चिमुकल्यांच्या निरागस स्वप्नांचे 'हाफ तिकीट'

By Admin | Published: July 23, 2016 09:54 AM2016-07-23T09:54:10+5:302016-07-23T09:59:11+5:30

दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक करण्याची पद्धत आपल्याकडे काही नवीन नाही. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांना मराठमोळा तडका याआधी दिला गेलाय.

'Half-ticket' dreams of youngsters | चिमुकल्यांच्या निरागस स्वप्नांचे 'हाफ तिकीट'

चिमुकल्यांच्या निरागस स्वप्नांचे 'हाफ तिकीट'

googlenewsNext
>मराठी चित्रपट : हाफ तिकीट
प्रियंका लोंढे
दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक करण्याची पद्धत आपल्याकडे काही नवीन नाही. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांना मराठमोळा तडका याआधी दिला गेलाय. चित्रपटाची गोष्ट मालमसाला लावून, रंगवून प्रेक्षकांसमोर पेश करण्याची मजा या साऊथ सिनेमांमध्ये असते. काक मुत्ताई या अशाच एका साऊथ सिनेमाचा रिमेक दिग्दर्शक समित कक्कड यांनी मराठीमध्ये केला अन् साऊथचा सिनेमाही फिका पडेल अशी दोन चिमुकल्यांची कथा त्यांनी हाफ तिकीटच्या माध्यमातून पडद्यावर रंगविली. 
झोपडपट्टीत आई अन् आजीसह राहणार्‍या दोन भावांची ही गोष्ट सुरू होते त्यांच्या दैनंदिन प्रवासापासून. ट्रेनच्या पटरीवर जाऊन कोळसा गोळा करून तो विकून पैसे कमावणे हे यांचे जीवन. वडील जेलमध्ये असल्याने आई मोलमजुरी करून घर चालवीत असते. जवळच एक पिझ्झाचे दुकान सुरू होते आणि मग या दोन चिमुकल्यांच्या संघर्षाची कहाणी इथूनच वेग घेते. आपल्याला त्या दुकानात जाऊन पिझ्झा खायचा हे ध्येयच जणू काही हे चिमुकले उराशी बाळगतात. ३00 रुपयांचा तो पिझ्झा कोळसा विकणारी ही मुले काय खाणार, म्हणून मित्रांमध्ये त्यांची हेटाळणी होते. पण काही झाले तरी आम्ही पिझ्झा खाणारच, हा हट्ट काही ते सोडत नाहीत. त्यांच्या या भाबड्या इच्छेची ही सुंदर गोष्ट आहे. 
झोपडपट्टीमध्ये जरी हे कुटुंब राहत असले तरी आपल्या परीने जगण्याचा पुरेपूर आनंद घेणारे हे दोन भाऊ पाहताना त्यांची दया येण्यापेक्षा चेहर्‍यावर हसू खुलते. अगदी छोटे छोटे प्रसंग भावनिक करून त्याला वास्तवाची जोड देण्यात आली आहे. संपूर्ण सिनेमा हा झोपडपट्टीत जरी चित्रित करण्यात असला तरी त्यातील लोकेशन्स महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. भंगाराचे दुकान, रेल्वेची पटरी, नाल्याच्या कडेला असलेले घर, पाइपलाइन या गोष्टी दिग्दर्शकाने योग्य रीतीने टिपल्या आहेत. चित्रपटातील रुबाब अन् चल चल चल ही गाणी ऐकताना अन् पाहताना अप्रतिमच वाटतात. संगीत ही या कथेची जमेची बाजू असल्याचे या गाण्यांतून दिसून येते. 
प्रियांका बोस या बंगाली अभिनेत्रीने अस्खलित मराठी बोलून अगदी काळीज पिळवटून टाकेल अशी आई साकारली आहे. दोन्ही मुलांप्रती असलेली काळजी अन् काही भावनिक प्रसंग प्रियांकाने लाजवाब साकारले आहेत. तर उषा नाईक यांच्यामध्ये नातवांवर जीव ओवाळणारी आजी दडलेली आहे. भाऊ कदम यांनी साकारलेले टुटीफ्रुटी हे पात्रदेखील विशेष लक्षणीय आहे. तर झोपडपट्टीतील वास्तव जीवन दाखविण्यासाठी वापरण्यात आलेल्या लहान मुलांचा ग्रुप किंवा दोन चोरटी पोरं, भंगारवाल्याची बायको यांच्यामुळे सिनेमा जास्त उठावदार व्हायला मदत होते.
राजकारणी, व्यावसायिक अन् जनतेसाठी काम करणारे कार्यकर्तेदेखील वेळ पडल्यास काय करू शकतात, हे उत्तम प्रकारे सिनेमात उतरविण्यात आले आहे. उत्तम दिग्दर्शन, छायांकन, पटकथा, संवाद, अगदी छोट्या छोट्या कॅरेक्टर्सचा अभिनयसुद्धा लक्षात राहतो. या दोन हाफ तिकिटांच्या स्वप्नांची ही सुंदर कथा नक्की अनुभवण्यासारखी आहे
 

Web Title: 'Half-ticket' dreams of youngsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.