विशेष लेख: नेहरूंचे ‘ते’ वाक्य अन् फिरली ‘ती’ निवडणूक

By यदू जोशी | Published: April 5, 2024 10:06 AM2024-04-05T10:06:42+5:302024-04-05T10:08:05+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: टी. जी. देशमुख हे नागपूर, विदर्भातील एक दिग्गज काँग्रेस नेते होते. नागपूरचे महापौर, विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सदस्य, मंत्री, राज्यसभेचे खासदार अशी अनेक पदे त्यांनी भूषविली. टी. जी. म्हणजे अनेकविध अनुभवांचा खजिना. आपल्या पोतडीतून ते एकेक अनुभव काढून त्यांच्या खास शैलीत सांगायचे, तेव्हा तो एक विलक्षण अनुभव होता.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Javaharlal Nehru's 'that' sentence and 'that' election turned around | विशेष लेख: नेहरूंचे ‘ते’ वाक्य अन् फिरली ‘ती’ निवडणूक

विशेष लेख: नेहरूंचे ‘ते’ वाक्य अन् फिरली ‘ती’ निवडणूक

-  यदु जोशी
टी. जी. देशमुख हे नागपूर, विदर्भातील एक दिग्गज काँग्रेस नेते होते. नागपूरचे महापौर, विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सदस्य, मंत्री, राज्यसभेचे खासदार अशी अनेक पदे त्यांनी भूषविली. टी. जी. म्हणजे अनेकविध अनुभवांचा खजिना. आपल्या पोतडीतून ते एकेक अनुभव काढून त्यांच्या खास शैलीत सांगायचे, तेव्हा तो एक विलक्षण अनुभव होता. काही काळ त्यांचा लेखनिक म्हणून काम करताना त्यांच्यातील विलक्षण प्रतिभा तर जाणवायचीच शिवाय जुनेजुने प्रसंग त्यांच्या तोंडून ऐकताना त्या काळात गेल्यासारखे वाटायचे. त्यांनीच एकदा उलगडलेला हा प्रसंग. त्या काळी उत्तुंग नेते कसा विचार करत, त्यांच्या ठायी किती गुणग्राहकता होती आणि विरोधकांप्रतिही किती आदर होता, याची प्रचिती त्या प्रसंगातून येते. बापूजी अणे यांचे नातू आणि सुप्रसिद्ध विधीज्ञ श्रीहरी अणे यांनी या घटनाक्रमाला दुजोरा दिला.

त्याचे असे झाले की, थोर विदर्भवादी नेते बापूजी अणे हे काँग्रेसच्या विरोधात अपक्ष लढत होते. अणे यांचे चारित्र्य बावनकशी होते. अनेक बडे नेते त्यांना गुरूतुल्य मानत असत. त्यांच्याप्रति आम जनतेतही प्रचंड आदरभाव होता. स्वातंत्र्याच्या लढाईतील त्यांचे योगदान अतुलनीय असेच होते. १९५९ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून जिंकले. मात्र, १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने नागपुरातील एक नेते रिखबचंद शर्मा यांना उमेदवारी दिली. बापूजी अणे त्यांच्या विरोधात उभे राहिले. काँग्रेसच्या नावावर कोणीही निवडून येण्याचा तो सुवर्णकाळ होता, मात्र अणे यांनी मोठे आव्हान उभे केले. ते काँग्रेसीच होते आणि काँग्रेसमधील अनेकांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. नेहरू घराण्याचे अणेंशी जिव्हाळ्याचे संबंध होते. पंडित मोतीलाल नेहरू यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र पक्षाचे अणे हे सचिव राहिलेले होते. रिखबचंद शर्मा यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नागपुरात आले. त्यावेळी बडे नेते आले की, जाहीर सभेशिवाय निवडक नेते, प्रमुख कार्यकर्ते यांची एक बैठकही घेत असत. सभास्थळाच्या बाजूला नेत्याने हेलिकॉप्टरने उतरायचे, भाषण देऊन जायचे, असे नसायचे. 

नेहरू नागपुरात आले आणि त्यांनी अशी बैठक घेतली. नंतर ते कस्तूरचंद पार्कवरील सभेला गेले. स्टेजवरच त्यांना निरोप पाठविला गेला की, बापूजी अणेंविरुद्ध बोला, त्याने फायदा होईल. नेहरूंचे भाषण सुरू झाले, बापूजींबद्दल ते म्हणाले, ‘बापूजी अणे तो मेरे भी नेता हैं, लेकिन रिखबचंदजी हमारे उमेदवार हैं, यह ध्यान में रखकर काम करना हैं.’  नेहरूजी ज्यांना आपले नेता मानतात त्यांना पाडायचे नसते, असा अर्थ त्यातून अनेकांनी घेतला. अणेंना निवडून आणा, असे नेहरूंना म्हणायचे होते की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो, पण अणे यांच्या समर्थकांनी नेहरूंच्या त्या वाक्याचा प्रचारात योग्य वापर करून घेतला. बापूजींना नेहरू नेता मानतात, असे ठिकठिकाणी सांगितले गेले. प्रत्यक्ष निकालात त्याची प्रचिती आली. बापूजी अणे जिंकले नागपुरात, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शर्मा हरले. पुढे नागपूरचे काही काँग्रेस नेते नेहरूजींना दिल्लीत भेटले, तर नेहरूजी म्हणाले, राजकारणात चांगली माणसे निवडून आलीत, तर त्याचे वाईट का वाटून घ्यावे?

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Javaharlal Nehru's 'that' sentence and 'that' election turned around

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.