एका नटाचे अंतर्बाह्य जगणे!

By Admin | Published: January 8, 2017 02:14 AM2017-01-08T02:14:11+5:302017-01-08T02:14:11+5:30

रंगभूमीच्या अवकाशात स्वच्छंद विहार करणारे अनेक असतात आणि त्याचबरोबर रंगमंचाच्या विंगांमध्ये आयुष्य जगणारेही काही असतात. काही जणांच्या नशिबात रंगभूमीवरच्या प्रकाशात

Living inside of a nostril! | एका नटाचे अंतर्बाह्य जगणे!

एका नटाचे अंतर्बाह्य जगणे!

googlenewsNext

- राज चिंचणकर

नाटक - अंधारातील स्वगत 

रंगभूमीच्या अवकाशात स्वच्छंद विहार करणारे अनेक असतात आणि त्याचबरोबर रंगमंचाच्या विंगांमध्ये आयुष्य जगणारेही काही असतात. काही जणांच्या नशिबात रंगभूमीवरच्या प्रकाशात न्हाऊन निघण्याचे भाग्य असते; तर काही जण मात्र विंगांच्या आडवाटेवरच रेंगाळत राहतात. जे या प्रकाशात चमकतात त्यांच्या अवतीभवतीही अशा काही व्यक्ती असतात; ज्यांच्यावर हा प्रकाशझोत पडता पडता राहून जातो. पण म्हणून काही ते ‘रंगकर्मी’ या बिरुदावलीपासून दूर राहत नाहीत. मात्र काळाच्या ओघात न बदलण्याची त्यांची वृत्ती आड येते आणि मग त्यांच्या वाट्याला रंगभूमीवरचा अलिप्तपणा येतो. प्रकाशाऐवजी त्यांच्या वाटेवर अंधारच अधिक दाटतो आणि रंगमंचाच्या ऐवजी विंगाच त्यांना जवळच्या वाटू लागतात.
अंधारातील स्वगत ही नाट्यकृती अशाच काही विचारांमध्ये गुंतवून टाकते. नटाला स्वत:चे एक आणि दुसरे रंगभूमीवरचे, अशी दोन आयुष्ये जगावी लागतात. त्यातून मध्य शोधत त्याची नट बनण्याची प्रक्रिया आकाराला येत असते. या नाट्यकृतीतला नटसुद्धा खऱ्या अर्थाने त्याच्या ‘एन्ट्री’ची वाट पाहत विंगेत थांबला आहे. लौकिकार्थाने रंगभूमीवर त्याची प्रत्यक्ष एन्ट्री आधीच झालेली असली; तरी त्याच्या अंतर्मनातली एन्ट्री अजून बाकी आहे. या ‘बिटवीन द लाइन्स’मध्ये तो स्वगताच्या माध्यमातून संवाद साधत राहतो आणि त्याचे एकूणच जगणे दृश्यमान होऊ लागते. या प्रयोगाला ठोस असे कथानक नाही; मात्र एका नटाचे अंतर्बाह्य जगणे हा प्रयोग थेट मंचित करत जातो.
रंगभूमीवर पाऊल टाकणारे सगळेच काही उच्चपदाला जाऊन पोहोचत नाहीत. पण त्यांचे योगदान मात्र कुठेही कमी नसते. रंगभूमीवरच्या नटाला काही शाप असल्याचा उद्गार नाट्यसृष्टीत अनेकदा उमटत असतो. नटसम्राट होणे किंवा न होणे यात त्याच्या कर्तृत्वासोबत त्याचे नशीब आणि हे शापही कारण ठरतात बहुधा! पण म्हणून काही तो नट शापित म्हणून ओळखला जात नाही. पण या अनुषंगाने त्याला ‘शापित गंधर्व’ असे म्हणणे अधिक उचित ठरेल. कारण काही झाले तरी नट हा रंगभूमीवरचा राजा असतो आणि रंगभूमीवर तो मुक्तपणे राज्य करत असतो.
लेखक व दिग्दर्शक प्रसाद भिडे याने हे सर्व मांडताना स्वगतांचा फॉर्म निवडला आहे. त्याला या प्रयोगातून नटाचे आत्मचरित्र सांगायचे नाहीय आणि नटाची शोकांतिकाही सांगायची नाहीय; खरे तर तशी ती होऊ द्यायची नाहीय. तर एका नटाला अगदी आतून समजून घेण्याचा त्याचा हा प्रयत्न आहे. त्याचबरोबर नटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या काळाला ताडून पाहण्याची त्याची वृत्ती यात प्रकर्षाने दिसते. नट हे एक माध्यम पकडून दोन पिढ्यांचा तोलही त्याने सांभाळण्याचे काम यात केलेले आहे.
एक प्रमुख पात्र आणि त्यांना नाट्यसंगीतातून साथ देणारी दोन पात्रे अशी निवडक पात्रयोजना करून त्याने फाफटपसारा टाळला आहे. या प्रयोगात स्वगतांसह काही नाट्यपदांचा चपखल वापर करण्यात आला असून, ती या प्रयोगात सहजतेने मिसळून गेली आहेत. मात्र या प्रयोगातल्या काही स्वगतांच्या वेळेवर मर्यादा हवी होती; तसेच अजून एखाददुसरे गद्य पात्र यात आणले गेले असते तर प्रयोगाची रंजकता अजून वाढली असती. कारण तशी योजना मूळ संहितेत केल्याचे दिसते; परंतु सादरीकरणात मात्र त्याला कात्री लावल्याचे जाणवत राहते.
रमेश भिडे या अनुभवी रंगकर्मीने हा प्रयोग एकट्याच्या खांद्यावर पेलला आहे. अर्थात, रंगभूमीवरच्या त्यांच्या गाढ अनुभवाचे प्रकटीकरण यात जसे दिसते; तसेच त्या अनुभवाचे प्रतिबिंबही तितक्याच नजाकतीने यात पडलेले दिसते. विविध स्वगतं सादर करताना त्यांनी उच्चारशास्त्र व देहबोलीचा उत्तम उपयोग करून घेत सहजाभिनयाचा आविष्कार पेश केला आहे. तर नाट्यपदांच्या माध्यमातून अनुराधा केळकर व धवल भागवत या दोघांची प्रयोगाला लाभलेली सूरमयी साथही महत्त्वाची आहे. सुखदा भावे-दाबके (पार्श्वसंगीत), सुबोध गुरुजी (नेपथ्य), हेमंत कुलकर्णी (प्रकाशयोजना) यांची यातली कामगिरी पूरक आहे. एकूणच, एका नटाचे आतले जगणे रेखाटणारा रंगभूमीवरचा एक आगळावेगळा प्रयोग म्हणून या नाट्यकृतीची दखल घ्यावी लागेल.

Web Title: Living inside of a nostril!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.