मिशन इलेक्शन: ‘सागर’वर भेटीगाठींना भरती; संभाव्य बंड शमविण्यासाठी तारेवरची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 06:32 AM2024-03-22T06:32:29+5:302024-03-22T06:37:22+5:30

सागर बंगल्यावर विविध मतदारसंघांतील नेत्यांच्या गाठीभेटी गुरुवारी सुरू होत्या.

Lok Sabha Election 2024 Devendra Fadnavis Sagar Bungalow is center for NDA Alliance dealing with candidature | मिशन इलेक्शन: ‘सागर’वर भेटीगाठींना भरती; संभाव्य बंड शमविण्यासाठी तारेवरची कसरत

मिशन इलेक्शन: ‘सागर’वर भेटीगाठींना भरती; संभाव्य बंड शमविण्यासाठी तारेवरची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महायुतीतील लोकसभा जागांचा तिढा सोडविणे, संभाव्य बंड होण्याआधीच शमविणे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांशी बंदद्वार चर्चा सुरू केली आहे. त्यांच्या सागर बंगल्यावर विविध मतदारसंघांतील नेत्यांच्या गाठीभेटी गुरुवारी सुरू होत्या.

भाजपने माढा मतदारसंघातून  रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना, तर अहमदनगरमधून खा. सुजय विखे-पाटील पुन्हा मैदानात उतरविले.  दोन्ही मतदारसंघांतील नाराज नेत्यांची सागर बंगल्यावर गर्दी होत आहे.  हिंगोलीतील शिष्टमंडळासोबतही फडणवीसांनी बैठक घेतली. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने हेही भेटले. 

अहमदनगरमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर

माजी मंत्री राम शिंदे यांनी अहमदनगरसाठी मी इच्छुक असल्याचे विधान केले होते. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके यांनी शरद पवारांची भेट घेतली असून तेही नगरमधून लढण्याची शक्यता आहे. सुजय विखे-पाटील विरुद्ध नीलेश लंके सामना होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी फडणवीसांची भेट घेतली.

  • रत्नागिरीबाबत खलबते : रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरूनही महायुतीमध्ये तिढा कायम आहे. या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी राजन तेली आणि प्रमोद जठार हे फडणवीस यांना भेटले.
  • माढ्यातही नाराजी : भाजपने माढ्यातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने बंडाचे वारे वाहत आहेत. दोन प्रदेश पदाधिकाऱ्यांना सारे शांत करण्याची जबाबदारी फडणवीस यांनी दिली. सोलापूरसाठी भाजपकडून उमेदवाराचा शोध जारी असताना आ. राम सातपुते हे फडणवीस यांना भेटले.  
  • साताऱ्यातही तिढा : साताऱ्यात खा. उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झालेली नसतानाच त्यांनी दिल्लीत भाजप नेते गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दुसरीकडे शिवेंद्रराजे भोसले यांनीही फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तेथे कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.

Web Title: Lok Sabha Election 2024 Devendra Fadnavis Sagar Bungalow is center for NDA Alliance dealing with candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.