Positive atmosphere | सकारात्मक वातावरण

- कौशल इनामदार

चित्रपट संगीतासाठी २०१७ वर्ष अत्यंत चांगले वर्ष गेले. ‘हंपी’, ‘मुरांबा’, ‘फास्टर फेणे’, ‘उबंटू’ अशा चित्रपटांतून संगीतात केलेले विविध प्रयोग ऐकायला मिळाले. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. तसेच नाटकांबाबतीत प्रयोग झाले. ‘मत्स्यगंधा’, ‘पती गेले ग काठेवाडी’ ही जुनी नाटके पुन्हा आली. तर ‘संगीत देवबाभळी’ हे नवीन नाटक आले. या नाटकांनी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.
मी आगामी चित्रपटासाठी एका गाण्याचे अमेरिकेत रेकॉर्डिंग केले. ते अमेरिकन वादकांनी वाजवले. या गोष्टीला पुढील काळात चालना मिळेल, असे वाटते. येणारे वर्ष हे मराठी संगीत आणि सोशल मीडिया यांच्यातील नाते अधिक स्पष्ट व घट्ट करेल. कारण श्रोते व संगीततज्ज्ञात कोणी मध्यस्थी करणार नाही. त्यांचे डायरेक्ट नाते तयार होईल, त्यामुळे प्रयोगांना वाव मिळेल. हे सकारात्मक पाऊल ठरेल. एकेकाळी भावगीते, लोकसंगीत हे गैरफिल्मी संगीत आपली जीवनरेखा होती. मध्यंतरीच्या काळात हे प्रकार मरणासन्न अवस्थेत होते. सोशल मीडियामुळे या गाण्यांनाही प्रोत्साहन मिळेल, अशी आशा आहे. त्याचप्रमाणे या नॉनफिल्मी गाण्यांचे अर्थकारण कसे बदलेल? त्यासाठी कशी पावले उचलावीत? गाणी विकत घेण्यासाठी काय करावे? याकडे संगीतकार आणि श्रोत्यांनी लक्ष देण्यासाठी प्रयत्न करावा असे वाटते.
पुढील वर्षी मी ‘अमृताचा वसा’ हा उपक्रम सुरू करतो आहे. यात जगभरातल्या संगीत तंत्रज्ञानासोबत मराठी अभिजात कवितांची गाणी तयार होतील. उदाहरणार्थ स्पेनमध्ये राहणारा गिटारिस्ट इंदिरा संत यांच्या कविता सादर करेल. तर झेकोस्लोव्हाकियातील एखादा आॅर्केस्ट्रा कुसुमाग्रजांच्या कविता दाखवेल. यासाठी सध्या नियोजन सुरू आहे. एकंदर २०१८ हे संगीतासाठी उत्तम असे वर्ष जाईल, हे माझे भाकीत आहे.
(लेखक संगीतकार आहेत.)