मुंबई अडचणीत; यजमान महाराष्ट्राला पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी

रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रविरूद्ध सुरू असलेल्या इलिट ‘अ’ गटातील लढतीत मुंबईचा संघ अडचणीत आला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 01:59 AM2018-12-08T01:59:38+5:302018-12-08T01:59:52+5:30

whatsapp join usJoin us
In trouble; Hosts Maharashtra have the opportunity to take lead in first innings | मुंबई अडचणीत; यजमान महाराष्ट्राला पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी

मुंबई अडचणीत; यजमान महाराष्ट्राला पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पुणे : रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रविरूद्ध सुरू असलेल्या इलिट ‘अ’ गटातील लढतीत मुंबईचा संघ अडचणीत आला असून पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी यजमान संघाला चालून आली आहे. महाराष्ट्राच्या सर्व बाद ३५२ धावांच्या उत्तरात शुक्रवारी, दुसऱ्या दिवसअखेर मुंबईची अवस्था ५ बाद १९६ अशी झाली.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू आहे. कालच्या ३ बाद २९८ अशा सुस्थितीवरून वरून महाराष्ट्राचा पहिला डाव आज ३५२ धावांवर आटोपला. यजमान संघाचे अखेरचे ७ फलंदाज २२.४ षटकांत अवघ्या ५४ धावांवर बाद झाले. मुंबईतर्फे आकाश पारकर याने ५६ धावांत ४ बळी घेत महाराष्ट्राचे मोठी धावसंख्या उभारण्याचे मनसुबे उधळून लावले. शुभम रांजणे आणि रॉयस्टन डियास यांनीही प्रत्येकी २ बळी घेत पारकरला साथ दिली. प्रत्युत्तरात, चांगल्या प्रारंभानंतरही आजच्या अखेरच्या सत्रात ५३ धावांत ४ फलंदाज गमावल्याने मुंबईचा संघ अडचणीत आला आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार सिद्धेश लाड ७० (१५१ चेंडूंत १ षटकार, ९ चौकार) तर, शुभम रांजणे ९ धावांवर खेळत होते. मुंबईचा संघ अद्यापही १५६ धावांनी मागे आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या फलंदाजांनी केलेला आश्वासक प्रारंभ पाहता हा संघ मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. मात्र, आज पहिल्या १० षटकांत ३ फलंदाज झाल्याने महाराष्ट्राची मोठी धावसंख्या उभारण्याची संधी हुकली. काल ६८ धावांवर नाबाद असलेला जय पांडे आणखी ६ धावांची भर घालून बाद झाला. त्याने १५२ चेंडूंत २ षटकार आणि ६ चौकारांसह ७४ धावा केल्या. कर्णधार राहुल त्रिपाठी (४०) आणि माजी कर्णधार रोहित मोटवानी (६) हे दोघे बाद झाले तेव्हा महाराष्ट्राच्या ६ बाद ३२५ धावा झाल्या होत्या. उर्वरित फलंदाजही नियमित अंतराने माघारी परतले.
जय बिश्त-आदित्य तरे या जोडीने मुंबईला आक्रमक प्रारंभ करून दिला. या संघाच्या ३४ धावा झाल्या असताना आठव्या षटकात समद फल्लाने बिश्तला बाद करून महाराष्ट्राला दिलासा दिला. बिश्तने २६ चेंडूंत ६ चौकारांसह २७ धावा केल्या. यानंतर आदित्य तरे आणि कर्णधार सिद्धेश यांनी दुसºया गड्यासाठी १०९ धावांची शानदार भागिदारी करीत मुंबईला सावरले.
मुंबई मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणार असे वाटत असतानाच सत्यजित बच्छावने आदित्य तरेला बाद करून महाराष्ट्राला मोठे यश मिळवून दिले. आदित्यने १०५ चेंडूंत ६३ धावा करताना ११ चौकार लगावले. आशय पालकरने सूर्यकुमार यादव (१२) आणि अरमान जाफर (६) या गुणवान फलंदाजांना ६ धावांच्या फरकाने पॅव्हेलियनमध्ये पाठवित मुंबईला बॅकफूटवर ढकलले. त्यातून हा संघ सावरायच्या आत चिराग खुराणाने शिवम दुबेला बाद करून मुंबईची अवस्था ५ बाद १८१ अशी केली. सिद्धेश-शुभम जोडीने उर्वरित षटके सावधपणे खेळून काढत आणखी पडझड होऊ दिली नाही. महाराष्ट्रातर्फे आशय पालकरने २ तर, समद फल्ला, सत्यजित बच्छाव आणि चिराग खुराणा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र : पहिला डाव : १०९.४ षटकांत सर्व बाद ३५२ (स्वप्नील गुगळे १०१, जय पांडे ७४, चिराग खुराणा ७१, राहुल त्रिपाठी ४०, नौशाद शेख २३, आकाश पारकर ४/५६, शुभम रांजणे २/३०, रॉयस्टन डियास २/८९, शिवम दुबे १/६०).
मुंबई : पहिला डाव : ५७ षटकांत ५ बाद १९६ (सिद्धेश लाड खेळत आहे ७०, आदित्य तरे ६३, जय बिश्त २७, शुभम रांजणे खेळत आहे ९, आशय पालकर २/३७, चिराग खुराणा १/२, सत्यजित बच्छाव १/२४, समद
फल्ला १/३८).

>रणजीमध्ये महाराष्ट्रातर्फे सर्वाधिक बळी घेण्याचा समद फल्लाचा विक्रम!
मध्यमगती गोलंदाज समद फल्ला याला शुक्रवारच्या खेळात केवळ एकच गडी बाद करण्यात यश आले असले तरी यामुळे महाराष्ट्रातर्फे रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला.
कारकिर्दीतील ६६व्या रणजी सामन्यात त्याने २६०वा बळी घेत या विक्रमाला गवसणी घातली. याआधी हा विक्रम माजी वेगवान गोलंदाज इक्बाल सिद्दिकी यांच्या नावावर होता. समदने आक्रमक फलंदाजी करणारा मुंबईचा सलामीवीर जय बिश्त (२७) याला अनुपम संकलेचाकरवी झेलबाद करताच संघसहकाऱ्यांनी विक्रमवीर समदचे अभिनंदन केले.
३३ वर्षीय समदने आतापर्यंत ७४ प्रथम श्रेणी सामन्यांत २७५ गडी बाद केले आहेत. ९८ धावांत ८ बळी ही त्याची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी. समदने आतापर्यंत सामन्यात १४ वेळा ५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. ‘‘आतापर्यंतच्या कामगिरीवर समाधानी असून यापुढेही शक्य तितका क्रिकेटचा आनंद लुटण्याचा पऋयत्न करणार आहे. या मोसमात बाद फेरी गाठण्याला आमची प्राथमिकता आहे,’’ असे समदने ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: In trouble; Hosts Maharashtra have the opportunity to take lead in first innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.