Lok Sabha Election 2019 : उस्मानाबादेत प्रचार सभांमधून 'कार्टून स्ट्राईक'; प्रचाराची पातळी पहिल्याच टप्प्यात घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:57 PM2019-03-30T13:57:27+5:302019-03-30T13:58:44+5:30

उमेदवारांवर वैयक्तिक टीका हेच लक्ष्य

Lok Sabha Election 2019: 'Cartoon Strike' in Osmanabad Election campaigns; The level of campaign collapses in the first phase | Lok Sabha Election 2019 : उस्मानाबादेत प्रचार सभांमधून 'कार्टून स्ट्राईक'; प्रचाराची पातळी पहिल्याच टप्प्यात घसरली

Lok Sabha Election 2019 : उस्मानाबादेत प्रचार सभांमधून 'कार्टून स्ट्राईक'; प्रचाराची पातळी पहिल्याच टप्प्यात घसरली

googlenewsNext

- चेतन धनुरे 

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीचा आखाडा आता हळूहळू तापायला लागला आहे. सर्वच उमेदवार प्रचाराला लागले आहेत. दरम्यान, महाआघाडी व महायुतीच्या समर्थकांनी एकमेकांवर कार्टून स्ट्राईक करीत वैयक्तिक लक्ष्य केले आहे. पहिल्याच टप्प्यातील या हल्ल्याने प्रचाराची पातळी पुढे आणखी किती घसरू शकेल, याचा अंदाज येऊ शकेल.
उस्मानाबाद मतदारसंघात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या पाटील व राजेनिंबाळकर घराण्यात लढत होत आहे. नात्याने चुलत भाऊ असले तरी मागच्या पिढीपासून चालत आलेले वैर महायुतीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर व महाआघाडीचे उमेदवार राणा पाटील यांनी पुढेही तितक्याच त्वेषाने जपले आहे. कारखाना, बँक, स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकातून हा कट्टर विरोध जपला गेला आहे. त्यामुळेच खालीही अत्यंत चुरस लागलेली असते. इतकेच नव्हे तर मागील तीन विधानसभा निवडणुकीपासून या दोन घराण्यात आरपारची लढाई लढली जात आहे. त्यांच्या कुटुंबातील ही 'जानी दुश्मनी' स्वाभाविकच निवडणुकीत वैयक्तिक घेतली जाते. त्यामुळे विखारी टिकेने प्रचाराची सुरुवात होते अन शेवटही. अगदी या दोघांपेक्षाही त्यांचे समर्थकच जास्त 'जाळ अन धूर' काढीत असतात.

विधानसभेत दोन वेळा या दोघांत सामना झाला असला तरी, यावेळच्या लोकसभा निवडणुकीत हे दोघे पहिल्यांदाच आमनेसामने आले आहेत. दोघांचीही उमेदवारी एकाच दिवशी जाहीर झाली अन वैयक्तिक टीकेची ठिणगी पडली. 
काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या एका समर्थकाने ओम राजेनिंबाळकर यांच्यावरील एक कार्टून प्रसृत केले होते. तेरणा कारखान्याचे साहित्य विक्रीला काढल्याचे दर्शवून 'भंगारचोर' अशी खालच्या पातळीवरील उपाधी कार्टून मध्ये बहाल केली होती. त्यांची उमेदवारी जाहीर होताच हे कार्टून पुन्हा बाहेर पडले. सोशल मीडियावर ते जोरात फिरू लागले. या स्ट्राईकने घायाळ झालेल्या राजेनिंबाळकर समर्थकांनीही कार्टूनचेच अस्त्र बाहेर काढत राणा पाटील यांना लक्ष्य केले. पहिल्यांदा त्यांनी बँक, कारखाना व इतर काही संस्था विक्रीस काढल्याचे कार्टून बाहेर काढले. यानंतर महत्वाची पदे आपल्याकडेच ठेवून घेत कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलण्याचे आदेश देतानाचे कार्टून प्रसृत केले गेले. एकूणच पहिल्या टप्प्यात सुरू झालेले हे 'कार्टून स्ट्राईक' निवडणूक कुठल्या दिशेने नेणार, याची प्रचिती देणारे ठरत आहे.

'विकास' पुन्हा हरवणार?
वैयक्तिक उणीदुणी वरच भर ठेवण्याची उस्मानाबादेतील प्रचाराची परंपराच राहिली आहे. विकासाचे मॉडेल तयार करण्याचा किंबहुना तो किमान प्रचारात समजून सांगण्याचाही प्रघात नाही. नव्या दमाची पिढी ही परंपरा पुसून विकासाच्या  गप्पा मारतील, बाहेर जाणारे बेरोजगार तरुणांचे लोंढे थांबवतील, अशी आशा अजूनही आहे. मात्र, त्यांच्या हुल्लडबाज समर्थकांना आवरणार कोण? हा ही मोठाच प्रश्न आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019: 'Cartoon Strike' in Osmanabad Election campaigns; The level of campaign collapses in the first phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.