Second Test: D Africa's slump; Ashwin's three wickets, after the start of the opening, 269 for 6 after the hosts | दुसरी कसोटी : द. आफ्रिकेची घसरगुंडी; आश्विनचे तीन बळी, दमदार सुरुवातीनंतर यजमान ६ बाद २६९

सेंच्युरियन : शेवटच्या तासात पाच धावांच्या अंतरात तीन बळी घेत भारताने शनिवारपासून प्रारंभ झालेल्या दुसºया कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला दिवसअखेर ६ बाद २६९ धावांत रोखले.
आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विनने तीन महत्त्वाचे बळी घेत भारताला संधी मिळवून दिली. दक्षिण आफ्रिकेतर्फे हाशिम आमला (८२) व मार्कराम (९४) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. आज पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी कर्णधार फाफ डू प्लेसिस (२४) व केशव महाराज (१०) खेळपट्टीवर होते.
फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर भारतीय वेगवान गोलंदाज छाप सोडण्यात अपयशी ठरले. फिरकीपटू रविचंद्रन आश्विन (३-९०) भारतातर्फे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने मार्कराम (९४), डीन एल्गर (३१) आणि क्विंटन डी कॉक (०) यांना माघारी परतवले.
आमला व गृहमैदानावर खेळणाºया मार्करामच्या चमकदार खेळीमुळे यजमान संघ सुस्थितीत होता. पण, दोन धावबाद आणि आश्विनने घेतलेला बळी यामुळे १३ चेंडूंच्या अंतरात दक्षिण आफ्रिकेची ३ बाद २४६ धावसंख्येवरून ६ बाद २५१ अशी घसरगुंडी उडाली.
चहापानानंतर आमला व डीव्हिलियर्स (२०) यांनी तिसºया विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेने ६४ व्या षटकात २०० चा पल्ला ओलांडला. ईशांतने (१-३२) डीव्हिलियर्सलाबाद करीत भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्यानंतर आमलाने डू प्लेसिसच्या साथीने ४७ धावांची भागीदारी केली. घसरगुंडी उडण्यापूर्वी यजमान संघ पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवणार, असे चित्र होते.
८१ व्या षटकात आमला धावबाद झाला. डू प्लेसिससोबत एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात गैरसमज झाला आणि हार्दिक पंड्याने नॉनस्ट्रायकर एंडला थ्रो केला आणि आमलाची खेळी संपुष्टात आली. दोन चेंडूंनंतर आश्विनने क्विंटन डी कॉकला खाते उघडण्यापूर्वी बाद केले. व्हर्नोन फिलँडर (०) त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. भारताने ८७ व्या षटकात नवा चेंडू घेतला, पण त्यानंतर यजमान संघाच्या फलंदाजांनी संयमी खेळी करीत पडझड होऊ दिली नाही.
त्याआधी, आॅफ स्पिनर आश्विनने घेतलेल्या दोन बळीनंतरही यजमान दक्षिण आफ्रिकेने चहापानापर्यंत २ बाद १८२ धावांची मजल मारली होती. सलामीवीर एडन मार्करामला (९४) गृहमैदानावर खेळताना शतकाने हुलकावणी दिली. आश्विनच्या गोलंदाजीवर तो यष्टिरक्षक पार्थिव पटेलकडे झेल देत माघारी परतला. त्याने १५० चेंडूंना सामोरे जाताना १५ चौकार लगावले.
उपाहारापर्यंत दक्षिण आफ्रिकेने बिनबाद ७८ धावा केल्या होत्या. मार्कराम व डीन एल्गर (३१) यांनी सलामीला ८५ धावांची भागीदारी केल्यानंतर आश्विनने भारताला पहिले यश मिळवून दिले. एल्गरचा आश्विनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याचा प्रयत्न फसला आणि तो मुरली विजयकडे झेल देत माघारी परतला. आमला व मार्कराम यांनी दुसºया विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. मार्कराम बाद झाल्यानंतर त्याने डीआरएसचाही अवलंब केला, पण चेंडू बॅटला चाटून गेल्याचे स्पष्ट झाले. दक्षिण आफ्रिकेने ३६ व्या षटकात धावसंख्येचे शतक व ४७ व्या षटकात १५० धावा केल्या होत्या. आमला वैयक्तिक ३० धावांवर असताना सुदैवी ठरला. ५१ व्या षटकात ईशांतच्या चेंडूवर यष्टिरक्षक पार्थिव पटेलने त्याचा झेल सोडला. त्याआधी, दक्षिण आफ्रिकेने उपाहारापर्यंत बिनबाद ७८ धावा केल्या होत्या. एल्गर व मार्कराम यांनी नव्या चेंडूने गोलंदाजी करणारे भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी सावध सुरुवात केली. शमीच्या चार षटकात २३ धावा फटकावल्या गेल्या.
त्याआधी, भारताने अंतिम ११ मध्ये तीन बदल केले. त्यात फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर शिखर धवनच्या स्थानी लोकेश राहुलला व भुवनेश्वरच्या स्थानी ईशांतचा समावेश करण्यात
आला. स्नायूच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या वृद्धिमान साहाच्या स्थानी पार्थिव पटेलचा समावेश करण्यात आला. (वृत्तसंस्था)

धावफलक
दक्षिण आफ्रिका पहिला डाव :- एल्गर झे. विजय गो. आश्विन ३१, मार्कराम झे. पटेल गो. आश्विन ९४, आमला धावबाद ८२, डीव्हिलियर्स त्रि. गो. ईशांत २०, प्लेसिस खेळत आहे २४, डी कॉक झे. कोहली गो. आश्विन ००, फिलँडर धावबाद ००, महाराज खेळत आहे १०. अवांतर : ८. एकूण : ९० षटकांत ६ बाद २६९. बाद क्रम : १-८५, २-१४८, ३-१९९, ४-२४६, ५-२५०, ६-२५१. गोलंदाजी : बुमराह १८-४-५७-०, शमी ११-२-४६-०, ईशांत १६-३-३२-१, पंड्या १४-४-३७-०, आश्विन ३१-८-९०-३.


Web Title: Second Test: D Africa's slump; Ashwin's three wickets, after the start of the opening, 269 for 6 after the hosts
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.