मतदान केंद्राबाहेर बेकायदेशीर सर्व्हे, तीन महिलांसह पाचजण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:26 AM2019-04-24T11:26:52+5:302019-04-24T11:40:57+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना कदमवाडी येथील सुसंस्कार शाळेच्या आवारात मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना ‘तुम्ही मतदान कोणाला करणार?’ अशी विचारणा करून बेकायदेशीरपणे प्रचाराचा सर्व्हे करणाऱ्या तीन महिलांसह पाचजणांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची भाजप महिलाध्यक्ष, गांधीनगर लिहिलेली कारही पोलिसांनी जप्त केली. या सर्वांवर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

Illegal surveys, out of five polling booths, including five women | मतदान केंद्राबाहेर बेकायदेशीर सर्व्हे, तीन महिलांसह पाचजण ताब्यात

कोल्हापुरातील कदमवाडी येथे प्रचाराचा बेकायदेशीरपणे सर्व्हे करणाऱ्या महिलांसह पाचजणांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.

Next
ठळक मुद्देमतदान केंद्राबाहेर बेकायदेशीर सर्व्हे, तीन महिलांसह पाचजण ताब्यातकदमवाडी परिसरातील सुसंस्कार शाळेच्या आवारातील प्रकार

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना कदमवाडी येथील सुसंस्कार शाळेच्या आवारात मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना ‘तुम्ही मतदान कोणाला करणार?’ अशी विचारणा करून बेकायदेशीरपणे प्रचाराचा सर्व्हे करणाऱ्या तीन महिलांसह पाचजणांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची भाजप महिलाध्यक्ष, गांधीनगर लिहिलेली कारही पोलिसांनी जप्त केली. या सर्वांवर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

संशयित गांधीनगर येथील प्राजक्ता जीवन चौधरी (वय ३३), सुप्रिया संजय व्हटकर (४३), वर्षाराणी जालिंदर गायकवाड (३०, तिघी रा. जवाहरनगर, कोल्हापूर), संग्राम दिलीप पोवार (२२, कोयना कॉलनी, पोवारनगर), अमोल उमाशंकर बारड (३०, रा. केदारनगर, मोरेवाडी) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीसाठी कदमवाडी परिसरातील सुसंस्कार शाळेमध्ये मतदान केंद्र होते.

पोलिसांनी जप्त केलेली कार.

मंगळवारी सकाळपासून लोक मतदानासाठी येत होते. साडेनऊच्या सुमारास गांधीनगर भाजप अध्यक्षा लिहिलेली कार (एमएच ०९ डीए ८३३०) मधून प्राजक्ता चौधरी, सुप्रिया व्हटकर, वर्षाराणी गायकवाड, संग्राम पोवार, अमोल बारड असे पाचजण आले. ते मतदान केंद्राच्या शंभर मीटर आतमध्ये कार नेऊन, मतदानासाठी जाणाऱ्या लोकांना अडवून आमचा सर्व्हे सुरू असून ‘तुम्ही मतदान कोणाला करणार?’ असे प्रश्न विचारू लागले.

लोकांना काय सांगायचे तेच कळेना. लोकांनी मतदान केंद्रामध्ये जाऊन येथील निवडणूक अधिकाऱ्यांना ‘बाहेर आम्हाला मतदान कोणाला करणार,’ म्हणून विचारणा होत आहे. कदाचित पैसे वाटप सुरू असल्याची तक्रार केली. येथील अधिकाऱ्यांनी भरारी पथकासह शाहूपुरी पोलिसांना वर्दी दिली. दोन्ही पथकांनी घटनास्थळी धाव घेत सर्व्हे करणाऱ्या पाचजणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी निवडणूक अधिकारी गौतम विठ्ठल निकाळजे (वय ५०, रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांच्या सतर्कतेने हानी टळली

कदमवाडी परिसरात मतदान केंद्राबाहेर कारमधून आलेल्या तीन महिला व दोन तरुण मतदारांवर दबाव टाकत पैसे वाटप करीत असल्याचे वृत्त परिसरात समजताच स्थानिक लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांनी धाव घेतली. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याने गोंधळ उडाला. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित पाचजणांसह कार पोलीस ठाण्यात आणली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. पोलीस पोहोचण्यास थोडा जरी वेळ झाला असता तर जमावाने पाचजणांना मारहाण करून कारची तोडफोड केली असती. पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोठी हानी टळली.

 

 

Web Title: Illegal surveys, out of five polling booths, including five women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.