नवी दिल्ली : २०२१ च्या पर्वाआधी आयपीएलसाठी लिलाव प्रक्रिया १८ फेब्रुवारी रोजी चेन्नईत होईल. ही घोषणा इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) आयोजकांनी बुधवारी ट्विटर हँडलवर केली. भारत आणि इंग्लंडदरम्यान चेन्नईत पहिल्या दोन कसोटीनंतर हा लिलाव होणार आहे. मालिकेस ५ फेब्रुवारीस प्रारंभ होत आहे, तर दुसरी कसोटी १३ ते १७ फेब्रुवारीपर्यंत खेळवली जाईल. तथापि, आयपीएल भारतात होणार अथवा नाही, याचा निर्णय आता बीसीसीआयला घ्यावा लागणार आहे. तथापि, मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही लोभस लीग घरच्या मैदानावर आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे.
कोरोना महामारीमुळे २०२० चे पर्व सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरात येथे पार पडले होते. पुढील महिन्यापासून इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका सुरू होत आहे. या मालिकेच्या चांगल्या आयोजनाने लोभस आयपीएल लीगच्या आयोजनाचा मार्ग सुकर होईल. खेळाडूंना रिटेन ठेवण्याची तारीख २० जानेवारीला संपली होती आणि ‘ट्रेडिंग विंडो’ चार फेब्रुवारीला बंद होईल.
अव्वल ऑस्ट्रेलियन खेळाडू जसे की, स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांना अनुक्रमे राजस्थान रॉयल्स व किंग्ज इलेव्हन पंजाबने रिटेन करण्याच्या अखेरच्या तारखेस रिलीज केले होते. ख्रिस मॉरीस, हरभजन सिंग व ॲरोन फिंच यासारख्या खेळाडूंनाही रिलीज करण्यात आले होते. फ्रँचाइजी संघांनी एकूण १३९ खेळाडूंना रिटेन केले, तर ५७ खेळाडूंना रिलीज केले. लिलाव प्रक्रियेसाठी पंजाब संघाजवळ सर्वांत जास्त रक्कम (५३.२० कोटी रुपये) आहे. त्यापाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बँगलोरजवळ ३५.९० कोटी व राजस्थान रॉयल्सजवळ ३४.८५ कोटी रुपये आहेत. कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबादजवळ लिलावासाठी समान १०.७५ कोटी रुपये आहेत.
स्टार खेळाडूंसाठी चढाओढ रंगण्याची शक्यता
राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपरकिंग्ज यांसारख्या संघांनी काही स्टार खेळाडूंना रिलिज केले. त्यामुळे यंदाच्या लिलाव प्रक्रियेमध्ये या खेळाडूंसाठी मोठी चढाओढ रंगण्याची शक्यता आहे. यामध्ये हरभजन सिंग, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, अष्टपैलू ख्रिस मॉरीस, ॲरोन फिंच यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
Web Title: IPL 2021: IPL auction on February 18 in Chennai; The franchise retained 139 players
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.