...म्हणून ‘पाटील’ पुन्हा प्रदर्शित केला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 07:12 PM2019-01-07T19:12:18+5:302019-01-07T19:13:11+5:30

रा संतोष राममीना मिजगर दिग्दर्शित 'पाटील' हा चित्रपट पुन्हा एकदा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला.

... so 'Patil' marathi movie was released again | ...म्हणून ‘पाटील’ पुन्हा प्रदर्शित केला

...म्हणून ‘पाटील’ पुन्हा प्रदर्शित केला

googlenewsNext
ठळक मुद्देएका सरळमार्गी आणि मध्यमवर्गीय माणसाची कथा 'पाटील' चित्रपटात

आज 'जात' नावाच्या विषाणूने अवघा महाराष्ट्र पोखरून काढलाय. आरक्षणाच्या मुद्दावरून गल्लीपासून दिल्लीपर्यंत रणकंदन चालू आहे. विविध मतमतांतरं आणि त्यावरून केलं जाणारं राजकारण यात सर्वसामान्य माणसाची मात्र फरपट होत आहे. या वास्तवावर परखड भाष्य करणारा संतोष राममीना मिजगर दिग्दर्शित 'पाटील' हा चित्रपट पुन्हा एकदा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला. 

'पाटील' या चित्रपटातून 'शिवाजी पाटील' या एका सरळमार्गी आणि मध्यमवर्गीय माणसाची कथा रंगवण्यात आली आहे. स्वत:च्या अस्तित्त्वासाठी संघर्ष करताना झोपी गेलेल्या समाजाला जागं करत तो समाज आणि सरकार यांना ललकारतो. पण चित्रपटातला हा संघर्ष केवळ अस्तित्त्वापुरता मर्यादित नसून या संघर्षाला प्रेमाची हळवी किनार सुद्धा आहे. हे प्रेम आहे वडिल आणि मुलामधलं.. त्याचप्रमाणे हे प्रेम आहे कृष्णा आणि पुष्पा मधलं. दमदार कथानक आणि त्याची उत्कृष्ट मांडणी असूनही ‘पाटील’ चित्रपट पुन्हा का प्रदर्शित करावा लागला याबद्दल दिग्दर्शक संतोष राममीना मिजगर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
‘ज्यावेळी मी सगळ्यात पहिल्यांदा २६ ऑक्टोबर तारखेला चित्रपट प्रदर्शित केला तेव्हा चित्रपटगृह मिळवताना मला खूप मेहनत करावी लागली. आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींसाठी ज्याप्रमाणे मला संघर्ष करावा लागला तो संघर्ष मला इथेही चुकला नाही. पण हे केवळ माझ्याचबाबतीत झालं असं नाही. आज मराठी चित्रपटाला अगदी प्राथमिक गोष्टींसाठीही संघर्ष करावा लागतो. २६ ऑक्टोबर ला ‘पाटील’ प्रदर्शित केला. पण त्याचवेळी दिवाळीची गडबड सुरु झाली त्यामुळे लोकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघायला सवड मिळाली नाही. त्याचसुमारास हिंदी मधला एक बिग बजेट सिनेमा प्रदर्शित झाला. त्यामुळे ‘पाटील’चे शो रद्द करून ते हिंदी सिनेमाला देण्यात आले.
आपण स्वतःचा चित्रपट काढायचा हे माझं बालपणापासूनच स्वप्न होते. लहानपणी एकवेळ जेवण नाही मिळालं तरी चालेल पण मला सिनेमा बघायचा हा माझा हट्ट असायचा. स्वप्नांचा प्रवास कधीच सोपा नसतो. सिनेमाबद्दल मला लहानपणापासूनच प्रचंड आकर्षण होत. पण गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मल्यामुळे चित्रपट क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी मला मिळाली नाही. चित्रपटाच्या माझ्या या आवडीकडे कायमच सगळ्यांनी एक ‘वेड’ म्हणून पाहिले आणि याच सिनेमाच्या वेडापाई मी मुंबई गाठली. पण प्रवास सोपा नव्हता. सुरवातीला माझ्या पदरी निराशाच पडली. पदोपदी अवहेलना, अपमान झेलावा लागला. गोरेगाव येथील चित्रनगरीत मला प्रवेश नाकारला गेला. पण याच चित्रनगरीत मानाने प्रवेश करेन अशी खुणगाठ मनाशी बांधून मी पुन्हा जोमाने प्रयत्न करू लागलो. आज त्याच चित्रनगरी बाहेर माझे स्वतःचे कार्यालय आहे आणि त्या फिल्म सिटीची टूर काढण्याचे कंत्राट माझ्या कंपनीकडे आहे. या स्वप्नांचा मागोवा घेताना असंख्य चढ-उतरांना सामोरे जावे लागले. रोजगारासाठी मी अक्षरशः एका बिल्डींग बाहेर सुरक्षारक्षकाचेही काम केले, आज त्याच बिल्डींगमध्ये माझे स्वतंत्र कार्यालय आहे. असंख्य अडचणी, अगणित समस्या या सगळ्यांवर मात करत मी जिद्दीने माझ्या स्वप्नांचा मागोवा घेतला. माझे स्वप्न मी सत्यात उतरवले आहे, पण या यशाचा केवळ मी एकटाच वाटेकरी नाही. माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद, कुटुंबियांची साथ आणि मित्रमंडळींचे पाठबळ यामुळे माझे मनोबल टिकून राहिले आणि माझा प्रवास सुकर झाला.
अथक प्रयत्न केल्यानंतर माझं हे स्वप्न ‘पाटील’ च्या निमित्ताने पूर्ण झालं. पण माझ्या नशिबातला संघर्ष इथे संपला नव्हता. मी हा चित्रपट केवळ पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला नाही तर सुस्त समाज आणि उन्मत्त प्रशासन यांना वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी आणि समाजातलं भीषण वास्तव सगळ्यांसमोर आणण्यासाठी मी हा चित्रपट केलेला आहे. ‘जात-पात’ आणि ‘आरक्षणाच्या’ अजगराने आज विळखा घातलेला असताना स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या क्षमता पडताळून पाहण्याची जिद्द तरुणांमध्ये निर्माण करणे हा माझा मुख्य हेतू आहे. ‘मेहनत’, ‘जिद्द’ आणि ‘आत्मविश्वास’ यांच्या बळावर अशक्य ते शक्य करता येऊ शकत हा संदेश मला आजच्या तरुण पिढीला द्यायचा होता. पण चित्रपटगृहांची कमतरता आणि इतर अनेक कारणांमुळे म्हणावा तसा हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचला नाही, त्याचा अपेक्षित परिणाम साधला गेला नाही. म्हणूनच चित्रपटला सामाजिक संदेश तळागाळातल्या लोकांपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचवण्यासाठी मी ‘पाटील’ चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केला.
आज हा चित्रपट लोकप्रतीनिधिनींच्या कौतुकास पात्र ठरला आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या कथानकात संघर्ष आहे, हा चित्रपट निर्माण करताना मला प्रचंड संघर्षाला समोर जावं लागलं आहे आणि चित्रपट प्रदर्शित करतानासुद्धा हा संघर्ष माझ्या नशिबी आला. पण खचून न जाता ‘प्रयत्नांती परमेश्वर’ या उक्तीवर विश्वास ठेऊन मी प्रयत्न करत राहिलो आणि त्या प्रयत्नांचे फलित मला ‘पाटील’ च्या यशातून मिळत आहे.       

 


 

Web Title: ... so 'Patil' marathi movie was released again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.