औरंगाबादेत केली कचऱ्याने अडचण अन् पाण्याने फजिती

By सुधीर महाजन | Published: April 6, 2019 02:47 PM2019-04-06T14:47:40+5:302019-04-06T15:34:49+5:30

लोक उमेदवारांना थेट तोंडावर सवाल करीत आहेत.

In Aurangabad, the garbage and water issue is hard for candidates campaigning | औरंगाबादेत केली कचऱ्याने अडचण अन् पाण्याने फजिती

औरंगाबादेत केली कचऱ्याने अडचण अन् पाण्याने फजिती

Next

- सुधीर महाजन

मुकी बिचारी कोणीही हाका, अशी जनता राहिली नाही. आपल्या हक्कांसाठी जागरूक असणारा प्रसंगी रस्त्यावर उतरणारा आजचा सामान्य माणूस आहे. भलेही तो फाटका असेल; पण हक्कासाठी तेवढाच जागरूक दिसतो. तसा तो सोशीक आहे. सरकार, प्रशासन, राज्यकर्ते या सर्वांची मनमानी तो एका मर्यादेपर्यंत सहन करतो. भ्रष्टाचाराकडे कानाडोळा करतो. रोजच्या संघर्षातून इकडे लक्ष द्यायला त्याला वेळ मिळत नाही; पण वेळेवर जाब विचारायला तो कचरत नाही आणि निवडणुकीच्या काळात तर राजकारण्यांच्या बेमुरवतपणाचे सगळे माप त्याच्या पदरात टाकायला तो विसरत नाही.

औरंगाबादमध्ये सध्या अशीच वेळ राजकारण्यांवर आली आहे. गेल्या वर्षभरापासून कचऱ्याचे शहर, असे बदनामीचे बिरुद मिरवून देशभरात या शहराची मानहानी झाली. त्याला जबाबदार या शहराची महानगरपालिका आणि राज्यकर्ते. प्रत्येक गोष्टीत टक्केवारीची संधी शोधणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे साटेलोटे यामुळे या शहराचे न भरून निघणारे नुकसान झाले. कचऱ्यावरून शहरात दंगल झाली; पण हा प्रश्न अजून सुटला नाही. इतकेच नव्हे स्वच्छ भारत अभियानात दिल्लीत काम करणारे सनदी अधिकारी डॉ. निपुण विनायक यांना येथे खास बाब म्हणून आणले. आता शहर स्वच्छ होणार, अशी आशेची लहर शहरभर पसरली; पण त्यांनी येऊन काय केले, हाही प्रश्नच आहे. शिवसेनेने सगळ्या शहराचाच ३० वर्षांत कचरा केला. याची अनुभूती आजवर या पक्षांची पाठराखण करणाऱ्या लोकांनाच झाली आणि थेट प्रश्न विचारायला लागले.

आज शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची प्रचार रॅली कांचनवाडीत गेली. त्यावेळी तेथील नागरिकांनी त्यांना प्रवेश नाकारला. आमच्या भागात तुम्ही शहराचा कचरा आणून टाकला. आमचा परिसर घाणेरडा केला, असा सवाल करीत त्यांना परत पाठवले. ३० वर्षांत  शिवसेनेला असे परत पाठविण्याचा हा शहरातील पहिलाच प्रसंग. यावरून जनतेच्या मनातील असंतोष किती मोठा आहे, हे दिसते. असंतोष फक्त कचऱ्यापुरता मर्यादित नाही. राज्य सरकारने १०० कोटी देऊन वर्ष उलटले. तरी रस्ते झाले नाहीत. शहरात सातव्या दिवशी पाणी मिळते. रस्त्यावर दिवे नाहीत. सर्वच उद्याने बकाल झाली. अतिक्रमणांनी शहरभर पाय पसरले ते यांच्याच आशीर्वादामुळे. नियम, कायदा नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. कोणतीही शिस्त नाही. सर्वसामान्य माणसाला सुरक्षित वाटत नाही. त्यातून हा असंतोष तयार झाला.

शुक्रवारी सकाळी जशी खैरेंची प्रचार रॅली प्रचार न करता परतली. तीच वेळ जालना मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवेंवर आली. शहराचा मुकुंदवाडी हा भाग त्यांच्या मतदारसंघात येतो. आज सायंकाळी त्यांच्या प्रचार कार्यालयाने उद्घाटन होते. लोक जमले. ऐन कार्यक्रम सुरू होण्याच्या वेळेस पाणी आले. तसे लोक सभा सोडून उठले. एक वेळ नेत्यांचे भाषण नाही ऐकले तर चालेल; परंतु सात दिवसांनंतर आलेले पाणी भरले नाही तर... 
लोक गेल्यामुळे कार्यक्रम उशिरा सुरू झाला. येथे पुन्हा दानवेंच्या जिभेची घसरगुंडी झाली आणि त्यांनी सोलापूरची पुनरावृती केली. येथे पुन्हा ‘पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले,’ असे वक्तव्य केले, तर निवडणुकीत कचरा आणि पाणी हे विषय औरंगाबादमध्ये या दोघांसाठी ज्वालाग्रही बनले आहेत. लोक उमेदवारांना थेट तोंडावर सवाल करीत आहेत. लोकांनी आतापर्यंत चंद्रकांत खैरेंना प्रश्न विचारले नव्हते; पण आता विचारायला कोणी घाबरत नाही. हाच मोठा बदल औरंगाबादमध्ये दिसतो.

Web Title: In Aurangabad, the garbage and water issue is hard for candidates campaigning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.