Lok Sabha Election 2019; ६५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:20 AM2019-04-12T00:20:23+5:302019-04-12T00:23:48+5:30

जिल्ह्यातील ९३५ मतदान केंद्रांवर गुरूवारी नवमतदारांसह वृद्ध व दिव्यांगांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे नक्षल दहशत असूनही मतदार संघाची मतदानाची टक्केवारी ६५ पेक्षा जास्त झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या लोकसभा क्षेत्रात ६९.८८ टक्के मतदान झाले होते.

Lok Sabha Election 2019; 65 percent voting | Lok Sabha Election 2019; ६५ टक्के मतदान

Lok Sabha Election 2019; ६५ टक्के मतदान

Next
ठळक मुद्देदुर्गम भागात मतदानात अडथळेनवमतदारांसह भर उन्हात वृद्धांनीही बजावला मतदानाचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील ९३५ मतदान केंद्रांवर गुरूवारी नवमतदारांसह वृद्ध व दिव्यांगांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे नक्षल दहशत असूनही मतदार संघाची मतदानाची टक्केवारी ६५ पेक्षा जास्त झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या लोकसभा क्षेत्रात ६९.८८ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत ही टक्केवारी कमी आहे. दरम्यान मतदानात अडथळे आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी दोन दिवसात तीन भूसुरूंग स्फोट घडविण्यासोबतच गुरूवारी पोलिसांवर फायरिंगही केली. या घटनांमध्ये दोन जवान जखमी झाले आहेत.
या निवडणुकीत भाजपचे अशोक नेते, काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी, वंचित बहुजन आघाडीचे डॉ.रमेशकुमार गजबे, बसपाचे हरिचंद्र मंगाम आणि आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे देवराव नन्नावरे या पाच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त झाले. येत्या २३ मे रोजी एकाच वेळी सर्व ठिकाणची मतमोजणी होणार आहे. त्यामळे मतदारांना निकालासाठी तब्बल सव्वा महिना वाटप पहावी लागणार आहे.
सकाळी ७ वाजतापासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. परंतू शहरी भागात ३ वाजताही मतदारांच्या रांगा लागलेल्या असल्याने त्यांना मतदान केंद्राच्या प्रांगणात घेऊन मुख्य फाटक बंद करण्यात आले. त्यांचे मतदान पूर्ण होण्यास ५ वाजले. विशेष म्हणजे नवमतदारांमध्ये यावेळी मतदानाचा विशेष उत्साह दिसून आले. पहिल्यांदा मतदान करताना ते चांगलेच उत्साही दिसत होते.
गडचिरोलीतील सखी मतदान केंद्रावर सुरक्षेसाठी तैनात कर्मचाऱ्यापासून तर केंद्राधिकारी व इतर कर्मचारी महिलाच होत्या. पंचायत समितीच्या आवारात असलेल्या या केंद्रात लोकमतची चमू पोहोचली त्यावेळी एक पुरूष कर्मचारीही तिथे होता. महिला शिपायाच्या सोबतीला दोन पुरूष होमगार्डही होते. त्यामुळे सबकुछ महिला हे चित्र दिसून आले नाही.
गडचिरोली शहरात जवळपास तीन मतदान केंद्र एकाच शाळेत वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे शहरातील जवळपास सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. मात्र मतदान केंद्रावर अपुºया सोयीसुविधा असल्याने याचा त्रास मतदारांना सहन करावा लागला. काही ठिकाणी पाण्याच्या कॅनही संपल्या होत्या.
कडक ऊन तापत असल्याने मतदान केंद्राच्या परिसरात पेंडॉल टाकणे आवश्यक होते. काही मतदान केंद्रांवर पेंडाल टाकण्यात आले. मात्र सदर पेंडाल अपुरे पडत होते. तीन मतदान केंद्रामधील मतदार एका ठिकाणी जमा झाल्याने मोठी गर्दी झाली होती. काही मतदान केंद्रांवरील पाणी सकाळी ११ वाजताच संपले. त्यानंतर मात्र थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे मतदार पुन्हा घरी जाऊन पाण्याच्या बॉटल आणत होते.
वयोवृध्द मतदार रांगेतच
वयोवृध्द तसेच गरोदर मातांना रांगेत उभे न करता त्यांना सरळ मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे न्यावे, त्यांना प्राधान्याने मतदान करू द्यावे, असे निर्देश निवडणूक विभागाचे आहे. याबाबत बरीच जनजागृती सुध्दा करण्यात आली. मात्र काही नागरिक व कर्मचारी सुध्दा या नवीन नियमाबाबत अनभिज्ञ होते. त्यामुळे वृध्द व गरोदर महिलाही रांगेत लागल्या असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत होते.
ऐन वेळेवर मतदान केंद्र बदलले
कोरची : तालुक्यातील संवेदनशील गावांमधील मतदान केंद्र ऐनवेळेवर बदलविण्यात आले. त्यामुळे मतदारांची चांगलीच गैरसोय झाली. तालुक्यातील भीमनखुजी मतदान केंद्रावर हेलिकॉप्टरने मतदानाची पार्टी पाठविण्यात आली होती. पण सदर केंद्र अतिसंवेदनशील असल्याच्या कारणावरून १५ किमी अंतरावरील ग्यारापत्ती येथे केंद्र हलविण्यात आले. नाडेकल येथील मतदान केंद्र १४ किमी अंतरावरील ढोलडोंगरी येथे हलविले. लेकुरबोडीचा मतदान केंद्र ३किमी अंतरावरील नवेझरी येथे हलविले. आलोंडीचा मतदान केंद्र ५ किमी अंतरावरील पिटेसूर येथे हलविले. गोडरीचा केंद्र ७ किमी अंतरावरील सोनपूर येथे हलविले. सावली येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र प्रभूदास लाडे यांच्या घरी हलविण्यात आले. त्यांच्या घरी नुकताच लग्नाचा कार्यक्रम पार पडला होता. लग्नाच्या मंडपातच मतदान केंद्र सुरू केले. सुरक्षेच्या कारणास्तव सदर मतदान केंद्र हलविण्यात आले. मात्र मंडपात कोणती सुरक्षा होती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कैमुल येथील जि. प. शाळेतील मतदान केंद्र सुदाराम मेश्राम यांच्या घरी हलविले. सावली व तैमुल येथील नागरिकांना विचारपूस केली असता, यापूर्वीच्या निवडणुका शाळेतच झाल्याचे सांगितले.
भाडभिडीत दीड तास उशिरा मतदान सुरू
घोट : भाडभिडी मतदान केंद्रावर पोलिंग पार्ट्या नियोजित वेळेवर पोहोचल्या. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात होणार होती. मात्र ईव्हीएमचे कनेक्शन लूज होते. झोनल आॅफिसरने मशीन बदलवून दिल्यानंतर ९ वाजताच्या दरम्यान मतदान सुरू झाले. भाडभिडी केंद्रावर बिलासपूर, भाडभिडी, राजूर बू., राजूर खुर्द, जानाळा, जंगमपूर, लभानतांडा या सात गावांचा समावेश होता. या मतदान केंद्रांवर एकूण १ हजार ७५ मतदार होते.

Web Title: Lok Sabha Election 2019; 65 percent voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.