एरोलीच्या तनिष्क गवतेने रचला इतिहास , प्रणव धनावडेचा विश्वविक्रम मोडला 

नवी मुंबई शालेय क्रिकेटमध्ये 14 वर्षांखालील स्पर्धेत तनिष्क गवते या खेळाडूने इतिहास रचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 05:56 PM2018-01-30T17:56:48+5:302018-01-30T19:47:16+5:30

whatsapp join usJoin us
Tanishk Gavate scored record 1045 runs breaks Pranav dhanawade's record | एरोलीच्या तनिष्क गवतेने रचला इतिहास , प्रणव धनावडेचा विश्वविक्रम मोडला 

एरोलीच्या तनिष्क गवतेने रचला इतिहास , प्रणव धनावडेचा विश्वविक्रम मोडला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील यशवंतराव चव्हाण स्कूलच्या मैदानावर एरोलीच्या तनिष्क अश्विनी गवते याने विश्वविक्रम रचताना कल्याणच्या प्रणव धनावडे याचा सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रम मोडित काढला. तनिष्कने केवळ ५१५ चेंडूमध्ये १४९ चौकार आणि तब्बल ६७ षटकरांचा पाऊस पाडताना नाबाद १०४५ धावांची झंझावाती खेळी केली. दरम्यान हा सामना शालेय मैदानावर झाला असल्याने क्रिकेट नियमांतर्गत हे मैदान योग्य आहे की नाही, याची तपासणी करावी लागेल. मात्र, सध्या तरी तनिष्कच्या विश्वविक्रमाची चर्चा मुंबई क्रिकेटमध्ये रंगली आहे. 
दोन वर्षांपूर्वी कल्याणच्या प्रणव धनावडे याने शालेय क्रिकेटमध्ये वैयक्तिक एक हजार धावांचा टप्पा पार करुन जागतिक क्रिकेटचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. त्यावेळी, हा अद्भुत विक्रम कोणीही मोडू  शकणार नाही, असेच भाकित केले गेले होते. मात्र मंगळवारी तनिष्कने त्याहून अधिक धावा फटकावत नवा विश्वविक्रम रचला. प्रणवने विश्वविक्रमी खेळी करताना तब्बल ११६ वर्षांपूर्वीचा इंग्लंडमधील शालेय विद्यार्थी ए.ई.जे. कॉलिन्स याचा नाबाद ६२८ धावांचा विक्रम मोडला होता. तर यानंतर प्रणवचा विक्रम केवळ दोन वर्षांमध्ये मोडित निघाला. 
१४ वर्षांखालील नवी मुंबई शिल्ड शालेय स्पर्धेची दोनदिवसीय पहिली उपांत्य लढत यशवंतराव चव्हाण आणि यशवंतराव चव्हाण इंग्रजी माध्यम या संघांमध्ये रंगली. प्रथम फलंदाजी करताना यशवंतराव चव्हाण संघाने तनिष्कच्या वादळी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात केवळ ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १,३२४ धावांचा एव्हरेस्ट उभारला. सीराज चासकर याने तनिष्कला चांगली साथ देताना ७७ धावांची संयमी खेळी केली. या दोघांनी ५५० धावांची भक्कम सलामी देत प्रतिस्पर्धी संघाचा घाम फोडला. पहिल्या दिवशी ४०७ धावांवर नाबाद राहिलेल्या तनिष्कने दुसºया दिवशी ६३८ धावा चोपल्या. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या यशवंतराव चव्हाण इंग्रजी माध्यम संघाचा डाव अवघ्या ६३ धावांमध्ये गुंडाळून यशवंतराव चव्हाण संघाने १२६१ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली. 

स्पर्धा मान्यतेचा प्रश्न....
१४ वर्षांखालील नवी मुंबई शिल्ड शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन यशवंतराव चव्हाण इंग्रजी माध्यम शाळेच्या वतीने करण्यात आले होते. ‘आम्ही या स्पर्धेला मान्यता मिळावी यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) कार्यालयात गेलो होतो. स्पर्धा नोंदणी प्रक्रीया मोठी असल्याने त्यास दोन - तीन महिन्यांचा वेळ लागतो. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या परिक्षा येतील, त्यामुळे स्पर्धा सुरु करा त्यानंतर आपण प्रक्रिया पूर्ण करु, असे एमसीएकडून सांगण्यात आले, असे यशवंतराव चव्हाण शाळेचे प्रशिक्षक मनिष सर यांनी सांगितले. त्यामुळे जर एमसीएची मान्यता या स्पर्धेला मिळाली नाही, तर तनिष्कच्या विश्वविक्रमाची अधिकृत नोंदणी होण्यास अडचण येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. 

आमच्याकडे या स्पर्धेची कोणतीही नोंद नव्हती. त्यामुळे आमचा या स्पर्धेशी कोणताही संबंध नाही. तसेच स्पर्धा झाल्यानंतर नोंदणी प्रक्रीया होऊच शकत नाही. अशा अनेक स्पर्धा मुंबई आणि परिसरात होत असतात. आम्ही आमच्या वेळापत्रकानुसार ठरलेल्या स्पर्धांनाच मान्यता देतो.
- विनोद देशपांडे, एमसीए - उपाध्यक्ष

आईने घडविला ‘विश्वविक्रमवीर’
तनिष्क लहानपणापासूनच आपल्या नावापुढे आपली आई अश्विनीचे नाव लावतो. वैयक्तिक कारणास्तव तनिष्क आईकडेच लहानाचा मोठा झाला. त्याने वयाच्या तिसºया वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केल्यानंतर शिवाजी पार्कला क्रिकेट सराव सुरु केला. यासाठी तो नेहमी काका अशोक मढवी यांच्यासोबत एरोलीहून ये-जा करायचा. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून तो मनिष यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवू लागला. ‘तनिष्कमध्ये मोठी क्षमता असून तो सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी करतो. आज त्याला स्वत:ची क्षमता कळाली. यापुढेही त्याच्या कामगिरीमध्ये असेच सातत्य राहिल अशी अपेक्षा आहे,’ असे प्रशिक्षक मनिष यांनी सांगितले.

हजार धावांची खेळी केल्याचा खूप आनंद आहे. यावेळी माझी आई, काका, मावशी असे सर्व कुटुंबिय उपस्थित होते. त्यांच्यासमोर ही खेळी केल्याचा आनंद आहे. यापुढेही अशाच मोठ्या खेळी करण्याचा माझा प्रयत्न राहिल.
- तनिष्क गवते.

Web Title: Tanishk Gavate scored record 1045 runs breaks Pranav dhanawade's record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.