हम्बनटोटा (श्रीलंका) : सलामीवीर अथर्व तायडे आणि पवन शाह
यांच्या दणदणीत शतकांच्या बळावर भारताच्या अंडर १९ संघाने श्रीलंका संघाविरुद्ध दुसऱ्या युवा कसोटीच्या पहिल्याच दिवशी चार गड्यांच्या मोबदल्यात ४२८ धावांचा डोंगर उभारला.
तायडे १७७ धावा काढून बाद झाला तर शाह १७७ धावांवर नाबाद आहे. दोघांनी दुसºया गड्यासाठी २६३ धावांची भागीदारी केली. पहिल्या सामन्यात भारताच्या डावाच्या फरकाने साजºया केलेल्या विजयात तायडेने शतक ठोकले होते. या सामन्यातही शानदार फॉर्म सुरू ठेवून अथर्वने १७२ चेंडू टोलवून २० चौकार आणि तीन षटकार खेचले. शाहने आतापर्यंत २२७ चेंडूंचा सामना केला असून १९ चौकार मारले.
चार दिवसांच्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. कर्णधार अनुज रावत (११) लवकर बाद झाल्यानंतर तायडे- शाह यांनी ४६ षटके खेळून काढली. अखेर आॅफस्पिनर सेनारत्ने याने तायडेला यष्टिमागे झेल देण्यास भाग पाडले. शाहने एक टोक सांभाळून आर्यन तायलसोबत (४१) चौथ्या गड्यासाठी ७६ धावांची भागीदारी केली. खेळ थांबला त्या वेळी
शाह आणि नेहाल वढेरा (५) खेळपट्टीवर होते. (वृत्तसंस्था)