भाऊ कदमने भावनांना मोकळी करुन दिली वाट,वाचा सविस्तर

By सुवर्णा जैन | Published: August 13, 2018 12:25 PM2018-08-13T12:25:26+5:302018-08-13T12:46:48+5:30

‘लिफ्टमन’ 'झी 5' ची ही धम्माल वेबसिरीज आहे. या वेबसिरीजमध्ये भाऊ कदम लिफ्टमनच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मराठीसह अन्य दहा भाषांमध्ये लिफ्टमन ही वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Chala Hawa Yeu Dya Fame Bhau kadam Got too Emotional And Untold Story Come Out From Him | भाऊ कदमने भावनांना मोकळी करुन दिली वाट,वाचा सविस्तर

भाऊ कदमने भावनांना मोकळी करुन दिली वाट,वाचा सविस्तर

googlenewsNext

सुवर्णा जैन

'चला हवा येऊ दया' या शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर आणि रसिकांचं धम्माल मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे भाऊ कदम.कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि वैविध्यपूर्ण व्यक्तीरेखा साकारणाऱ्या भाऊ कदमने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. आता भाऊ 'लिफ्टमन' बनून रसिकांच्या भेटीला येत आहे. याचनिमित्ताने भाऊ कदमसह मारलेल्या खास गप्पा. 


लिफ्टमन’ म्हणून लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहात,काय सांगाल या विषयी?

'झी 5' ची ही धम्माल वेबसिरीज आहे. सध्याचं हे युग मोबाईल आणि स्मार्ट फोनचं युग आहे. कामात असणाऱ्यांना त्यांच्या बिझी शेड्युलमध्ये मोबाईल किंवा स्मार्ट फोनवरच बघता यावं, त्यांचं मनोरंजन व्हावं या दृष्टीने ही नवी वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येत आहे. या वेबसिरीजमध्ये लिफ्टमनच्या मुख्य भूमिकेत मी दिसणार आहे. ही संधी मला दिल्याबद्दल झी5चे मनापासून आभार व्यक्त करतो. मराठीसह अन्य  दहा भाषांमध्ये लिफ्टमन ही वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम,  बंगाली आणि इतर भाषांमध्ये लिफ्टमन रसिकांचं मनोरंजन करेल.

 

या वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी आपण खऱ्याखुऱ्या लिफ्टमनची भूमिका साकारली कसा होता हा अनुभव ?

हा अनुभव खरंच खूप मजेशीर होता. झीच्या कार्यालयातील लिफ्टमध्ये लिफ्टमन म्हणून काम करण्याचा अनुभव धम्माल होता. यावेळी लिफ्टमध्ये प्रवेश करणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसत होता. काहींनी ओळखलं आणि विचारलं तुम्ही भाऊ आहात ना?, काही जण बोलू की नको बोलू अशा मनःस्थितीत होते. लिफ्टमध्ये कॅमेरे लागले होते, ते पाहून काहींना अंदाज आला की भाऊ कदमच आहेत आणि लिफ्टमनची शुटिंग सुरु आहे का असे अनेक प्रश्न मला विचारण्यात आले. मात्र काही काळ का होईना खराखुरा लिफ्टमन बनण्याची संधी या निमित्ताने लाभली आणि त्याचा आनंद घेतला.

 

डोंबिवली आणि आपलं अतूट नातं आहे. डोंबिवलीतल्या रस्त्यावरुन फिरताना कसे अनुभव येतात?

डोंबिवली आणि डोंबिवलीकरांशीही माझं आपुलकीचे नातं आहे. डोंबिवलीचे नागरिकही आपला माणूस असल्याप्रमाणे आपुलकीने माझ्याशी वागतात, बोलतात आणि चौकशी करतात. सोमवार आणि मंगळवारी मी विशेषतः डोंबिवलीकरांना दिसतो. त्यावेळी रस्त्यावर फिरताना दिसलो की लोक आस्थेने विचारपूस करतात. मित्रांप्रमाणे वागतात आणि बोलतात.

 

आजवर आपण बरंच काम केलंय आणि बरीच लोकप्रियता तसंच यश मिळवलंय. तरी मागे वळून बघताना आपण कोणती गोष्ट मिस करता?
आजवर जे काही काम वाट्याला आलं ते केलं. कुठलंही काम छोटं किंवा मोठं असं न मानता प्रामाणिकपणे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आज वेबसिरीजमध्ये काम करतो आहे. मात्र मागे वळून बघताना वाटतं की आजवर जे काही काम केले आहे ते केलं नसतं तर आजचं काम मिळालंच नसतं. त्यामुळे आजवर केलेल्या कामामुळेच यश मिळत असल्याचं मला वाटतं.

'चला हवा येऊ द्या' या शोच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र तुमच्यावर प्रेम करतो, प्रसिद्धी, पैसा लोकप्रियता मिळाली असली तरी बिझी शेड्युअलमुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही याची खंत वाटते का?

प्रत्येकजण आपल्या माणसांसाठी, आपल्या कुटुंबासाठी काम करत असतो. माझ्या कुटुंबीयांनाही माहिती आहे की मी त्यांच्यासाठी काम करतो. माझ्या कामाचा त्यांना आनंद आहे. मला कितीही रात्री उशीर झाला तरी माझी मुलं माझी वाट पाहत असतात. रात्री 1 किंवा दीड वाजता मी घरी पोहचलो की ते खूप खूश होतात. त्यांची धम्माल मस्ती सुरु होते. त्यांच्याकडे पाहून मलाही वेगळा आनंद मिळतो. मात्र मी कधी येतो कधी जातो हे त्यांना कळत नाही. दौऱ्यावर असलो की माझी मुलं आणि कुटुंबीय मला जास्त मिस करतात. कारण त्यावेळी मी त्यांना भेटत नाही. आज काम आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, मात्र कुटुंबीयांसाठी वेळ नाही देऊ शकत याची मनापासून खंत वाटते.

 जर खरोखर टाईम मशीन असती तर रिवाइंड करुन कोणता काळ बदलावासा वाटेल ?

 बालपण तर प्रत्येकाला हवंहवंसं वाटतं. मात्र टाईममशिन असतं तर मला माझ्या वडिलांनी हे माझं यश पाहायला हवं होतं असं वाटतं. कारण ते गेले त्यावेळी मी या क्षेत्रात नव्हतो. मी या क्षेत्रात येईल आणि काही तरी करेन असं त्यांना वाटलंही नसेल. मात्र प्रत्येकाच्या पालकांची इच्छा असते की आपल्या मुलांनी नाव कमवावं, यश मिळवावं. आज माझं जे काही काम आहे ते पाहायला माझे वडील नाहीत. टाईम मशिनद्वारे त्यांच्यासोबत वेळ घालवावा असं वाटतं. ते माझ्यासोबत हवे होते.

 

भाऊ कदम सतत रसिकांना हसवत असले तरी ते खूप भावनिक आहेत. अशी कोणती गोष्ट आहे जी भाऊ यांना आजही अस्वस्थ असते?

 2000 साली माझ्या वडिलांचं निधन झालं. ते रिटायर झाले आणि काही दिवसांनी त्यांचं निधन झालं. ते गेले तेव्हा आमची परिस्थिती वेगळी होती. आता मला जे त्यांना द्यावं वाटतं किंवा त्यांनी बघावं वाटतं ते मी करु शकत नाही. म्हणजेच आज माझी स्वतःची गाडी आहे. त्यांना मी सांगेन चला गाडीत फिरायला जाऊ, किंवा तुम्ही आणि आई फिरायला जा असं त्यांना सांगू शकत नाही... वडील सोबत नाहीत ही आयुष्यातील कायमस्वरुपी खंत आहे.

आजवर आपण विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. कॉमेडी तर सर्वात जास्त अशी कोणती भूमिका आहे की जी साकारण्याची इच्छा आहे ?

आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. कॉमेडी भूमिकांना रसिकांनी डोक्यावर घेतलं. आजही खूप काम करायची इच्छा आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारायच्या आहेत. समोरच्या व्यक्तीला म्हणजे रसिकांना मी कोणत्या भूमिकेत पाहायला आवडेन त्या भूमिका मला करायच्या आहेत. कॉमेडी असेल तर कॉमेडी किंवा अन्य कोणतीही भूमिका जी रसिकांना आवडेल ती भूमिका करायची आहे. नुकतंच एक सिनेमात काम केले आहे. या सिनेमात गंभीर भूमिका साकारली आहे.

सध्या बायोपिकचा जमाना आहे. तुम्हाला बायोपिकमध्ये काम करायला आवडेल का आणि कोणत्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल?

माझं आणि लोककलांचं वेगळं नातं आहे. लोककला आणि लोककलाकारांशी वेगळा जिव्हाळा आहे. त्यामुळे लोककलेशी संबंधित बायोपिक करायला आवडेल.

 

भाऊ कदम आज सगळ्यांना आवडतात. विनोदवीर भाऊ म्हणून तुम्ही रसिकांचे लाडके झाले आहात.विनोद करताना काय काय काळजी घेता?

आजही जे काही काम करतो ते जबाबदारीने करतो. कोणतंही काम करायचं म्हणून अजिबात करत नाही. मी जे काही विनोद करतो ते आधी मला कळायला हवेत. मला हसायला यायला हवं. मी जर हसलो आणि मला विनोद कळला तर ते रसिकांना कळतील. माझे विनोद लहान मुलं, आजी आजोबा सगळ्यांना कळतात. त्यामुळे रसिकांचं प्रेम मिळतं असं वाटतं.

 

ही इंडस्ट्री ग्लॅमरची आहे, पैसा आणि प्रसिद्धी इथे आहे. मात्र इथली कोणती गोष्ट भाऊ कदमला खटकते?

थोडं यश मिळालं की इथं माणूस बदलू लागतो. मात्र हे यश मिळवताना ज्या माणसांनी कठीण काळात त्याला मदत केली ते मित्र किंवा जवळच्या माणसांना तो विसरु लागतो. काही कलाकार मोठे होतात आणि आपल्या या जवळच्या व्यक्तींना गमावून बसतात. मात्र वेळ कधीच सारखी राहत नाही हे आपण पाहिले आहे. कारण प्रसिद्धीच्या शिखरावर असणारे अनेकजण तितक्याच वेगाने खालीही येतात, त्यांचा शेवट फार वेगळा होतो असं आपण पाहिलं आहे. त्यामुळे कलाकारांनी कधीही आपल्याच जवळच्या व्यक्तींना विसरु नये असं मला वाटतं. कारण सरतेशेवटी पुन्हा आपल्याला जवळ घेणारी आणि समजून घेणारी तीच माणसं असतात. त्यामुळे कठीण समयी साथ देणाऱ्या व्यक्तींना विसरु नका असं वाटतं.   

 

भाऊ तुमच्या मुलाखतीमध्ये अनेकदा ऐकलंय की रोजच्या प्रवासामुळे झोप पूर्ण व्हायची नाही आणि त्यामुळे डायलॉग विसरायचा, त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.

'चला हवा येऊ द्या' या शो काही वेळापत्रक नसतं. आम्ही सकाळी सहा सेटवर गेलो की दुसऱ्या दिवसापर्यंत काम करतो. सुरुवातीच्या काळात प्रवास खूप करायचो. एक शूट संपलं की दुसऱ्या शूटसाठी जायचो. त्यामुळे त्याचा ताण यायचा. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता लागोपाठ शूटिंगला जात नाही. आराम करणंच मी पसंत करतो. आता तर शूटिंगनंतर रात्री 3 ते 4 पर्यंत झोप लागत नाही. मग काय सकाळी झोप येते. मग अशावेळी शूटिंगला जाता जाता कारमध्येच डुलकी मारतो.


 

Web Title: Chala Hawa Yeu Dya Fame Bhau kadam Got too Emotional And Untold Story Come Out From Him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.