जामठ्याच्या संथ खेळपट्टीवर बाजी मारण्याचे भारताचे लक्ष्य

कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 04:14 AM2019-03-05T04:14:43+5:302019-03-05T04:14:54+5:30

whatsapp join usJoin us
 India's goal of hitting Jamtha's slow pitch | जामठ्याच्या संथ खेळपट्टीवर बाजी मारण्याचे भारताचे लक्ष्य

जामठ्याच्या संथ खेळपट्टीवर बाजी मारण्याचे भारताचे लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नागपूर : यजमान संघासाठी अनुकूल राहिलेल्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठास्थित मैदानावर मंगळवारी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. दुसरीकडे सलामीलाच पराभवाचे तोंड पाहणारा पाहुणा संघ देखील हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल.
हैदराबाद येथील पहिल्या सामन्यात भारताने आॅस्ट्रेलियाचा सहा गड्यांनी पराभव करीत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. जामठ्याची खेळपट्टी गोलंदाजीसाठी संथ समजली जाते. अनेकदा ३०० वर धावा निघाल्याचा या खेळपट्टीचा इतिहास आहे. त्यामुळे हा सामनाही मोठ्या धावसंख्येचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिला विजय भारतासाठी ‘बूस्टर’ सारखा ठरला. कारण त्याआधी टी२० मालिकेत पाहुण्या संघाकडून ०-२ ने पराभवाचे तोंड पहावे लागले होते. विश्वचषकासाठी संघबांधणीचा भाग म्हणून मालिकेकडे पाहिले जात असल्याने ज्या दोन खेळाडूंना संघात स्थान द्यायचे त्यांना पारखण्यासाठी आता केवळ चारच एकदिवसीय सामने शिल्लक आहेत.
सलामीवीर शिखर धवन हैदराबादमध्ये शून्यावर बाद झाला तरी त्याला आणखी एक संधी मिळू शकते. अशावेळी लोकेश राहुल बाहेर बसेल. राहुल खेळला तर तो देखील संधीचे सोने करू शकतो. कर्णधार कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांची जोडी स्थिरावल्यास मोठी धावसंख्या उभारण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अंबाती रायुडू हा देखील पहिल्या सामन्यात अपयशी ठरला होता. तथापि त्याची क्षमता पाहता त्याच्या स्थानाला धक्का लागण्याची शक्यता नाहीच.
>ऋषभ पंतला संधी...
पहिल्या सामन्यात नाबाद ८१ धावा ठोकणारा केदार जाधव हा उपयुक्त खेळाडू ठरल्याने फलंदाजीत त्याचे सहावे स्थान निश्चितआहे. आॅफस्पिन गोलंदाजीतही तो चांगला पर्याय ठरतो. धोनीच्या नाबाद ५९ धावांनी त्याच्यात अद्याप ‘दम’ असल्याचे सिद्ध केले. अष्टपैलू विजय शंकरच्या जागी ऋषभ पंत याला संधी मिळू शकते. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या वेगवान माऱ्याला साथ देण्यासाठी कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे फिरकीपटू असतील. पहिल्या सामन्यात एकही बळी न मिळाल्याने जडेजाला बाहेर बसविल्यास युझवेंद्र चहल खेळू शकेल.
>फिंचचा फॉर्म सर्वात मोठी डोकेदुखी...
आॅस्ट्रेलियासाठी कर्णधार अ‍ॅरोन फिंच याचा ‘आॅफ फॉर्म’ डोकेदुखी ठरत आहे. दोन्ही टी२० त शून्य आणि आठ धावांवर बाद झालेला फिंच पहिल्या एकदिवसीय सामन्यात देखील भोपळा फोडू शकला नव्हता. याशिवाय सलामीवीर उस्मान ख्वाजा, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोइनिस हे स्थिरावल्यानंतरही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले होते. गोलंदाजीत मात्र लेगस्पिनर अ‍ॅडम झम्पा याने भारतीय फलंदाजांना त्रास दिला. विशेषत: विराट कोहलीला त्याने सतत बाद केले आहे. पॅट कमिन्स आणि नाथन कोल्टर नाईल यांची त्याला साथ लाभल्यास भारतीय फलंदाजी अडचणीत येऊ शकते. जेसन बेहरेनडोर्फच्या जागी अँड्र्यू टाय याला संधी मिळण्याची दाट श्क्यता वर्तविण्यात येत आहे.
>प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, ऋषभ पंत, सिद्धार्थ कौल, लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा.
आॅस्ट्रेलिया : अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), डी’अ‍ॅर्सी शार्ट, शॉन मार्श, मार्कस स्टोइनिस, उस्मान ख्वाजा, अ‍ॅलेक्स केरी, पीटर हँडस्कोम्ब, अ‍ॅश्टन टर्नर, अ‍ॅडम झम्पा, जेसन बेहरेनडोर्फ, झाय रिचर्डसन, पॅट कमिन्स, अँड्र्यू टाय, नॅथन कुल्टर-नाइल आणि नॅथन लियोन.

Web Title:  India's goal of hitting Jamtha's slow pitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.