विरार ते वर्ल्ड चॅम्पियन! जग जिंकणाऱ्या पृथ्वी शॉचा प्रेरणादायी प्रवास 

क्रिकेटच्या मैदानात झपाट्याने प्रगती करत असलेला पृथ्वी लवकरच टीम इंडियामध्ये दाखल होईल यात सर्वांचेच एकमत आहे. पण पृथ्वीचा इथपर्यंतचा प्रवास अनेक खाचखळग्यांनी भरलेला आहे. पण एखाद्या परिकथेतीली नायकाप्रमाणे वाटेत आलेल्या प्रत्येक अडथळ्यावर मात करत पृथ्वी शॉ यानं यश मिळवलंय. ही कहाणी सुरू होते ती मुंबईजवळ असलेल्या विरार नावाच्या शहरातून.

By Balkrishna.parab | Published: February 5, 2018 07:45 PM2018-02-05T19:45:24+5:302018-02-05T19:49:44+5:30

whatsapp join usJoin us
Virar to World Champion! Inspirational travel by earth shoe to world championship | विरार ते वर्ल्ड चॅम्पियन! जग जिंकणाऱ्या पृथ्वी शॉचा प्रेरणादायी प्रवास 

विरार ते वर्ल्ड चॅम्पियन! जग जिंकणाऱ्या पृथ्वी शॉचा प्रेरणादायी प्रवास 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

3 फेब्रुवारी 2018 रोजी न्यूझीलंडमधील माऊंट मॉन्गानाऊ येथे ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत भारताच्या संघाने 19 वर्षांखालील विश्वचषक उंचावला आणि या संघातील प्रत्येक क्रिकेटपटू भारतीय क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत झाला. या युवा प्रतिभावंतांमधील कोणता खेळाडू भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणार याची चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगलीय. शुभमन गिल, मनज्योत कालरा, कमलेश नागरकोटी अशी अनेक नावे समोर आहेत. मात्र एका नावावर सर्वांचे एकमत आहे ते नाव म्हणजे भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ याचे. क्रिकेटच्या मैदानात झपाट्याने प्रगती करत असलेला पृथ्वी लवकरच टीम इंडियामध्ये दाखल होईल यात सर्वांचेच एकमत आहे. पण पृथ्वीचा इथपर्यंतचा प्रवास अनेक खाचखळग्यांनी भरलेला आहे. पण एखाद्या परिकथेतीली नायकाप्रमाणे वाटेत आलेल्या प्रत्येक अडथळ्यावर मात करत पृथ्वी शॉ यानं यश मिळवलंय. 
ही कहाणी सुरू होते ती मुंबईजवळ असलेल्या विरार नावाच्या शहरातून. 9 नोव्हेंबर 1999 या दिवशी शॉ माता-पित्याच्या पोटी पृथ्वीचा जन्म झाला. प्रत्येक आई-वडलांप्रमाणेच शॉ दाम्पत्यही आपल्या लेकराला मोठं करण्याची स्वप्न पाहत होते. पण नियतीच्या मनात मात्र वेगळंच होतं. पृथ्वी चार वर्षांचा असतानाच त्याच्या डोक्यावरील मातृछत्र हरपलं. आईच्या मायेला पोरका झालेल्या पृथ्वीला वडील पंकज शॉ यांनी खस्ता खात वाढवलं. प्रसंगी आईचं प्रेम देतानाच एक बाप म्हणून आपलं कर्तव्यही पार पाडलं. कपड्यांचा व्यवसाय करतानाच पृथ्वीच्या  क्रिकेटवर त्यांनी लक्ष दिला. छोटा पृथ्वी क्रिकेटची वजनदार किट सांभाळत लोकलमध्ये धक्के खात विरार ते एमआयजी क्लब हा प्रवास रोज करायचा. अंगात नैसर्गिक प्रतिभा असल्याने क्रिकेट्या मैदानात त्याला कधी अडचण आलीच नाही. मात्र घरची परिस्थिती परीक्षा घेत होती. 
याचदरम्यान पंकज शॉ यांनी सांताक्रुझमध्ये एक भाड्याचं घर मिळवलं. या कामी काही सहृदयी मंडळींची त्यांना मदत झाली. छोट्या पृथ्वीचे शिक्षण मुंबईतील नामांकित अशा रिझवी स्प्रिंगफिल्ड या शाळेत सुरू झाले. प्रवासाची दगदग थांबल्याने क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करणंही त्याला शक्य झालं. दरम्यान, पृथ्वी शॉच्या क्रिकेट कारकिर्दीला कलाटणी देणारी एक घटना घडली. हॅरिस शिल्ड या मुंबईतील शालेय क्रिकेट स्पर्धेत त्याने 546 धावांची विक्रमी खेळी केली. छोट्या पृथ्वीचे नाव मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात चर्चेत आले. आजी-माजी क्रिकेटपटूंचे  लक्ष वेधले गेले. या खेळीनंतर पृथ्वीने कधीही मागे वळून पाहिले नाही. इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी त्याला स्कॉलरशिप मिळाली. तिथे क्लिथोपर्स क्लबकडून खेळण्याची संधी त्याला मिळाली. 
लवकरच पृथ्वीकडे मुंबईच्या 16 वर्षांखालील संघाचे कर्णधारपद आले. तिथेही पृथ्वीने आपली प्रतिभा दाखवली. शालेय आणि वयोगट क्रिकेटमध्ये चमक दाखवल्याने पृथ्वीचा प्रथमश्रेणी क्रिकेटमधील प्रवेश अगदी सहजपणे झाला. सन 2016-17 च्या हंगामासाठी पृथ्वीची निवड मुंबईच्या रणजी संघात झाली. मग पृथ्वीनेही तामिळनाडूविरुद्ध पदार्पणातच शतकी खेळी करून आपली निवड सार्थ ठरवली. पुढे ओदिशा आणि आंध्र प्रदेशविरुद्धही शानदार शतके ठोकत त्याने सर्वांची वाहवा मिळवली. पुढे दुलिप करंडकातही पदार्पणातच शतकी खेळी करण्याचा पराक्रम त्याने केला. त्याबरोबरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रणजी आणि दुलिप करंडकात पदार्पणातच शतकी खेळी करण्याचा विक्रम करणारा मास्टर ब्लास्टर सचिननंतरचा तो दुसरा खेळाडू ठरला. 
दमदार कामगिरीमुळे साहजिकपणे पृथ्वीची निवड भारताच्या 19 वर्षांखालील संघाच्या कर्णधारपदी झाली. तिथे भारतीय क्रिकेटमधील तंत्रशुद्ध फलंदाजीचा ज्ञानकोष म्हणावा असा राहुल द्रविड प्रशिक्षकाच्या भूमिकेत असल्याने त्याचाही फायदा पृथ्वीला झाला. न्यूझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात एक फलंदाज आणि कुशल कप्तान म्हणून पृथ्वीने छाप पाडली. विश्वचषकातील भारताच्या या युवा क्रिकेटपटूंची कामगिरी हा आता इतिहास बनलाय. तर पृथ्वी हा मुंबई आणि भारतीय क्रिकेटमधील स्टार झालाय. पण ही तर एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे. 
 

Web Title: Virar to World Champion! Inspirational travel by earth shoe to world championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.