IPL 2019, CSK vs KKR : सलग चौथा विजय, तरीही महेंद्रसिंग धोनी संतापला; जाणून घ्या कारण

IPL 2019, CSK vs KKR: चेन्नई सुपर किंग्सने मंगळवारी घरच्या प्रेक्षकांसमोर आयपीएल लढतीत कोलकाता नाइट रायडर्सवर 7 विकेट राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 10:18 AM2019-04-10T10:18:38+5:302019-04-10T10:19:25+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019, CSK vs KKR: Despite four wins in a row, MS Dhoni remains unhappy with Chennai pitch | IPL 2019, CSK vs KKR : सलग चौथा विजय, तरीही महेंद्रसिंग धोनी संतापला; जाणून घ्या कारण

IPL 2019, CSK vs KKR : सलग चौथा विजय, तरीही महेंद्रसिंग धोनी संतापला; जाणून घ्या कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई, आयपीएल 2019 : चेन्नई सुपर किंग्सने मंगळवारी घरच्या प्रेक्षकांसमोर आयपीएल लढतीत कोलकाता नाइट रायडर्सवर 7 विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने ( 10 गुण) गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईने घरच्या मैदानावरील चारही सामने जिंकले आहेत, परंतु धोनी खेळपट्टीवरून पुन्हा नाराज झाला आहे. 

चेन्नई सुपर किंग्सने पाहुण्या कोलकाता नाइट रायडर्सला 20 षटकांत 9 बाद 108 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. कोलकाताचे सहा फलंदाज अवघ्या 47 धावांवर माघारी परतले होते. आंद्रे रसेलने 44 चेंडूंत नाबाद 50 धावा करताना कोलकाताला समाधानकारक पल्ला गाठून दिला. चेन्नईने हे लक्ष्य 17.2 षटकांत तीन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. फॅफ ड्यू प्लेसिस ( 43*) आणि अंबाती रायुडू ( 21) यांनी चेन्नईचा विजय निश्चित केला. पण, धोनीने मात्र खेळपट्टीवर पुन्हा एकदा नाराजी प्रकट केली. 

तो म्हणाला,''या खेळपट्टीवर खेळायला हवे, असे मला वाटत नाही. अशा खेळपट्टींमुळे सामन्यात मोठ्या धावसंख्या होत नाहीत. आमच्या फलंदाजांनाही येथे खेळताना अडचण जाणवली. ड्वेव ब्राव्हो दुखापतीमुळे संघाबाहेर आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत फलंदाजीची क्रमवारी ठरवणे आम्हालाही अवघड गेले. आयपीएलमध्ये अशा खेळपट्टी असता कामा नये, परंतु नशिबाने आम्हाला विजय मिळवता आला.'' 


धोनीनं अनुभवी गोलंदाज हरभजन सिंग व इम्रान ताहीर यांचेही कौतुक केले. तो म्हणाला,''भज्जीनं मिळालेल्या संधीत उल्लेखनीय कामगिरी केली. ताहीरची गोलंदाजीही उत्तम झाली. त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आपल्याला कशी गोलंदाजी अपेक्षित आहे हे त्याला सांगितल्यास तो निराश करत नाही.''  

दरम्यान, आयपीएलच्या सलामीच्या सामन्यानंतरही धोनीनं खेळपट्टीवर नाराजी प्रकट केली होती. गतविजेत्या चेन्नईने उद्धाटनीय सामन्यात रॉयल्स चॅलेंजर बंगळुरूचा धुव्वा उडवला होता. हरभजन सिंग, इम्रान ताहीर आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीनं बंगळुरूचा डाव 70 धावांत गुंडाळला आणि चेन्नईने हे माफक लक्ष्य सहज पार केले. चेन्नईने 17.4 षटकांत 71 धावा करताना विजयी सलामी दिली. अंबाती रायुडूने 42 चेंडूंत 28 धावा केल्या. 

37 वर्षीय धोनी म्हणाला,''या खेळपट्टीचा मलाही अंदाज नव्हता. आम्ही या खेळपट्टीवर सराव केला होता आणि या सामन्यात मोठी धावसंख्या होईल, असे आम्हाला वाटले होते. पण, सराव सामन्यात आम्ही प्रत्यक्ष सामन्यापेक्षा 30 धावा अधिक केल्या होत्या. त्यामुळे या खेळपट्टीने आम्हालाही आश्चर्यचकीत केले. या खेळपट्टीत सुधारणा होण्याची गरज आहे. दव असतानाही चेंडू प्रचंड फिरकी घेत होता. 80, 90, 100 धावा ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये खूपच कमी आहे. या पुढील सामन्यात अशी खेळपट्टी आम्हाला नक्कीच नकोय.''

Web Title: IPL 2019, CSK vs KKR: Despite four wins in a row, MS Dhoni remains unhappy with Chennai pitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.