पन्नाप्रमुख, बुथप्रमुख गेले कुठे?, अनेक मतदारांची नावे गायब; घटलेल्या मतदानाने चिंता

By यदू जोशी | Published: April 23, 2024 08:18 AM2024-04-23T08:18:50+5:302024-04-23T08:19:34+5:30

मतटक्का घसरल्याची भाजपमध्ये जोरदार चर्चा, मतदारांनी प्रत्यक्ष मतदानासाठी आले पाहिजे याची व्यवस्था पन्नाप्रमुखांनी करणे अपेक्षित असते. 

Loksabha Election 2024 - names of many voters missing; Lok Sabha Elections 2024 - Lower turnout in first phase raises BJP's worries | पन्नाप्रमुख, बुथप्रमुख गेले कुठे?, अनेक मतदारांची नावे गायब; घटलेल्या मतदानाने चिंता

पन्नाप्रमुख, बुथप्रमुख गेले कुठे?, अनेक मतदारांची नावे गायब; घटलेल्या मतदानाने चिंता

मुंबई : भाजपसारखी यंत्रणा कोणत्याच पक्षाकडे नाही, या पक्षाचे सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) असते, अशी प्रशंसा नेहमीच केली जात असताना या प्रशंसेचाच एक भाग असलेले हजारो पन्नाप्रमुख, बूथप्रमुख हे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सक्रिय होते की नाही, असा सवाल आता केला जात आहे. ‘आपल्या’ मतदारांची नावे मतदार यादीत नसणे आणि मतदानाची कमी टक्केवारी या दोन बाबींच्या पार्श्वभूमीवर आता हा विषय ऐरणीवर आला आहे. 

मतदार यादीच्या एका पानावर मागून-पुढून अशी ६० मतदारांची नावे असतात. या मतदारांमागे भाजपने एक पन्नाप्रमुख नेमलेला आहे आणि असे हजारो पन्नाप्रमुख राज्यात आहेत. पक्षाचे वैशिष्ट्य म्हणून या बाबीचा अनेकदा उल्लेख केला जातो.  

पन्नाप्रमुखांची जबाबदारी काय?
या पन्नाप्रमुखाने फक्त एका पानावरील मतदारांशी सातत्याने संपर्कात राहावे, त्यांचे प्रश्न कोणते ते जाणून घ्यावे आणि ते सोडविण्यासाठी पक्ष आणि सरकार पातळीवरून त्यांना मदत करावी, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव धावून जावे, अशी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. तसेच या मतदारांनी प्रत्यक्ष मतदानासाठी आले पाहिजे याची व्यवस्था पन्नाप्रमुखांनी करणे अपेक्षित असते. 

ॲपला ‘ती’ यादी जोडली नाही 
मतदार याद्यांचे एक ॲप भाजपने तयार केले होते. प्रत्येक पन्नाप्रमुखाला त्याच्याशी जोडले पण जुन्या मतदार याद्यांच्या आधारे हे काम केले आणि अद्ययावत मतदार याद्यांना या ॲपशी जोडले गेले नाही, अशा तक्रारी अनेक पन्नाप्रमुखांनी पक्षाकडे केल्या आहेत. 

पहिल्या टप्प्यात दिसल्या उणिवा 
विदर्भातील नागपूरसह पाच मतदारसंघांत १९ एप्रिलला झालेल्या मतदानानंतर पक्षपातळीवर काही उणिवा समोर आल्याचे आणि त्यात मुख्यत्वे पन्नाप्रमुख योजनेचा उडालेला बोजवारा ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे.  

अशी असते रचना
एका बूथमागे २० पन्नाप्रमुख असतात. तीन बूथचा मिळून एक प्रमुख सुपर वॉरिअर असतो. पाच-सहा बूथमागे एक शक्तिकेंद्रप्रमुख असतो. बूथ अध्यक्षांच्या नेतृत्वात आणखी १० जण काम करतात. ‘हमारा बूथ, मजबूत बूथ’ अशी टॅगलाइन पक्षाने दिलेली आहे. या सगळ्या यंत्रणेला अंतिम मतदार यादीत ‘आपल्या’ मतदारांची नावे नाहीत हे आधीच कसे लक्षात आले नाही आणि लक्षात आलेही असेल तर मतदार यादीत नावनोंदणी करण्याच्या मुदतीत ती नावे पुन्हा समाविष्ट का करून घेतली गेली नाहीत, असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. प्रत्येक बूथवर ५१ टक्क्यांहून अधिक मतदान झाले पाहिजे याची जबाबदारी या सर्व यंत्रणेवर असताना अनेक ठिकाणी त्यापेक्षा कमी मतदान झाले. 

संपूर्ण यंत्रणा पक्षात प्रभावीपणे काम करत आहे. पन्नाप्रमुख, बुथप्रमुख, शक्तिकेंद्रप्रमुख, सुपर वॉरिअर यांच्यात समन्वय चांगला आहे, निकालात त्याचे परिणाम नक्कीच दिसतील. - विक्रांत पाटील, सरचिटणीस, प्रदेश भाजप 

Web Title: Loksabha Election 2024 - names of many voters missing; Lok Sabha Elections 2024 - Lower turnout in first phase raises BJP's worries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.