नवी दिल्ली- दिल्लीतल्या पालम येथे रणजी करंडकचा सामना सुरू असताना चक्क एका अवलियानं मैदानातही कार घुसवली. रणजी ट्रॉफीसाठी सामना सुरू असतानाच या कारनं चक्क मैदानात प्रवेश केला आणि सर्वच खेळाडू अचंबित झाले. बाहेरच्या व्यक्तीनं सामन्यादरम्यान कार आत आणल्यानं उपस्थित अवाक् झाले. त्यानं कार घुसवल्यानंतर मैदानावरून दोन फे-यासुद्धा मारल्या. त्यानंतर कारचालकाला एअर फोर्स पोलिसांना सुपूर्द करण्यात आले.

एअर फोर्स पोलिसांनी त्या आरोपीला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. रणजी सामन्याचा दिवसाचा खेळ समाप्त होण्यासाठी केवळ 20 मिनिटं असतानाच संध्याकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी एक सिल्व्हर रंगाची वॅगन आर कार मैदानात घुसवली. त्यावेळी उत्तर प्रदेश संघाचा दुसरा डाव सुरू होता. एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, त्या व्यक्तीनं कारला दोनदा मैदानावरून फिरवलं. कारचालकाची ओळख पटली असून, गिरीश शर्मा(32) असे त्याचं नाव आहे. तो उत्तर पश्चिम दिल्लीतल्या बुधविहार शहरात राहतो, अशी माहिती उत्तर-पश्चिम दिल्लीचे पोलीस उपायुक्त शिबेश सिंह यांनी दिली आहे.

लग्नासाठी सुरू असलेल्या वादविवादानंतर गिरीश याची मानसिक स्थिती काहीशी ढासळली आहे. त्यामुळे हल्लीच्या दिवसांत ते फारच तणावात असतात, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. रस्ता चुकल्यामुळे मैदानात शिरल्याचे गिरीश शर्माने सांगितले असून, मैदानाबाहेर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. त्यामुळे सामना सुरू असल्याचा अंदाज आला नसल्याचे शर्मानं सांगितलं आहे. रणजी सामन्यात सुरू असताना सुरक्षेत दाखवलेल्या ढिसाळपणामुळे सर्वत्र चर्चा होत आहे.