मविआ जागावाटपाचे घोडे अडले तरी कुठे? सांगलीवरून तिढा कायम, दोन-तीन दिवसांत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 06:26 AM2024-03-22T06:26:45+5:302024-03-22T06:27:09+5:30

शाहू छत्रपतींची गळाभेट घेत ठाकरेंनी दिला प्रचाराचा शब्द

Mahavikas Aaghadi seat sharing process stuck in between Sangli announcement will be made in two three days | मविआ जागावाटपाचे घोडे अडले तरी कुठे? सांगलीवरून तिढा कायम, दोन-तीन दिवसांत घोषणा

मविआ जागावाटपाचे घोडे अडले तरी कुठे? सांगलीवरून तिढा कायम, दोन-तीन दिवसांत घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गुरुवारी पार पडलेल्या बैठकीतही जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे आघाडीची जागावाटपाची गाडी अडलेलीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या बैठकीला पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष, माकप या मित्रपक्षांशी बोलणी सुरू असून या पक्षांशी चर्चा झाल्यानंतर येत्या दोन-तीन दिवसांत जागावाटप जाहीर होईल, असे पटोले यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. सध्या काँग्रेस उमेदवारांची जी नावे माध्यमात छापून आली आहेत, त्यात काही बदल पाहायला मिळतील. मला सांगितले तर मी लढेन, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

आंबेडकरांशी चर्चा

प्रकाश आंबेडकर यांनी सात जागांवर पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आंबेडकरांशी चर्चा केली आहे. 

शाहू छत्रपतींची गळाभेट घेत ठाकरेंनी दिला प्रचाराचा शब्द

शाहू छत्रपती यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीने त्यांना विजयी केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण हा महाराष्ट्राच्या तसेच मराठी अस्मितेचा प्रश्न आहे. छत्रपतींच्या प्रचाराला तर येऊच शिवाय विजयाच्या सभेलाही नक्की येणार असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे झालेल्या चर्चेवेळी दिली.  
ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी शाहू छत्रपतींची गळाभेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्यासोबत तेजस ठाकरे, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर होते. यावेळी बैठकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील व राज्यातील राजकीय परिस्थितीवर उभयतांनी चर्चा केली.

घराण्यांचे घनिष्ठ संबंध

कोल्हापूरला येऊन शाहू महाराज यांची भेट घेतली. तुम्हाला आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही. ठाकरे कुटुंबीय व छत्रपती शाहू महाराजांचे ऋणानुबंध माझ्या आजोबांपासूनचे आहेत. मला आनंद आहे की याही आणि पुढील पिढीत हे घनिष्ठ संबंध जपले जातील, असे ठाकरे यांनी सांगितले.

सांगलीबाबत काँग्रेस-ठाकरे गट आग्रही  

सांगलीच्या जागेवर अजून चर्चा पूर्ण झालेली नाही, असे सांगत त्या ठिकाणी आघाडीतील नेत्याने जाऊ नये असा आघाडी धर्म असतो. उद्धव ठाकरेंचा  महाराष्ट्रभर दौरा सुरू आहे, योगायोगाने ते सांगलीला गेले असतील, ते कशासाठी गेले हा त्यांचा प्रश्न आहे, अशा शब्दांत पटोले यांनी ठाकरेंच्या सांगली दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली. यावरून सांगलीचा तिढा अजून सुटला नसल्याचे स्पष्ट आहे. या जागेवर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा अजून कायम आहे. 

Web Title: Mahavikas Aaghadi seat sharing process stuck in between Sangli announcement will be made in two three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.