वाडेकरांचे योगदान मोलाचे

माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने खूप दु:ख झाले. ते माझे खूप चांगले मित्र होते. त्यांचे भारतीय क्रिकेटमधील योगदान मोलाचे होत. वाडेकर यांनी आपल्या नेतृत्वात वेस्ट इंडिजला आणि इंग्लंडला त्यांच्याच देशात नमवून भारतीय क्रिकेटला वेगळेच वळण दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 04:05 AM2018-08-18T04:05:06+5:302018-08-18T04:05:34+5:30

whatsapp join usJoin us
Wadekar's contribution is valuable | वाडेकरांचे योगदान मोलाचे

वाडेकरांचे योगदान मोलाचे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)

माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने खूप दु:ख झाले. ते माझे खूप चांगले मित्र होते. त्यांचे भारतीय क्रिकेटमधील योगदान मोलाचे होत. वाडेकर यांनी आपल्या नेतृत्वात वेस्ट इंडिजला आणि इंग्लंडला त्यांच्याच देशात नमवून भारतीय क्रिकेटला वेगळेच वळण दिले. या दोन विजयानंतर भारतीय क्रिकेटचे चित्रच पालटले. सलग दोन विदेशी मैदानांवर मालिका जिंकणे सोपी गोष्ट नाही. पोर्ट आॅफ स्पेनमध्ये वाडेकर यांनी मोक्याच्या क्षणी सलिम दुराणी यांना गोलंदाजीस पाचारण केले आणि त्यांनी क्लाइव्ह लॉइड आणि गॅरी सोबर्स या दिग्गजांना बाद केले होते. यानंतर, विंडिज संघ कोलमडला आणि भारताने बाजी मारली. यानंतर, काही आठवड्यांनी ओव्हल येथे झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडला लोळवले. त्या सामन्यात वाडेकर यांनी बेदी यांना एक षटक टाकण्यास दिले, ज्यात त्यांनी बळी घेतला. यानंतर, वाडेकर यांनी त्यांना गोलंदाजी दिली नाही आणि चंद्रशेखर यांनी ६ बळी घेत सामना जिंकवला. या निर्णयक्षमतेवरून वाडेकर यांच्या डोक्यात किती चक्रे फिरायची हे कळून येते. महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्यामध्ये धाडसी निर्णय घेण्याची हिंमत होती.
वाडेकर यांचा भारतीय क्रिकेटमधील दर्जा अत्यंत उच्च आहे, पण त्यांची कारकिर्द नाट्यमय ठरली. ८ वर्षांपासून कर्णधार असलेल्या टायगर पतौडी यांना विजय मर्चंटच्या निर्णायक मताने बाहेर केले आणि नेतृत्वाची धुरा वाडेकरांच्या खांद्यावर आली. अनेकांना वाडेकरांच्या नेतृत्वावर शंका होती, पण त्यांनी सर्वांना चुकीचे ठरविले. यशस्वी नेतृत्त्व करताना वाडेकर यांनी आपले अचूक व्यवस्थापकीय कौशल्य सिद्ध केले. त्यांनी एकाच वेळी सीनिअर व ज्युनिअर खेळाडूंसोबत संघाला पुढे नेले. १९९२-९३ मध्ये त्यांनी भारताचे प्रशिक्षक म्हणूनही छाप पाडली. द. आफ्रिका दौऱ्यात अपयश आल्यानंतर तत्कालीन कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनचे कर्णधारपद धोक्यात आले होते, पण वाडेकर यांच्यामुळे त्याचे पद वाचले होते. तरी माझ्या मते, वाडेकर यांचे सर्वात मोठे योगदान सचिन तेंडुलकरला घडविण्यात आहे. एकूणच वाडेकर एक खेळाडू व व्यवस्थापक म्हणून जबरदस्त राहिले.

भारत नॉटिंगहॅममध्ये शनिवारपासून इंग्लंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळेल. मालिका वाचविण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. या निर्णायक सामन्यात नक्कीच भारतीय संघात काही बदल पाहण्यास मिळतील. मला पूर्ण विश्वास आहे की, युवा रिषभ पंत या सामन्यात नक्की खेळेल. तो गेल्या दोन - तीन महिन्यांपासून इंग्लंडमध्ये खेळत असून, त्याची कामगिरीही चांगली आहे. त्याच्याकडे अनुभव नाही, पण हिम्मत नक्की आहे, तसेच जसप्रीत बुमराह पुनरागमन करेल. विराट कोहली कशा प्रकारे नेतृत्व करतो, हे पाहणे सर्वात उत्सुकतेचे ठरेल.

Web Title: Wadekar's contribution is valuable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.