प्रकाश आवाडे यांचे बंड: लोकसभा लढण्याची भीती दाखवून विधानसभेचा 'शब्द' घेण्याचा प्रयत्न

By विश्वास पाटील | Published: April 13, 2024 12:06 PM2024-04-13T12:06:08+5:302024-04-13T12:06:52+5:30

मुख्यमंत्र्यांशी होणार आज चर्चा

Prakash Awade Rebellion: Trying to take the word of the Legislative Assembly by showing fear of contesting the Lok Sabha | प्रकाश आवाडे यांचे बंड: लोकसभा लढण्याची भीती दाखवून विधानसभेचा 'शब्द' घेण्याचा प्रयत्न

प्रकाश आवाडे यांचे बंड: लोकसभा लढण्याची भीती दाखवून विधानसभेचा 'शब्द' घेण्याचा प्रयत्न

विश्वास पाटील

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मुलाऐवजी स्वत:चीच उमेदवारी जाहीर करून भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी खळबळ उडवून दिली. त्यामागे लोकसभेची भीती दाखवून विधानसभेच्या उमेदवारीचा गुंता सोडवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शनिवारी कोल्हापुरात आहेत. त्यांना भेटीची वेळ दिली असताना त्यांनी त्याच्या आदल्या दिवशीच उमेदवारी जाहीर करून दबाव निर्माण केल्याचे सांगण्यात येते.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. इचलकरंजीत भाजपचा कमिटेड मतदार आहे. त्यांचा पाठिंबा मिळवायचा तर हात चिन्ह चालणार नाही म्हणून त्यांनी ही चाल खेळली व त्यात ते यशस्वी झाले. निकालानंतर त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता ते त्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत. परंतु स्थानिक राजकारणात त्यांना अजून भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी पक्षसंघटनेत चंचूप्रवेश करू दिलेला नाही. 

इचलकरंजीत काही नसताना भाजप मी वाढवला आहे, विधानसभेला दोनवेळा जिंकलो आहे. त्यामुळे २०२४ लाही या जागेवरून मीच लढणार असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे आमदार आवाडे यांची कोंडी झाली आहे. त्यांचा भाजपमधील प्रवेशही अजून झालेला नाही. त्यावरून लोकसभा निवडणुकीसाठी मुलगा राहुल यांचा भाजपकडून फारसा विचारही झाला नाही. त्यामुळे लोकसभेला डरकाळी फोडून त्यातून विधानसभेच्या निवडणुकीतील काही प्रश्न सोडवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

आवाडे यांना मानणारा इचलकरंजी शहरासह आजूबाजूच्या गावांत आणि हातकणंगले तालुक्यातही दखल घ्यायला लावणारा मजबूत गट आहे. त्यांच्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून जोडलेले नेटवर्क आहे. त्यामुळे इचलकरंजीच्या राजकारणात आम्हाला कुणी बेदखल करू नये असाही त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी सुरुवातीलाच महायुतीतील शिंदेसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीस थेट विरोध केला. राहुल आवाडे यांनी कोल्हापुरात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणूक लढवण्याची घोषणाही करून बघितली.

ताकद दाखवण्याचा प्रयत्न

खासदार माने यांच्याकडून अजूनही आवाडे यांच्याशी संपर्क साधलेला नाही. मूळ आवाडे-माने घराण्यात पारंपरिक राजकीय वैर आहे. माजी राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर व खासदार माने यांच्यातही एकोपा नाही. आमदार विनय कोरे यांची त्यांनी घरी जाऊन भेट घेतली तरी अजूनही ते थेट प्रचारात उतरलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर आपण सक्षम उमेदवार ठरू शकतो, आपले यड्रावकर, कोरे या अपक्ष आमदारांशीही चांगले संबंध असल्याचा व त्यांच्या माध्यमातून ताकद उभी करू शकतो हा मेसेज देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Web Title: Prakash Awade Rebellion: Trying to take the word of the Legislative Assembly by showing fear of contesting the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.