IND vs AUS 2nd Test: पर्थच्या हिरव्यागार खेळपट्टीवर ऑसींची ‘विकेट’ काढण्यासाठी भारत उत्सुक

दुसरी कसोटी आजपासून; आश्विन, रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 01:43 AM2018-12-14T01:43:48+5:302018-12-14T06:22:53+5:30

whatsapp join usJoin us
India vs AUS 2nd Test: India keen to remove Aussie's 'wicket' on Perth's green pitch | IND vs AUS 2nd Test: पर्थच्या हिरव्यागार खेळपट्टीवर ऑसींची ‘विकेट’ काढण्यासाठी भारत उत्सुक

IND vs AUS 2nd Test: पर्थच्या हिरव्यागार खेळपट्टीवर ऑसींची ‘विकेट’ काढण्यासाठी भारत उत्सुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पर्थ : खेळपट्टीवर गवत असल्यावर एकेकाळी भारतीय संघ चिंताग्रस्त व्हायचा, पण विराट कोहलीच्या नेतृत्वात शुक्रवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी कसोटी खेळणारा भारतीय संघ मुळीच चिंतेत नाही. हिरव्यागार खेळपट्टीवर यजमानांची पुन्हा ‘विकेट’ काढण्याच्या निर्धारानेच टीम इंडिया खेळेल.

कसोटीच्या या नव्या केंद्रातील खेळपट्टीवर गवत पाहून विराटसेना चिंताग्रस्त नाही. ही विजयाची संधी असेल असे संघव्यवस्थापनाचे मत आहे. क्यूरेटर ब्रेट सिपथोर्प यांनी उसळी घेणारी खेळपट्टी तयार केली असून यजमान संघासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. भारत आता अशा खेळपट्ट्यांवर खेळण्यास घाबरत नाही. अ‍ॅडलेडची पहिली कसोटी जिंकणारा भारतीय संघ येथे विजय मिळवून आघाडी भक्कम करू शकतो. वाकाची जुनी खेळपट्टी नेहमी गोलंदाजांना अनुकूल मानली जायची. नव्या मैदानावर तीच परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न आहे. खेळपट्टीवर गवत असल्याने उभय संघ डावपेच बदलतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

रोहित शर्मा पाठदुखीमुळे तसेच आणि रविचंद्रन अश्विन मांसपेशीच्या दुखण्यामुळे बाहेर बसले आहेत. पृथ्वी शॉ अद्याप संघात परतला नसल्याने लोकेश आणि मुरली विजय पुन्हा एकदा डावाची सुरुवात करतील. २०१२ मध्ये भारत येथे केवळ दोन गोलंदाजांसह खेळला. त्यावेळी धोनीने जहीर, उमेश यादव, ईशांत शर्मा आणि विनयकुमार यांना आजमावले होते. सेहवागनेही आठ षटके गोलंदाजी केली होती. या खेळपट्टीचा अलीकडचा रेकॉर्ड पाहता एका सामन्यात ४० गडी बाद झाले होते. त्यातील आठ गडी फिरकीपटूंनी बाद केले. यजमान संघाचा ऑफस्पिनर नाथन लियोन खेळपट्टीचा अधिक लाभ घेऊ शकतो. अश्विन फिट असता तर कोहलीने देखील त्याला खेळविण्यास प्राधान्य दिले असते. जडेजा संघात आहे पण तो खेळेलच याची शाश्वती नाही.

भारतीय फलंदाजी क्रमात मात्र बदल होणार नाही. ऑस्ट्रेलिया मात्र फलंदाजीचा क्रम बदलू शकतो. अ‍ॅरोन फिंच पहिल्या कसोटीत अपयशी ठरला. त्याला मधल्या फळीत खेळविले जाऊ शकते. अष्टपैलू मिशेल मार्श याच्या हाताला जखम असल्याने तो खेळण्याची शक्यता कमी आहे. गोलंदाजीत मात्र बदल शक्य नाही. (वृत्तसंस्था)

उसळी घेणारी खेळपट्टी बनविण्याचा प्रयत्न : क्युरेटर
वाका मैदानाचे मुख्य क्यूरेटर ब्रेट सिपथोर्प यांनी नव्या स्टेडियमवरील गवताळ खेळपट्टी उसळी घेणारी बनविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले. खेळपट्टीवरील हिरवळ पाहता उभय संघांना डावपेचात बदल करावे लागतील. सर्वजण चेंडू उसळण्याबद्दल चर्चा करतात पण ३८ डिग्री सेल्सियस तापमानात तुम्ही किती दडपण झेलू शकता यावर विचार होणे आवश्यक आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी घेताना तुम्ही परिस्थितीचा लाभ उचलू शकता. ५० षटकानंतर कोण किती थकतो, यावर सामन्याचा निकाल विसंबून असेल, असे ते म्हणाले.

नाणेफेक गमावणे लाभदायी ठरेल - पेन
गवताळ खेळपट्टी आणि उष्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या कसोटीत नाणेफेक गमविणे लाभदायी ठरेल, असे संकेत यजमान संघाचा कर्णधार टिम पेन याने दिले. तो म्हणाला, ‘मी क्यूरेटरसोबत चर्चा केली. गरमीमुळे खेळपट्टीला भेगा जाण्याची शंका आहे. सामन्यादरम्यान भेगा पडलेल्या पाहू शकाल. नाणेफेकीचा कौल काहीही असो चांगली सुरुवात करावीच लागणार आहे. आम्ही भारताची बलस्थाने आणि उणिवा यावर अभ्यास केला. आव्हानात्मक परिस्थितीत भारतावर मात करीत मालिकेत बरोबरी साधण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यासाठी पहिल्या चेंडूपासूनच सामन्यावर वर्चस्व मिळविणे गरजेचे आहे.’

प्रतिस्पर्धी संघ
भारत (अंतिम १३) : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया (संभाव्य एकादश) : टिम पेन (कर्णधार व यष्टिरक्षक), मार्कस हॅरिस, अ‍ॅरोन फिंच, उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, शॉन मार्श, पीटर हॅन्डस्कोम्ब, नाथन लियोन, मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड.
 

Web Title: India vs AUS 2nd Test: India keen to remove Aussie's 'wicket' on Perth's green pitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.