India Vs Pakistan World Cup 2019: सर्फराजला संघाबाहेर करा; चाहत्यांची मागणी

फलंदाजीत, गोलंदाजीत अपयशी ठरल्याने सर्वांची निराशा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 02:34 AM2019-06-18T02:34:29+5:302019-06-18T06:26:32+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan World Cup 2019: Make Surfraz out of the team; Demand for fans | India Vs Pakistan World Cup 2019: सर्फराजला संघाबाहेर करा; चाहत्यांची मागणी

India Vs Pakistan World Cup 2019: सर्फराजला संघाबाहेर करा; चाहत्यांची मागणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कराची : भारतीय संघाकडून विश्वचषक स्पर्धेत सलग सातव्यांदा पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानात राष्ट्रीय संघाबाबत रोष आहे. नाणेफेक जिंकल्यानंतरही गोलंदाज काही करू शकले नाहीत, शिवाय फलंदाजही फ्लॉप झाले. सलामी जोडी फुटताच फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. त्यामुळे पाकिस्तानच्या चाहत्यांनी ट्विटरवर ‘सर्फराजला परत बोलवा’ हा ट्रेंड सुरू आहे.

पारंपरिक प्रतिस्पर्धी भारतीय संघाकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचे चाहते रागात असून कर्णधार सर्फराज अहमद याला ते यापुढे संघात पाहू इच्छित नाहीत. एका चाहत्याने आपली निराशा व्यक्त करताना लिहिले, ‘सर्फराज संघात का आहे? यष्टिरक्षक म्हणून त्याने तीन झेल आणि एक यष्टीचीत सोडले. फलंदाज म्हणून गोलंदाजांचा सामना करू शकला नाही. कर्णधार या नात्याने क्षेत्ररक्षण कसे सजवावे हे देखील त्याला माहीत नव्हते.’

सर्फराजच्या निरुत्साहावरही राग...
सामन्यादरम्यान एक व्हिडीओ पुढे आला. यात सर्फराज जांभई देताना दिसत आहे. सोशल मीडियावर यामुळे चाहत्यांनी त्याच्या निरुत्साहामुळे पाक संघ पराभूत झाल्याचे म्हटले आहे. सामन्यादरम्यान पाक खेळाडू उत्साहात नव्हते, असे अनेक जाणकारांनी सांगितले. एका चाहत्याने सोशल मीडियावर माजी कर्णधार इम्रान खान आणि सध्याचा कर्णधार सर्फराजचे फोटो लावून दोघांमधील फरक स्पष्ट केला.

खेळाडू पार्टीत व्यस्त
संघाच्या पराभवानंतर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सामन्याआधी खेळाडू पार्टीत व्यस्त असलेले व्हिडीओत दिसत आहे. व्हिडीओत शोएब मलिक आणि भारताची टेनिसपटू असलेली त्याची पत्नी सानिया मिर्झाही दिसत आहे. पाकचे खेळाडू एका रेस्टॉरेंटमध्ये बसल्याचे दृश्य असून भारताविरुद्ध शोएब भोपळा न फोडताच बाद झाल्यामुळे शोएब सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला. सानियाने स्वत: या व्हिडीओबाबत टिष्ट्वट केले असून यावर आक्षेप नोंदविणाऱ्या ट्रोलर्सला खडसावले आहे. सानियाने लिहिले, ‘हा व्हिडीओ आमच्या परवानगीविना घेण्यात आला. हा आमच्या खासगी आयुष्याचा अनादर आहे. आमच्यासोबत आमचा मुलगा देखील होता. सामना गमविल्यानंतरही लोकांना खाण्यापिण्याची मोकळीक आहे, मग खेळाडूंना का नाही...’

त्याचवेळी, पाकच्या अनेक चाहत्यांनी भारतीय संघाचे कौतुक केले. आम्हाला पराभव स्वीकारण्यात कुठलीही अडचण नाही, असे या चाहत्यांनी लिहिले. कर्णधार विराट कोहलीच्या चाणाक्षपणाची अनेकांनी स्तुती केली. काहींनी विराटला बेस्ट कॅप्टन आणि चाणाक्ष खेळाडू असे संबोधले. क्रिकेटपटू बनायचे असेल तर विराटसारखे आक्रमक आणि उत्साहाचा संचार असलेले बना,’ असे मत अनेकांनी नोंदविले.

Web Title: India vs Pakistan World Cup 2019: Make Surfraz out of the team; Demand for fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.