'विना टोपीचे डोके चांगले दिसत नाही'; रखरखत्या उन्हात उमेदवारांच्या गावभेटी

By विजय मुंडे  | Published: April 8, 2024 07:25 PM2024-04-08T19:25:57+5:302024-04-08T19:27:27+5:30

जालना लोकसभा मतदारसंघात सध्या भाजप आणि वंचितचा उमेदवार जाहीर झालेला आहे.

'A head without a hat doesn't look good'; Village visits of candidates in scorching heat | 'विना टोपीचे डोके चांगले दिसत नाही'; रखरखत्या उन्हात उमेदवारांच्या गावभेटी

'विना टोपीचे डोके चांगले दिसत नाही'; रखरखत्या उन्हात उमेदवारांच्या गावभेटी

जालना : एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढत आहे. उन्हाचा पारा ४० अंशांवर गेल्याने सकाळी ९ नंतर घराबाहेर निघणेही नको वाटत आहे. अशा रखरखत्या उन्हातच रविवारी (दि.७ ) रावसाहेब दानवे यांनी गावभेटींचा दौरा केला. कुठे ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या डोक्यावर टोपी ठेवत केलेली मिश्किल टिपण्णी. कुठे मयत मुलाच्या वडिलांचे केलेले सांत्वन तर कुठे वाडीवस्तीवरील नागरिकांच्या समस्या जाणून घेत कार्यक्रमांना हजेरी लावली.

जालना लोकसभा मतदारसंघात सध्या भाजप आणि वंचितचा उमेदवार जाहीर झालेला आहे. महाविकास आघाडीत ही जागा कोणाकडे आणि उमेदवार कोण, हे निश्चित झालेले नाही. त्यामुळे भाजपचे दानवे, वंचितचे बकले प्रचारात आहेत. रविवारी सकाळी ८ वाजताच दानवे यांचा प्रचार सुरू होतो. जालना येथे तेली समाजबांधवांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांचा ताफा भोकरदनच्या दिशेने निघाला.

भोकरदन येथील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी पिंपळगाव गावातील ज्येष्ठांशी संवाद साधला. ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून गावपातळीवरील आढावा घेतला. त्याचवेळी भगवान गावंडे यांच्या डोक्यावर दानवे यांना टोपी दिसली नाही. दानवे यांनी स्वत:ची टोपी काढून त्यांच्या डोक्यावर ठेवत ‘विना टोपीचे डोके चांगले दिसत नाही. तुम्ही पूर्वीही सक्रिय होता आताही सक्रिय व्हा’, असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर लेहा येथील पठाण कुटुंबियाची भेट घेऊन मुलाच्या अपघाती निधनाबाबत शोक व्यक्त केला.

मुंबईतील समस्यांवर भोकरदनमध्ये चर्चा
भोकरदन येथील पक्षप्रवेश सोहळ्यात उपस्थित कठोरा बाजार येथील काही युवकांनी मुंबईत आम्ही राहतो, असे सांगत तेथील समस्या मांडल्या.

साहेब, घरकुलाचं तेवढं बघा
शेलूद येथील गोसावीवाडी येथील वस्तीवरील नागरिकांशी ‘साहेब, आम्हाला घरकुल मंजूर झालेलं नाही. तेवढं घरकुलाचं बघा’, अशी विनंती केली. त्यानंतर दानवे यांचा ताफा वाढोणा गावाकडे वळाला.

अन् दानवे यांनी डोक्याला बांधला गमजा
 उन्हाचा पारा ४० अंशावर गेला आहे. भर उन्हात दानवे यांनी रविवारी पिंपळगाव येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली.
 गाडीतून खाली उतरताच उन्हाचा पारा जाणवला. उन्हापासून बचाव करताना दानवे यांनी डोक्याला गमजा बांधला.
 सोबतच्या कार्यकर्त्यांनाही उन्हापासून बचाव करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

‘वंचित’चे उमेदवारही भेटीला
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बलके यांनी रविवारी दिवसभरात छत्रपती संभाजीनगर, जालना येथे ठिकठिकाणी भेटी देऊन पदाधिकारी, नागरिकांशी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी, संजयनगर, जालना शहरा लगतच्या वस्त्यांना भेटी देऊन बकले यांनी संवाद साधला. यावेळी अनेकांनी पाणी, रस्ता यासह इतर समस्या मांडल्या. जालन्याची ओळख उद्योगनगरी म्हणून असली तरी राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे गरजूंना योजनांपासून वंचित रहावे लागत असल्याच्या समस्याही अनेकांनी मांडल्या. यावेळी बकले यांनी त्या समस्या जाणून घेतल्या.

Web Title: 'A head without a hat doesn't look good'; Village visits of candidates in scorching heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.