रोकड, दारू, सोन्यासह २६९ कोटींचा ऐवज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 05:36 AM2024-03-24T05:36:57+5:302024-03-24T05:37:48+5:30

एकूण २६९ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली.

269 crores including cash, liquor, gold seized | रोकड, दारू, सोन्यासह २६९ कोटींचा ऐवज जप्त

रोकड, दारू, सोन्यासह २६९ कोटींचा ऐवज जप्त

मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर आतापर्यंत राज्यात २३ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, तर १७ लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. याचबरोबर सोन्यासह ४३ किलोचे मौल्यवान धातू जप्त करण्यात आले आहेत. असा एकूण २६९ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली.
राज्यात पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला आहे. २० मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली.

१० उमेदवारांनी दाखल केले अर्ज
विदर्भातील पहिल्या टप्प्यात आतापर्यंत १० उमेदवारांचे अर्ज आले आहेत. पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांत मतदान होणार आहे.  यापैकी रामटेकमध्ये एक, नागपूरमध्ये पाच, भंडारा-गोंदियामध्ये दोन, गडचिरोली-चिमूरमध्ये दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. चंद्रपूरमध्ये आतापर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही. 
राज्यात जप्त करण्यात आलेल्या बेहिशेबी २३ कोटी रुपयांपैकी सर्वाधिक म्हणजे, ३ कोटी ५० लाख रुपयांची बेहिशेबी रोकड मुंबईच्या उपनगरातून जप्त केली आहे. ४३ किलो सोने-चांदी व इतर मौल्यवान ऐवजही जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत परवाना नसलेली ३०८ शस्त्रे जप्त करण्यात आली.

पक्षाच्या जाहिरातींना लागणार निवडणूक आयोगाची मान्यता
वर्तमानपत्रात एखाद्या राजकीय पक्षाला जाहिरात प्रसिद्ध करायची असल्यास निवडणूक आयोगाकडून संबधित जाहिरात प्रमाणित करून घ्यावी लागेल. आतापर्यंत अशा दोन जाहिराती निवडणूक कार्यालयात सादर झाल्या. त्यांचे प्रमाणीकरण सुरू असल्याचे चोकलिंगम म्हणाले.

अवैध दारू पकडण्यासाठी एरवी १२ चेकपोस्ट असतात.आता त्यांची संख्या निवडणूक काळ लक्षात घेऊन ४० करण्यात आली आहे. याशिवाय हातभट्टीच्या दारूचा व्यवसाय जेथे मोठ्या प्रमाणात चालतो अशी ठिकाणे आणि परराज्यातून दारू येते अशा ठिकाणी जलद कृतीदल तैनात करण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणी तात्काळ कारवाई केली जात आहे.
- विजय सूर्यवंशी, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त

Web Title: 269 crores including cash, liquor, gold seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.