‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’च्या रीलीजचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 04:43 AM2019-01-25T04:43:12+5:302019-01-25T04:43:33+5:30

राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारलेला व कंगना राणौत मुख्य भूमिकेत असलेला ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Fill the release of 'Manikarnika - The Queen of Jhansi' | ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’च्या रीलीजचा मार्ग मोकळा

‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’च्या रीलीजचा मार्ग मोकळा

मुंबई : राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारलेला व कंगना राणौत मुख्य भूमिकेत असलेला ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटात काही सत्यघटना चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्या असल्याचा आरोप करीत राणी लक्ष्मीबाई यांचे वंशज विवेक तांबे यांनी हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची मागणी उच्च न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने त्यांना तूर्तास दिलासा देण्यास नकार दिला.
राणी लक्ष्मीबाई यांचा इतिहास मांडताना बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने अनेक चुका केल्याचा आरोप व्यवसायाने वकील असलेले विवेक तांबे यांनी याचिकेद्वारे केला आहे.
याचिकेनुसार, राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १८३५ मध्ये झाला. मात्र, चित्रपटात त्यांचा जन्म १८२८ मध्ये झाल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच चित्रपटाच्या काही दृश्यांत राणी लक्ष्मीबाई यांचा गर्भपात झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीही घडले नाही.
याचिकेला विरोध करताना निर्मात्यांनी न्यायालयाला सांगितले की, राणी लक्ष्मीबाई यांचे जन्मवर्ष इतिहासकारांनी सांगितल्याप्रमाणेच चित्रपटात नमूद करण्यात आले आहे. तसेच चित्रपटात त्यांचा गर्भपात झाल्याची दृश्ये दाखविण्यात आलेली नाहीत.
तर सीबीएफसीतर्फे अ‍ॅड. अद्वैत सेठना यांनी न्यायालयाला सांगितले की, सीबीएफसीच्या समितीने सर्व बाबींचा विचार करूनच चित्रपटाला परवानगी दिली आहे. तसेच चित्रपट सुरू होण्यापूर्वी सूचना देण्यात आली आहे. त्या सूचनेत नमूद करण्यात आले आहे की, या चित्रपटातील काही भागांचे नाट्यरूपांतर करण्यात आले असून काही भाग काल्पनिक आहे. समाजातील कोणत्याही व्यक्तीच्या किंवा समूहाच्या भावना दुखविण्याचा उद्देश नाही, असे सेठना यांनी न्यायालयाला सांगितले.
>दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश
सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने आपण अंतरिम दिलासा देऊ इच्छित नसल्याचे याचिकाकर्त्यांना सांगितले. मात्र, निर्मात्यांना या याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Fill the release of 'Manikarnika - The Queen of Jhansi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.