IPL 2018 : चेन्नईला जिंकवतेय 'डॅडी गँग', सामने फिरवतंय 'हे' त्रिकूट

बरेचसे सामने शेवटच्या क्षणी जिंकण्याची किमया करून चेन्नई सुपरकिंग्जनं चाहत्यांना खूष करून टाकलंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 05:46 PM2018-05-03T17:46:33+5:302018-05-03T17:46:33+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2018 : Dhoni, Watson, Bravo's major contribution in CSK's wins | IPL 2018 : चेन्नईला जिंकवतेय 'डॅडी गँग', सामने फिरवतंय 'हे' त्रिकूट

IPL 2018 : चेन्नईला जिंकवतेय 'डॅडी गँग', सामने फिरवतंय 'हे' त्रिकूट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पुणेः दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये परतलेली 'चेन्नई एक्स्प्रेस' सुस्साट धावतेय. धोनीसेना गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. बरेचसे सामने शेवटच्या क्षणी जिंकण्याची किमया करून त्यांनी चाहत्यांना खूष करून टाकलंय. चेन्नई सुपरकिंग्जच्या या यशामागे 'डॅडी गँग' असल्याचं समोर आलंय. अर्थात, या 'डॅडी गँग'चा दगडी चाळीशी काही संबंध असून हे 'डॅडी' वेगळेच आहेत. 

चेन्नईने जिंकलेल्या सहा सामन्यांमध्ये शेन वॉटसन, 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनी आणि डीजे ब्राव्हो या त्रिकुटाची महत्त्वाची भूमिका राहिलीय. या तिघांपैकी दोघांनी पस्तीशी ओलांडली आहे, तर ब्राव्हो ३५च्या उंबरठ्यावर आहे. हे तिघंही आज वडील आहेत. त्यांच्या वयाकडे अनेकांनी बोट दाखवलं होतं. पण, वय हा आपल्या कामगिरीतील अडथळा नसून, वयपरत्वे आलेला अनुभव महत्त्वाचा ठरतो असं या तिघांनीही सिद्ध केलंय, याकडे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगनं लक्ष वेधलं. त्यांच्यासोबतच, चेन्नईचा सलामीवीर अंबाती रायुडूही सातत्याने लक्षणीय कामगिरी करतोय. त्याचं वयही ३२ वर्षं २२२ दिवस इतकं आहे.

शेन वॉटसनचं वय ३६ वर्षं ३२० दिवस आहे. त्यानं ८ सामन्यांत एका शतकासह २८१ धावा केल्यात. त्याचा स्ट्राइक रेट १६६ आहे. 'सेट' व्हायला थोडा वेळ घेतल्यानंतर वॉटसनला सूर गवसलाय. त्याच्यासोबतच सलामीला येणाऱ्या रायुडूनंही ८ सामन्यांत ३७० धावा कुटल्यात. कालच्या सामन्याआधी ऑरेंज कॅपही त्याच्याकडे होती. 

महेंद्रसिंह धोनीच्या फिटनेसबाबत तर बरीच उलटसुलट चर्चा सुरू होती. पण तीन अर्धशतकं झळकावून त्यानं बॅटनंच उत्तर दिलंय. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. त्यानं १६९ च्या स्ट्राइक रेटनं २८६ धावा फटकावल्यात. जिममध्ये रोज तीन तास व्यायाम करून त्यानं आपली ताकद परत मिळवलेय आणि आता तो चौकार, षटकारांचा पाऊस पाडतोय. वॉटसन आणि धोनीच्या गाठीशी प्रचंड अनुभव आहे. कुठल्या परिस्थितीचा कसा सामना करायचा, हे त्यांना नेमकं ठाऊक आहे. तो त्यांच्या काही खेळींमधून स्पष्ट दिसला आणि त्याच जोरावर चेन्नईनं बाजी मारली.  

ड्वेन ब्राव्हो हा तर चेन्नईचं ब्रह्मास्त्रच झालाय. गोलंदाजी असो की टोलंदाजी तो योग्य वेळी धोनीच्या मदतीला धावून आलाय. शेवटच्या काही षटकांत तो ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, 'स्लो' बॉलचं अस्त्र वापरून प्रतिस्पर्धांची धावगती 'स्लो' करून टाकतो, त्याला तोड नाही. त्यातून त्याच्या अनुभवाची प्रचिती येते. ही 'डॅडी गँग' जर अशीच सक्रिय राहिली, तर सगळेच चेन्नईपुढे 'बच्चे' असतील, हे नक्की. 
   
ऑस्ट्रेलियाचा माजी शिलेदार शेन वॉटसन हा एक मुलगा आणि एका मुलीचा बाबा आहे. धोनीची कन्या झिवा तर आपली सगळ्यांचीच लाडकी झालीय. तिचे व्हिडीओ आपण नेहमीच पाहत असतो. ब्राव्होलाही एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आपल्या बाबांची आयपीएलमधील कामगिरी पाहून ही मुलंही नक्कीच म्हणत असतील, 'पापा द ग्रेट', 'माय डॅडी स्ट्राँगेस्ट'!

Web Title: IPL 2018 : Dhoni, Watson, Bravo's major contribution in CSK's wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.