तीन जागांचा गुंता सुटेना! आघाडीचे घोडे अडलेलेच; चर्चा होणार, पण आता दिल्लीतच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 05:34 AM2024-03-30T05:34:51+5:302024-03-30T06:54:33+5:30

जागावाटपाबाबत आता दिल्लीतील नेत्यांनी चर्चा करावी, अशी भूमिका राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतली.

Mahavikas Aghadi of three seats can not be solved! The leading horses are stuck; There will be a discussion, but now in Delhi | तीन जागांचा गुंता सुटेना! आघाडीचे घोडे अडलेलेच; चर्चा होणार, पण आता दिल्लीतच

तीन जागांचा गुंता सुटेना! आघाडीचे घोडे अडलेलेच; चर्चा होणार, पण आता दिल्लीतच

मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटपाचे घोडे तीन जागांवरून अडलेलेच आहे. आघाडीतील तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका होऊनही सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडी या जागांचा तिढा कायम आहे. 

राज्याच्या स्तरावर हा तिढा सुटत नसल्याने आता याबाबत दिल्लीत चर्चा होणार असल्याची माहिती आघाडीतील सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शुक्रवारी राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीतील नेत्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली.

या बैठकीत तिढा असलेल्या जागावाटपाबाबत आता दिल्लीतील नेत्यांनी चर्चा करावी, अशी भूमिका राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतली. लोकसभेच्या सांगली मतदारसंघात ठाकरे गटाने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. ‘मविआ’त सांगलीच्या जागेवर काँग्रेसनेही दावा सांगितला आहे. 

सांगलीत मैत्रीपूर्ण लढत
सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस जास्त आग्रही आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीही हा विषय लावून धरला असून, त्यासाठी एकदा दिल्लीत धडक दिली आहे. जर सांगलीची जागा काँग्रेसला सुटली नाही तर या जागेवर मैत्रीपूर्ण लढत करावी, असा आग्रह काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धरला असून त्याबाबतचा निर्णय दिल्लीतील नेतेच घेऊ शकतात, असे राज्यातील एका काँग्रेस नेत्याने सांगितले.

आमचा वापर केला जाताेय : प्रकाश आंबेडकर
महाविकास आघाडीत आम्हाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. येत्या दोन एप्रिल रोजी आम्ही सगळे स्पष्ट करणार आहोत, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. कुणी तरी कुणासाठी आम्हाला वापरून घेत असल्याचे दिसते, असेही आंबेडकर म्हणाले.

कोणत्या जागेचा पेच?
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेससाठी अनुकूल असल्याचे सांगत काँग्रेसने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. तर उद्धव ठाकरेंनी अनिल देसाईंची इथून उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आतापर्यंतच्या आघाडीत भिवंडीची जागा ही काँग्रेसच्या वाट्याला यायची. यावेळी या जागेवर शरद पवार गटानेही दावा केला आहे. तर काँग्रेसही दावा सोडायला तयार नसल्याने जागेचा पेच कायम आहे. 

नाना पटोलेंची गैरहजेरी
तीन जागांचा तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते. तर शुक्रवारी काँग्रेसच्या नेत्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीकडेही पटोले यांनी 
पाठ फिरवली. आपण भंडारा-गोंदियात प्रचारामध्ये व्यग्र असल्याचे कारण पटोलेंनी सांगितल्याचे समजते. सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा शिवसेनेला गेली तर त्याचे खापर आपल्या डोक्यावर नको आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांची नाराजी नको म्हणून पटोले या बैठकांना गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. शुक्रवारच्या बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची येत्या ३ एप्रिल रोजी पत्रकार परिषद होणार असून, त्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. उद्धव ठाकरे व शरद पवार दिल्लीत जाणार आहेत; मात्र तिथे राज्यातील जागावाटपावर चर्चा होणार नाही.      - संजय राऊत, ठाकरे गटाचे नेते 

Web Title: Mahavikas Aghadi of three seats can not be solved! The leading horses are stuck; There will be a discussion, but now in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.