छातीत चाकूने वार करून स्वत:च रुग्णालयात नेले; पोलिसांनी घेतले ताब्यात  

By दिपक ढोले  | Published: July 30, 2023 06:37 PM2023-07-30T18:37:04+5:302023-07-30T18:37:17+5:30

पैशांच्या कारणावरून वादावादी झाली. वादावादी सुरू असताना एकाने छातीत चाकूने वार करून आझादसिंग इच्छासिंग तीलपितीया (३२, रा. रामनगर सा. का) यांचा खून केला.

Driven himself to hospital with stab wounds to the chest Police took custody | छातीत चाकूने वार करून स्वत:च रुग्णालयात नेले; पोलिसांनी घेतले ताब्यात  

छातीत चाकूने वार करून स्वत:च रुग्णालयात नेले; पोलिसांनी घेतले ताब्यात  

googlenewsNext

जालना : पैशांच्या कारणावरून वादावादी झाली. वादावादी सुरू असताना एकाने छातीत चाकूने वार करून आझादसिंग इच्छासिंग तीलपितीया (३२, रा. रामनगर सा. का) यांचा खून केला. नंतर दोन्ही संशयितांनी त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला भंगार विक्रेत्यानेच खून केल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफिने दोघांनाही ताब्यात घेतले. ही घटना जालना शहरातील फुकटनगर भागात शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. तेजासिंग नरसिंग बाबरी (रा. रामनगर, जालना), हरदीपसिंग बबलूसिंग टाक (रा. म्हाडा कॉलनी, जालना) अशी संशयितांची नावे आहेत. 

आझादसिंग इच्छासिंग तीलपितीया, तेजासिंग बाबरी आणि हरदीपसिंग टाक हे तिघे मित्र आहेत. ते शनिवारी दिवसभर सोबत होते. सायंकाळी शहरातील भंगार विक्रेत्याकडे पैसे आणण्यासाठी ते गेले होते. परंतु, भंगारचे दुकान बंद होते. त्यामुळे ते फुकटनगर येथे गेले. तेथे पैशांच्या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली. तेवढ्यात तेजासिंग बावरी याने चाकू काढून आझादसिंग यांच्या छातीत वार केला. त्यात ते जखमी झाले. संशयितांनीच त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, खासगी रुग्णालयाने जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले. त्याच वेळी आझादसिंग तीलपितीया यांचा मृत्यू झाला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच, पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, पोनि. रामेश्वर खनाळ, पोनि. सिद्धार्थ माने, पोउपनि. राजेंद्र वाघ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेजासिंग बावरी याच्यावर राज्यासह परराज्यांतही घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

असा झाला खुनाचा उलगडा
पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. त्याचवेळी तेजासिंग आणि हरदीपसिंग यांना विचारपूस करण्यात आली. त्यांनी भंगार विक्रेत्याने खून केल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, डीवायएसपी सांगळे, पोनि. खनाळ आणि पोनि. माने यांनी आरोपींची कसून चौकशी केली. त्याचवेळी त्यांनी खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. याप्रकरणी लक्ष्मी आझादसिंग तीलपितीया यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने हे करीत आहेत.

Web Title: Driven himself to hospital with stab wounds to the chest Police took custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.