्यांच्या पक्षाकडे ही जागा गेली.

धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर
भाजपने माढ्यातून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने नाराज असलेल्या अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी बुधवारी रात्री उशीरा मुंबईत शरद पवारांची भेट घेतली. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी धैर्यशील यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे समजते. तसे झाल्यास ते माढ्यातून तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, असे सांगितले जात आहे.

जय श्रीराम म्हणत, संजय निरुपम यांनी दिले संकेत 
काँग्रेसने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केलेले माजी खासदार संजय निरुपम भाजपच्या वाटेवर आहेत. 'मी लवकरच दुसऱ्या पक्षात जाणार, जय श्रीराम' असे म्हणत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. मी बुधवारीच पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा पाठविला होता. त्यानंतर पक्षाने माझ्यावर कारवाई केली असे ते म्हणाले. त्यांना उत्तर-पश्चिम मुंबईत भाजप उमेदवारी देईल अशीही चर्चा आहे.

अर्चना पाटील यांना उस्मानाबादमधून उमेदवारी कशामुळे?
धाराशिवचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि पद्मसिंह पाटील यांच्या सून अर्चना पाटील यांनी गुरुवारी अजित पवार 
गटात प्रवेश केला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार 
गटातर्फे उस्मानाबाद मतदारसंघासाठी अर्चना पाटील यांच्या उमेदवारीची घोषणाही यावेळी केली. अर्चना पाटील यांना उमेदवारी देताना आम्ही निवडून येण्याचा निकष लावला असल्याचे सांगत महायुती या निवडणुकीत राज्यात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावाही त्यांनी केला.

Web Title: Sharad Pawar gave a chance to Bajarang Sonavane, who left Ajit Pawar's support, to contest from Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.