‘मामां’च्या माढ्यात ‘दादां’चीच दादागिरी !

By सचिन जवळकोटे | Published: April 26, 2019 06:40 AM2019-04-26T06:40:35+5:302019-04-26T06:42:43+5:30

घडलं बिघडलं....

'Dadaji' in the middle of 'Mama'! | ‘मामां’च्या माढ्यात ‘दादां’चीच दादागिरी !

‘मामां’च्या माढ्यात ‘दादां’चीच दादागिरी !

googlenewsNext

- सचिन जवळकोटे

आपली माढ्याची आमदारकी शाबूत ठेवून अवघ्या सोलापूर जिल्ह्यात नवं साम्राज्य घडवायला निघाले होते ‘निमगावचे शिंदे बंधू’. त्यात पुन्हा ‘थोरले काका बारामतीकरां’नी दिलेल्या अश्वमेधाचा रथ निघाला शिंगणापूर-म्हसवडचा घाट ओलांडत; परंतु घाटाखालून ‘अकलूजचे दादा’ अन् घाटावरून ‘फलटणचे दादा’ निघाले निबर. त्यांनी अडविला संजयमामांचा उधळलेला वारू. जाहले प्रचंड घमासान. अखेर चालली मामांच्या माढ्यात ‘दादां’चीच ‘दादागिरी’... पण एका मामासाठी आपसात लढले किती दादा? एक नव्हे...दोन नव्हे...तब्बल पाच दादा. अजितदादा, विजयदादा, बबनदादा अन् दोन-दोन रणजितदादा.

माढ्यात रंगली ‘दोस्ती-दुश्मनी’

गेल्या दोन-अडीच दशकांत माढ्यात ‘बबनदादा’ निवडून यायचे, ते केवळ समोर सक्षम पर्याय नसल्यानेच. एकमेकांच्या पायात पाय घालण्यातच सारी जिंदगानी गेलेले अनेक विरोधक उभारायचे त्यांच्यासमोर. त्यामुळं मतविभागणीचा सर्वात मोठा फायदा आपसूक ‘बबनदादां’ना. मात्र यंदा लोकसभेला होता समोर एक तगडा पर्याय. त्यामुळे ‘संजयमामां’कडून दुखावले गेलेले कैक ‘दोस्त-दुश्मन’ आले एकत्र. यांची संख्याही थोडीथोडकी नव्हे, तब्बल पंधरा. या साºयांना ‘कमळा’चा पुळका केवळ ‘संजयमामां’ना पाडण्यासाठीच आलेला. त्यामुळं माढा विधानसभा पट्ट्यात झालं चुरशीनं मतदान. ज्या निमगावात विरोधकांना कधी पोलिंग एजंट मिळत नव्हता, तिथं दोन दिवसांपूर्वी ‘रणजितदादां’नी घेतलेली शिंदे वाड्यासमोरची सभा ‘संजयमामां’च्या कार्यकर्त्यांना जिव्हारी लागलेली. त्यांनी आजूबाजूच्या ३६ गावातून वेचून-वेचून एकेक मतदार बाहेर काढला. इथला ‘लीड’ तोडताना ‘अकलूजकरां’ची व्हायला हवी दमछाक, हे गणितही आलं जुळून; मात्र त्याचवेळी  त्या’ पंधरा विरोधकांनीही एकेक रन काढत गाठण्याचा प्रयत्न केलाय मामांच्या टीमइतकी धावसंख्या.

करमाळ्यातही जवळपास तशीच अवस्था. ‘सुंठीवाचून खोकला’ घालविण्यासाठी बागलांनीही वापरली एकगठ्ठा मतांची धुरी. याचा ठसका लागला नक्कीच नारायणआबांना. धैर्यशीलभैय्यांनी केवळ आपापल्या तालुक्यात राजकारण करावं, इकडं उगाच दुसºयांना पुढे करून नाक ‘खुपसू’ नये, असाही संदेश दिला इथल्या मतदारांनी... थोडक्यात या दोन्ही तालुक्यात मामांचा लीड नक्कीच जास्त.

गणपतआबांचा चेहरा पाहून सांगोला गलबलला !

निवडणुकीची तुतारी फुंकल्यापासून सांगोल्याचं वातावरण सातत्यानं बदलत गेलेलं. ‘देवेंद्रपंतां’नी या तालुक्याची जबाबदारी दिलेली ‘विजयदादां’वर. मतदानाच्या चार दिवसांपूर्वी इथं हवा होती ‘कमळा’चीच; मात्र शेवटच्या दोन दिवसात गणपतआबांनी गावोगावी पिटविली दवंडी, ‘यंदा माझी शेवटची आमदारकीची निवडणूक, त्याला बसायला नको लोकसभेमुळं फटका,’  असं भावनिक आवाहन त्यांनी करताच मतदानादिवशी वारं फिरल्याचं जाणवलं अनेकांना. ‘हातात घड्याळ’ बांधून बटन दाबणाºयांची वाढली संख्या. इथंच बिघडली ‘कमळा’ची गणितं. वाढला ‘घड्याळ’वाल्यांचा उत्साह. हे कमी पडलं की काय म्हणून इतकी वर्षे ‘वंचित’ राहिलेली ‘कपबशी’ही तालुक्यातील धनगरवाड्यांवर फिरली गराऽऽ गराऽऽ...आता त्याचाही सर्वाधिक धोका ‘कमळा’लाच; कारण यातली बहुतांश मतं गेल्यावेळी होती त्यांनाच. ‘घड्याळ’ फिरलं. ‘कपबशी’ वाजली...त्यामुळं इथं ‘कमळ’ थोडाफार कोमेजलं, असं वातावरण झालं असलं तरी ‘मोदी’ सभेचा इफेक्ट जाणवला इथल्या यंग जनरेशनवर. ‘हातात मोबाईल, कानाला हेडफोन अन् तोंडात देशप्रेम’ दिसणाºया या तरुणाईचा चमत्कारच कदाचित देऊ शकतो ‘कमळा’ला आधार.

अकलूजचा ‘मास्टरस्ट्रोक’ बदलविणार निकाल !

माढा, करमाळा अन् सांगोल्यात झालेली ‘कमळा’ची पडझड सावरायला अवघा माळशिरस तालुका पुढं सरसावला, हे दुपारनंतरच्या मतदानामुळं दिसून आलं स्पष्टपणे. तिकडं माढ्यात वाढू लागला जसा मतदानाचा टक्का, तशी इकडं अकलूजमध्येही लागल्या मोठ्या इर्षेनं मतदारांच्या रांगा. ईट का जवाब पत्थर से... जणू ‘शिंदेंच्या गढी’ला वाकुल्या दाखवू लागला ‘पाटलांचा वाडा’. मात्र इथंही गोची. कधी नव्हे ती ‘माळशिरस’ पट्ट्यानं साथ दिली; परंतु ‘नातेपुते’त झाला चक्क ‘घड्याळाचा गजर’. जिथं प्रचारालाही नव्हते बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते, तिथं केवळ ‘अ‍ॅन्टी दादा’ डिप्लोमसी पडली ‘मामां’च्या पथ्यावर. मात्र इथं ‘दौलत मामां’च्या ‘तंबू’तही दिसली अकस्मात गर्दी. ही सारी परंपरागत मतं होती आजपावेतो ‘अकलूजकरां’चीच. इथंही फटका बसला ‘कपबशी’चाच. तरीही म्हणे या तालुक्याचा एकच ‘मास्टरस्ट्रोक’ बदलवू शकतो अख्ख्या मतदारसंघाचा निकाल. अगाऽऽ गाऽऽ बिचाºया मामांचे देव पाण्यात.

तुमचं बोला...
जगाचं सांगू नका !

माढ्याच्या रणसंग्रामात इथल्या कैक नेत्यांना एक नवाच अनुभव आलेला. ‘स्वत:साठी मत मागा, नक्की देऊ. दुसºयासाठी शब्द टाकू नका’ अशी स्पष्ट जाणीव बºयाच तालुक्यात जनतेनं करून दिलेली; कारण नेत्यांनी स्वत:च्या सोयीसाठी एका रात्रीत भूमिका बदलली असली तरी लोकांना थोडीच रुचलेली? म्हणूनच की काय, हा अनोखा प्रकार पाहून पंढरपूरच्या ‘प्रशांतपंतां’नाही घाम सुटलेला. त्यामुळं माढ्याचा निकाल अत्यंत अटीतटीचा बनविण्यात सर्वात मोठा वाटा राहू शकतो पंतांच्या पंढरपूर तालुक्याचाच. विशेष म्हणजे मतदानाच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत या पट्ट्यात येत होते म्हणे ‘धाकटे दादा बारामतीकरां’चे कॉल्स. स्वत:च्या लेकरासाठी तिकडं मावळ प्रांतात घनघोर युद्ध सुरू असतानाही ‘दादां’नी अनेक गावपुढाºयांचं केलं मतपरिवर्तन. तेही केवळ ‘मामां’साठी. खरंच...मामा किती भाग्यवान; परंतु ‘बबनदादा’ अन् ‘रश्मीताई’ही आहेत का नशीबवान ? कारण या दोन गटांना विधानसभेला मिळणार का स्वत:चं हक्काचं मोकळं रान ?

..जुनी समीकरणं बदलली !

‘‘माण-खटाव’ तालुक्यात दोन्ही ‘गोरे बंधूं’नी मस्त खेळी केलेली. ‘जयाभाव’नी सांभाळला माण... अन् ‘शेखरभाऊं’नी ढवळून काढला ‘खटाव’. त्यामुळं व्यासपीठावर एकत्र येण्याचा सवाल नाही. एकमेकांच्या नजरेत नजर घालून पाणउतारा करण्याचाही प्रश्न नाही. या दोघांमुळं ‘कमळा’चा सुगंध दोन्ही तालुकाभर पसरला असला तरी ‘देशमुखांच्या प्रभाकरां’नी मात्र साधला ‘गनिमी कावा’. तात्यांच्या निधनानंतर विखुरलेला पोळ गट बांधला स्वत:सोबत. त्यामुळं इथं ‘घड्याळ्याचे काटे’ टुकुटुकू का होईना लक्षणीय चालणार. फलटणमध्येही ‘रामराजें’नी शेवटपर्यंत ‘फिल्डिंग’ लावून ठेवलेली. ‘कमळाला मतं दिलीत, तर माझ्या वाड्याची पायरीही चढायची नाही; ही त्यांची निर्वाणीची भाषाही ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना सोडली हादरवून. तरीही म्हणे इथं ‘आपल्या गावचा माणूस’ हीच भावना ठरली कैक ठिकाणी वरचढ. ‘रामराजें’च्या धमकीपेक्षा ‘रणजितदादां’ची आपुलकी टाकू शकते फलटणच्या आकडेवारीवर असर... अन् हे कमी पडलं की काय म्हणून उत्तर कोरेगावच्या ओसाड माळरानावरही फुलला ‘कमळांचा तलाव’. केवळ या पट्ट्याला पाणी न मिळाल्याच्या रागातून. विशेष म्हणजे, याच ठिकाणी वसलंय नांदवळ. होय. तेच ते.. बारामतीकरांचं जुनं गाव.

- सचिन जवळकोटे

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: 'Dadaji' in the middle of 'Mama'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.