Raju Shetty will go for campaign for the fourth phase | राजू शेट्टी चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार
राजू शेट्टी चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार

ठळक मुद्देराजू शेट्टी चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणारशेतकरी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी हीच विश्रांती

कोल्हापूर : मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. त्यामुळे शेतकरी, कार्यकर्त्यांची गाठीभेटी हीच माझ्यासाठी विश्रांती आहे. शेतकऱ्यांचे चेहरे आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळातून मला अविरतपणे काम करण्याची ऊर्जा मिळते. आता लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये महाआघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन दिवसांत जाणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगितले.

खासदार शेट्टी म्हणाले, गेल्या महिन्याभरापासून निवडणुकीच्या रणधुमाळीत दिवस कसा जायचा हेच समजत नव्हते. मागील १५ दिवसांत रोज तीन ते चार तासच झोप मिळायची. रोज पहाटे पाच वाजता माझा दिवस सुरु होतो. काल, मंगळवारी मतदान झाल्यानंतर काहीसा निवांत झालो. बुधवारी सकाळी साडेसात वाजता उठलो. घरी भेटण्यासाठी कार्यकर्ते आले होते. त्यांच्याशी चर्चा करुन मतदारसंघातील विवाह तसेच अन्य समारंभासाठी उपस्थिती लावली.

दिवसभर विविध गावांतील शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील विविध मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुढील काही दिवस दौरा करणार आहे.

विश्रांतीसाठी मी कधीच सुटी घेऊन बाहेर जात नाही. शेतकरी आणि कार्यकर्त्यांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधण्यातून मला विश्रांती मिळते. ऊसदर आंदोलनावेळी अनेकदा ताणतणाव यायचा. त्याच्या तुलनेत निवडणुकीच्या कालावधीतील ताणतणाव कमी होता. संयमाने वाटचाल आणि विरोधकांना सामोरे गेल्याने या तणावाचा परिणाम माझ्यावर झाला नाही.
 

 


Web Title: Raju Shetty will go for campaign for the fourth phase
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.