भारतीय संघात कोणाचेही स्थान निश्चित नाही

आॅस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर भारताचा विजय निश्चित मानला जात आहे. यानिमित्ताने भारतीय संघाची ताकद, संघातील खेळाडू, त्यांची मानसिकता आणि संघासमोरील आव्हाने अशा अनेक गोष्टींवर ज्येष्ठ क्रिकेट समिक्षक आणि ‘लोकमत’चे संपादकीय सल्लागार अयाझ मेमन यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी केलेली खास बातचीत.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:04 AM2017-09-16T01:04:56+5:302017-09-16T01:06:42+5:30

whatsapp join usJoin us
There is no fixed place in the Indian team | भारतीय संघात कोणाचेही स्थान निश्चित नाही

भारतीय संघात कोणाचेही स्थान निश्चित नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन
भारतीय संघ विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाविरुध्द पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यास सज्ज आहे. याआधी झालेल्या श्रीलंका दौ-यात भारताने एकही सामना न गमावता ९-० अशी जबरदस्त बाजी मारली. त्यामुळेच, आॅस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर भारताचा विजय निश्चित मानला जात आहे. यानिमित्ताने भारतीय संघाची ताकद, संघातील खेळाडू, त्यांची मानसिकता आणि संघासमोरील आव्हाने अशा अनेक गोष्टींवर ज्येष्ठ क्रिकेट समिक्षक आणि ‘लोकमत’चे संपादकीय सल्लागार अयाझ मेमन यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी केलेली खास बातचीत..... 

प्रश्न : टीम इंडिया कसोटीमध्ये अव्वल संघ आहे आणि आता आॅस्ट्रेलियाविरुद्ध मोठे यश मिळवल्यास एकदिवसीय क्रमवारीतही अव्वल क्रमांकावर येईल. तुम्हाला सध्याचा संघ आतापर्यंतचा सर्वोत्तम भारतीय संघ वाटतो का?
उत्तर : मी आधीच संघाविषयी खूप म्हणालोय. आगामी दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलिया दौºयात संघाची कशी कामगिरी होते यावर हे अवलंबून असेल. कारण, येथे आतापर्यंत भारताने एकही मालिका कसोटी मालिका जिंकलेली नाही. मला वाटते याची आत्ताच्या खेळाडूंना जाणीव आहे.

प्रशिक्षकपदावरुन झालेल्या मोठ्या वादानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून नवी इनिंग सुरु करणे किती आव्हानात्मक ठरले?
खरं म्हणजे प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारणे सोपे गेले. याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे बहुतेक खेळाडूंना मी ओळखून होतो. तसेच, गेल्यावेळी जेव्हा मी संघापासून दूर झालो होतो जवळपास तोच संघ यावेळीही कायम आहे. त्यामुळे मी या खेळाडूंना आणि खेळाडू मला ओळखून आहेत. आम्ही जेथे प्रवास थांबवला होता, तेथूनच नविन प्रवास सुरु केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, मी भूतकाळातील गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही. मला नेहमी पुढे जायला आवडते. त्यामुळे, गतवर्षात काय होऊन गेले, हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही.

श्रीलंकेविरुद्धचे एकतर्फी यश आश्चर्यकारक होते. आगामी आॅसीविरुद्धच्या मालिकेविषयी काय सांगाल?
ही मालिका आव्हानात्मक ठरेल. आॅसी खूप कडवे प्रतिस्पर्धी आहेत. त्यांना हरायला आवडत नाही. त्यांचे बहुतेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळत असल्याने त्यांना भारतीय परिस्थितींची जाण आहे. त्यांनी बांगलादेशमध्ये चांगली कामगिरी केली आणि ती कसोटी मालिका असल्याने यामुळे आत्मविश्वास उंचावण्यास त्यांना मदत होईल. ही मालिका चुरशीची होईल. मालिकेत सुरुवातीपासून वर्चस्व मिळवून अखेरपर्यंत सातत्य राखण्यात कोणता संघ यशस्वी ठरतो, यावर खूप काही अवलंबून आहे.

श्रीलंका दौ-यात भारतीय संघाने प्रत्येक प्रकारामध्ये मोठे यश मिळवले. त्याबद्दल काय सांगाल?
खेळाडूंनी अप्रतिमरीत्या स्वत:ला खेळाच्या विविध प्रकारामध्ये बदलून घेतले. श्रीलंकेला त्यांच्या घरच्या मैदानावर नमवणे सोपे नसते. आम्ही त्यांच्यावर सातत्याने दबाव राखले. पण, एकूण या दौ-यात मिळालेले यश महत्त्वाचे आहे.

तुम्ही विराट कोहलीचे मोठे कौतुक केले. कशामुळे तो वैशिष्ट्यपूर्ण ठरतो?
तो खेळावर केवळ प्रेम करत नाही, तर तो स्वत:ला झोकून देतो. हेच त्याच्या यशाचे गमक आहे. कोहलीचे खेळावर बारीक लक्ष असते आणि तो प्रत्येक बाबींमध्ये पुढाकार घेतो. याची झलक त्याच्या फलंदाजीमध्ये, नेतृत्त्वामध्ये, तंदुरुस्ती आणि जिंकण्याची वृत्ती यामध्ये दिसून येते. त्याला विजयी आलेख जास्तीत जास्त उचावयाचा असतो. पण, तो कधीही इतरांना अतिरिक्त दबाव टाकत नाही.

कोहली व धोनीमधील ताळमेळ जबरदस्त आहे. या दोन्ही खेळाडूंना हातळणे आव्हानात्मक असते का?
मुळीच नाही. कारण दोघेही स्वत:ला असुरक्षित मानत नाही. दोघेही गुणवान आहेत. दोघेही एकमेकांशी आणि खेळप्रती प्रामाणिक आहेत. तसेच, दोघांमध्ये चांगली मैत्री असून दोघांना एकमेकांप्रती आदर आहे.

काही दिवसांपूर्वी धोनीबाबत खूप चर्चा झाल्या. यावरुन त्याच्यावर काही दबाव होत का?
- कसला दबाव? माझ्या माहितीप्रमाणे तो सर्वात शांत खेळाडू आहे. तो मैदानावरील व मैदानाबाहेरील कोणत्याही परिस्थितीला शांतपणे सामोरा जातो. धोनीबाबत शंका उपस्थित करणा-यांना विचारायचंय की, अजून त्याने काय सिध्द केले पाहिजे? संघातील तंदुरुस्त खेळाडूंपैकी तो एक आहे. तो सध्या शानदार फॉर्ममध्ये असून त्याचा प्रदीर्घ अनुभव संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी नेहमी सांगत असतो की, आतापर्यंत जो धोनी बघितला तो केवळ ट्रेलर आहे, पुर्ण शो अजून बाकी आहे.

सध्या युवराज, रैना तसेच आश्विन व जडेजा यांच्यावरही प्रश्न निर्माण होत आहेत. श्रीलंकेनंतर आता आॅस्टेÑलियाविरुद्धही पहिल्या तीन सामन्यासाठी ते संघात नाही. काय सांगाल?
- मी संघ निवडकर्ता नाही. मी माझे काम करतो. पण यामागे दोन बाजू आहेत. एक म्हणजे तंदुरुस्तीचा मुद्दा. आगामी विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने याकडे खूप गांभिर्याने पाहिले जात आहे. प्रत्येकाला याबाबतीत काही योजना आखाव्याच लागतील. याबाबतीत कोणतीही तडजोड चालणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने संघात प्रयोग करणे आवश्यक आहे. जेणेकरुन प्रत्येक खेळाडूला आपली उपयुक्तता सिध्द करण्याची संधी मिळेल.

याचा अर्थ संघात कोणाचेही स्थान पक्के नाही असे आहे का?
- नक्कीच. सध्या भारतीय क्रिकेटमध्ये खूप गुणवत्ता भरली आहे आणि प्रत्येक प्रकारामध्ये सर्वोत्तम खेळाडूंना अंतिम संघात स्थान देण्याचे आमचे लक्ष्य आहे. सध्या जवळपास प्रत्येक खेळाडू अपेक्षित कामगिरी करत असल्याने, संघनिवड करताना निवडकर्त्यांची आणि संघ व्यवस्थापकांची परीक्षा होते. पण, याहून जास्त दबाव खेळाडूंवर असतो. सर्वोच्च स्तरावर खेळताना या दबावाच्या सामन्यासाठी खेळाडूंमध्ये संयम व क्षमता असायलाच हवी. जे खेळाडू यात अपयशी ठरतात, ते संघातील स्थान गमावतात. संघात प्रयोग करण्याच्या प्रक्रियेदरम्यान संयोजन बिघडले, तर संघाच्या पराभवाची शक्यता असते...
कधीकधी असे होते. प्रत्येक सामना जिंकणे हे आमचे मुख्य लक्ष्य असते, त्याबाबतीत कोणतीही तडजोड करत नाही. पण, एखाद्या स्पर्धेसाठी किंवा मालिकेसाठी सर्वोत्तम खेळाडूंची फळी तयार करण्यासाठी मी काही धोका पत्करण्यास तयार असतो.

कॉमेंट्री बॉक्सची तुम्हाला आठवण येते का? एक प्रशिक्षक म्हणून संघाच्या विजयावर आणि पराभवावर तुमचे विश्लेषन होईल?
- कॉमेंट्री बॉक्सपासून दूर असल्याची मला खंत नाही. कारण मी गेली २५ वर्ष हे काम केले आहे आणि कदाचित पुढे याकडे पुन्हा जाऊ शकतो. प्रशिक्षकपदामुळे मी कायम उत्साहित राहतो. यामाध्यमातून मला काहीप्रमाणात भारतीय क्रिकेटमध्ये योगदान देण्याची संधी मिळाली. संघात सध्या शानदार खेळाडू असून ते चांगल्याप्रकारे आणि कठोर मेहनतीने खेळत आहेत.

Web Title: There is no fixed place in the Indian team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.