भारताला कामगिरीचा दर्जा उंचवावा लागेल- गावसकर

विंडीजच्या तुलनेत वरचे मानांकन असलेल्या भारतीय संघाला आपल्या कामगिरीचा दर्जा उंचवावा लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 04:06 AM2018-10-29T04:06:25+5:302018-10-29T06:49:44+5:30

whatsapp join usJoin us
India will have to improve the quality of performance: Gavaskar | भारताला कामगिरीचा दर्जा उंचवावा लागेल- गावसकर

भारताला कामगिरीचा दर्जा उंचवावा लागेल- गावसकर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पुणे येथे तिसऱ्या एकदिवसीय लढतीत वेस्ट इंडिजने भारताला पराभवाचा धक्का देत मालिकेत बरोबरी साधली. कर्णधार कोहलीच्या सलग तिसऱ्या शतकी खेळीनंतरही भारतीय संघाला विंडीजने दिलेले लक्ष्य गाठण्यात अपयश आले. विराट कोहली जगात अव्वल फलंदाज आहे; कारण तो केवळ खोऱ्याने धावा करतो म्हणून नाही तर त्या धावा तो कुठल्या स्थितीत करतो, हेसुद्धा महत्त्वाचे आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नसते. आवश्यक धावगती सुरुवातीपासूनच मोठी असताना काही षटके चांगली गोलंदाजी झाली किंवा फलंदाज बाद झाले तर आवश्यक धावगतीचा आलेख अधिक उंचावत जातो. दडपण असताना फलंदाजाच्या संयमाची खरी चाचणी होती. अनेक फलंदाज प्रथम फलंदाजी असताना मोठी खेळी करतात. लक्ष्याचा पाठलाग करताना दडपण असते. आवश्यक धावगती राखण्याचे मनात घोळत असते. त्यामुळे कोहली विशेष ठरतो. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याच्या खेळीमध्ये सर्व प्रकारचे फटके अनुभवाला मिळतात. त्याचसोबत तो आपल्या डावाची बांधणी कशी करतो, हे शिकण्यासारखे असते. त्यामुळे फलंदाजांचे रेटिंग ठरविताना मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना किती धावा केल्या किंवा स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत फलंदाजी कशी होते, हे मुख्य निकष असायला हवे. या निकषामध्ये कोहली सर्वांना पिछाडीवर सोडत अव्वल स्थानी आहे.

मधल्या षटकांमध्ये शैलीदार शाई होप आणि कर्णधार जेसन होल्डर खेळपट्टीवर असताना विंडीज संघाची वाटचाल शानदार होती. त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये अ‍ॅश्ले नर्सने आक्रमक फलंदाजी करीत विंडीजला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला चांगल्या सुरुवातीची गरज होती. जेसन होल्डर खेळाडू व कर्णधार म्हणून दिवसागणिक सुधारणा करीत आहे. गोलंदाजीची सुरुवात करताना त्याने रोहित शर्माला स्वस्तात बाद केले. त्यानंतर विराट कोहली भारताला विजय मिळवून देईल, असे वाटत असताना होल्डरने अनुभवी मार्लोन सॅम्युअल्सकडे चेंडू सोपवला. सॅम्युअल्सने भारतीय कर्णधाराला तंबूचा मार्ग दाखवत विजयाचा मार्गातील महत्त्वाचा अडथळा दूर केला. मालिका आता बरोबरीत आहे. त्यामुळे विंडीजच्या तुलनेत वरचे मानांकन असलेल्या भारतीय संघाला आपल्या कामगिरीचा दर्जा उंचवावा लागेल. (पीएमजी)

Web Title: India will have to improve the quality of performance: Gavaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.