नवी दिल्ली : ‘माझ्यामध्ये अजूनपर्यंत कमीत कमी ८ वर्षांपर्यंतचे क्रिकेट शिल्लक आहे. तसेच, जर मी तंदुरुस्ती आणि कठोर मेहनत कायम राखण्यात यशस्वी ठरलो तर नक्कीच पुढील १० वर्ष आणखी खेळू शकतो,’ अशी प्रतिक्रीया भारताचा कर्णधार विराट कोहली याने दिली.
नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान कोहलीने प्रतिक्रीया दिली. गेल्या काही काळामध्ये कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्चस्व राखताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. कोहलीने यावेळी म्हटले की, ‘सातत्याने कामगिरी सुधारत असल्यामागे कोणतेही विशेष कारण लपलेले नाही. अनेक लोकांना कल्पनाही नसेल की आम्ही किती मेहनत घेतो. थकल्यानंतरही एखादा खेळाडू ७०टक्के सराव केल्यानंतर थांबल्याचे मी अजूनपर्यंत पाहिलेले नाही. आम्ही आमचे काम पुर्ण करण्यासाठी स्वत:ला झोकून देतो.’
कोहलीने पुढे म्हटले की, ‘चांगले प्रदर्शन करण्याची माझी भूक कधीच शमत नाही. अखेरच्या क्षणापर्यंत चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असतो.’
माझ्या लहानपणी गॅझेट्स नव्हते. त्यावेळी, आमच्या मित्रांपैकी कोणाकडे व्हिडिओ गेम असला, तर आम्ही त्याच्या घरी जमायचो. आज अनेक युवा आयफोन आणि आयपॅडवर व्यस्त असतात. मी लहान असताना रस्त्यावर विविध खेळ खेळलोय. त्यामुळे आजच्या युवांना मी आवाहन करेल की मैदानावर कोणताही खेळ खेळा पण अवश्य खेळा.
- विराट कोहली