गोव्याचा मतदार जागृत; राज्य खूप सुशिक्षित, आधुनिक विचारांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2024 09:20 AM2024-05-07T09:20:13+5:302024-05-07T09:20:38+5:30

मतदारांना विकत घेण्याचे प्रमाण तुलनेने कमी.

Voters of Goa awake; The state is very educated, modern minded | गोव्याचा मतदार जागृत; राज्य खूप सुशिक्षित, आधुनिक विचारांचे

गोव्याचा मतदार जागृत; राज्य खूप सुशिक्षित, आधुनिक विचारांचे

देशाच्या अन्य काही भागांमध्ये प्रचंड गरिबी आहे. साक्षरतेचे प्रमाणही जेमतेम, अंधश्रद्धाही प्रचंड. तुलनेने गोवा राज्य खूप सुशिक्षित, आधुनिक विचारांचे व बुरसटलेल्या रूढी येथे फारच कमी, गरिबीचे प्रमाणही कमी. त्यामुळे मतदारांना विकत घेण्याचे प्रमाण तुलनेने कमी. अर्थात, झोपडपट्टी भागातील काही मतदारांना विधानसभा निवडणुकीवेळी काही मंत्री, आमदार आमिषे दाखविण्यात यशस्वी होत असतात, लोकसभेसाठी आज गोव्यात मतदान होत आहे. विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक यात खूप फरक आहे. विधानसभेवेळी प्रत्येक आमदार, मंत्री किंवा भावी आमदार हा जीव तोडून काम करत असतो. तो स्वतःसाठी काम करतो. आपण जिंकून यायला हवे ही जिद्द असते. यावेळी श्रीपाद नाईक किंवा पल्लवी धेपे यांच्यासाठी भाजपच्या आमदार व मंत्र्यांनी खूप घाम गाळला आहेच. 

मोदी-शाह यांचे आपल्यावर लक्ष आहे याची कल्पना गोव्यातील मंत्री, आमदारांना आहे. केंद्रातील भाजप नेत्यांना प्रभावित करण्यासाठी गोव्यातील काही बड्या राजकारण्यांनी यावेळी खूप कष्ट घेतले. काही जणांना मत्रिमंडळात प्रमोशन हवे आहे, तर काही जणांना आपले मंत्रिपद टिकवून ठेवायचे आहे. त्यामुळे स्वतःच्या खिशातील पैसे खर्चुन यावेळी काही आमदार, मंत्री वावरले. अर्थात, ते काही पल्लवी थेंपे किंवा श्रीपाद नाईक यांच्यावरील प्रेमापोटी वावरले नाहीत किंवा देशात पुढे रामराज्य येईल अशा भाबड्या कल्पनेनेदेखील वावरले नाही. ते स्वतःचे राजकीय भवितव्य अधिक सुरक्षित करण्याच्या हेतूने कामाला लागले. 

गेले महिनाभर अशा काही मंत्री, आमदारांनी खूप काम केले आहेच. हे सगळे मान्य करूनही सांगावे लागेल की शेवटी मतदारराजाच सर्वश्रेष्ठ आहे. जाहीर सभांना प्रचंड गर्दी झाली म्हणजे आपण निवडणुकीत प्रचंड आघाडी मिळवू, असा अर्थ होत नाही. अर्थात, ज्यांच्याकडे आमदार जास्त, कार्यकर्ते जास्त, निधी जास्त आणि अन्य सर्व प्रकारचे बळही जास्त त्यांचे उमेदवार जिंकण्याची शक्यता अधिक असते, असा प्राथमिक निष्कर्ष काढता येतो. काही राज्यांमध्ये असे निष्कर्षदेखील काहीवेळा चुकीचे ठरले व धक्कादायक निकाल आला, असेदेखील घडलेले आहे.

काँग्रेसने गोव्यात यावेळी उमेदवारांच्या फोटोंसह होर्डिंग्ज लावले नाहीत. उत्तर गोव्यात रमाकांत खलप यांनी स्वतः खर्च करूनही होर्डिंग लावले नाहीत. दक्षिण गोव्यातही काँग्रेसचे जास्त होर्डिंग्ज दिसत नाहीत. या उलट भाजपने सगळीकडे मोदींचेच फोटो असलेले होर्डिंग्ज लावले आहेत. पूर्ण गोव्यात शंभर तरी छोटे-मोठे होर्डिंग्ज आहेत. काँग्रेसने दक्षिण गोव्यात जास्त अपेक्षेने निवडणूक लढवली आहे. 

सासष्टी तालुक्याने २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत फ्रान्सिस सार्दिन यांना मोठी आघाडी दिली होती. अर्थात, त्यावेळी आम आदमी पक्षाला साधारण तेरा हजार मते सासष्टीत प्राप्त झाली होती. यावेळी आप वगैरे इंडिया आघाडीसोबत आहेत. मात्र नुवे, मडगाव, कुडतरी हे मतदारसंघ आता काँग्रेसकडे नाहीत. त्यामुळे सासष्टीत काँग्रेसला प्रथमच थोडे तरी आव्हान भाजपकडून मिळाले आहे. मुरगाव तालुक्यात विरियातो फर्नाडिस यांचे काय होईल हे शेवटी आज मतदारच ठरवतील, हिंदू मतदारांच्या पट्टयात भाजपने यावेळी खूप जोर दिला आहे. सर्व पर्यायांचा वापर करत भाजपने सर्व आजी-माजी मंत्र्यांना कामाला लावले. काही माजी आमदारांना पुन्हा पक्षात घेतले.

काँग्रेस पक्ष उत्तर आणि दक्षिण गोव्यातही राष्ट्रीय नेत्यांची मोठी जाहीर सभा घेऊ शकला नाही. भाजपने पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह यांच्या सभा अनुक्रमे सांकवाळ व म्हापसा येथे घेतल्या. भाजपकडे पूर्ण गोव्यात अठरा हजार कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांची, पन्ना प्रमुखांची वगैरे संमेलने भाजपने घेऊन उत्साह निर्माण केला, उत्तरेत रमाकांत खलप मोजक्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरले. 

श्रीपाद नाईक यांना आव्हान देण्यासारखी स्थिती यावेळी होती, पण प्रचाराबाबत काँग्रेसचे मनुष्यबळ काही विधानसभा मतदारसंघांमध्ये कमीच पडले. मुख्यमंत्री सावंत यांनी खलपांची बँकेच्या विषयावरून कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आरजीच्या दोन्ही उमेदवारांनी झोकून देऊन प्रचार केला. आरजीला किती मते मिळतील ते पहावे लागेल, असे राजकीय विश्लेषक बोलतात. शेवटी पावणे बारा लाख मतदार आज सर्वांचे भवितव्य ठरवतील.

 

Web Title: Voters of Goa awake; The state is very educated, modern minded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.