Parbhani: Notice to two candidates who did not want to check the expenditure register | परभणी : खर्च नोंदवही तपासण्यास न देणाऱ्या दोन उमेदवारांना नोटीस
परभणी : खर्च नोंदवही तपासण्यास न देणाऱ्या दोन उमेदवारांना नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लोकसभा निवडणुकीतील दैनंदिन खर्चाची नोंदवही व अभिलेखे तपासण्यास खर्च निरीक्षकांकडे न दिल्या प्रकरणी दोन उमेदवारांना तुमच्यावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, अशी नोटीस निवडणूक विभागाने दिली आहे़
केंद्रीय खर्च निरीक्षक व त्यांच्या पथकाने १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जिल्हा कचेरीत निवडणूक लढविणाºया उमेदवारांना त्यांच्या दैनंदिन खर्चाची नोंदवही तपासण्यासाठी बोलावले होते़ त्यानुसार शिवसेनेचे संजय जाधव, कम्युनिस्ट पार्टीचे राजन क्षीरसागर, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, बसपाचे डॉ़ वैजनाथ फड, स्वतंत्र भारत पक्षाचे डॉ़ आप्पासाहेब कदम, वंचित आघाडीचे आलमगीर खान, बहुजन मुक्ती पार्टीचे उत्तमराव राठोड, भारतीय प्रजास्वराज्यचे किशोर गवारे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अ‍ॅड़ यशंतव कसबे, आंबेडकर नॅशनल काँग्रेसचे सुभाष अंभोरे, भारतीय बहुजन क्रांती दलाचे संतोष राठोड, संघर्ष सेनेचे हरिश्चंद्र पाटील, अपक्ष किशोर मुन्नेमाणिक, गोविंद देशमुख, संगीता निर्मल या १५ उमेदवारांची नोंदवही व अभिलेखे तपासण्यात आली़ त्यापैकी राजन क्षीरसागर, राजेश विटेकर, आलमगीर खान, किशोर गवारे, संतोष राठोड, हरिश्चंद्र पाटील यांनी दैनंदिन खर्चाची नोंदवही तपासणी दरम्यान, अद्ययावत न ठेवल्यामुळे त्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या़ तर संजय जाधव यांचे प्रतिनिधी उशिराने आल्याने त्यांच्या खर्चाची तपासणी पूर्ण करता आली नाही़ त्यानुसार १५ एप्रिल रोजी त्यांना तपासणीस हजर राहण्याचे सूचित करण्यात आले़ बहुजन महापार्टीचे शेख सलीम शेख इब्राहीम व अपक्ष सखाराम बोबडे यांनी ७ व १२ एप्रिल असे दोन्ही वेळा खर्चाची नोंदवही व अभिलेखे तपासण्यासाठी उपलब्ध करून दिले नाही़ त्यामुळे त्यांना कायद्यानुसार तुमच्यावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली असल्याचे निवडणूक विभागातून सांगण्यात आले़ १६ एप्रिल रोजी खर्चाची तृतीय तपासणी होणार आहे़


Web Title: Parbhani: Notice to two candidates who did not want to check the expenditure register
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.