भारताचा श्रीलंकेवर 168 धावांनी विजय, विराट-रोहितची झुंझार खेळी

भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या वन-डे सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर 168 धावांनी विजय मिळविला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 09:53 PM2017-08-31T21:53:52+5:302017-08-31T22:11:00+5:30

whatsapp join usJoin us
India beat Sri Lanka by 168 runs | भारताचा श्रीलंकेवर 168 धावांनी विजय, विराट-रोहितची झुंझार खेळी

भारताचा श्रीलंकेवर 168 धावांनी विजय, विराट-रोहितची झुंझार खेळी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो, दि. 31 -  भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या वन-डे सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर 168 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात भारताने दिलेल्या 376 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने 42.4 षटकात 10 बाद 207 धावा केल्या. 
खेळाडूंच्या दुखापती आणि आजाराने ग्रासलेल्या श्रीलंका संघाला सलग चौथ्या वन-डेत भारताने एकतर्फी धूळ चारली. भारताने दिलेल्या 376 धावांचे आव्हान पेलण्यास श्रीलंकेचा फलंदाज अपयशी ठरले. फलंदाज अँजेलो मॅथ्यूज वगळता कोणत्याही श्रीलंकेच्या फलंदाजाला म्हणावी तशी खेळी करता आली नाही. या सामन्यात अँजेलो मॅथ्यूजने 80 चेंडूत 10 चौकार लगावत 70 धावांची खेळी केली. मात्र ती अयशस्वी ठरली.  निरोशन डिकवेला (14), दिलशान मुनावीरा (11), कुशल मेंडिस (1), लाहिरू थिरीमन्ने (18), मिलिंदा सिरिवर्धना (39), वानिंदू हसरंगा (3), विश्वा फर्नांडो (5) लसिथ मलिंगा शून्य धावेवर बाद झाला. तर, अकिला धनंजया 11 धावांवर नाबाद राहिला. भारताच्या गोलंदाजानी या सामन्यात चांगली कामगिरी केली. हार्दिक पांड्या. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. तर शार्दूल ठाकूर आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. 
 तत्पूर्वी, टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताने चांगली धावसंख्या केली. भारताने 50 षटकात पाच बाद 375 धावा केल्या आहेत. सामन्याच्या सुरुवातीला शिखर धवन स्वस्तात बाद झाला असल्याने भारताला पहिलाच फटका बसला. सहा धावांवर भारताने पहिली विकेट गमावली. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दमदार शतकी फलंदाजी केली. रोहित शर्माने 88 चेंडूत 104 धावा केल्या. तर विराट कोहलीने या सामन्यात 76 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विराट कोहलीने 17 चौकार आणि दोन षटकार लगावत 96 चेंडूत 131 धावा केल्या. त्याला लसिथ मलिंगाने बाद केले.त्यानंतर हार्दिक पांड्या, लोकेश राहूल लवकर बाद झाले. हार्दिक पांड्याने 19 आणि लोकेश राहूल याने अवघ्या सात धावा केल्या. मनिष पांडेने नाबाद अर्धशतक ठोकले. तर, धोनीने नाबाद 49  धावा केल्या.  
श्रीलंकेकडून अकिला धनंजया याचा अपवाद वगळता, एकाही गोलंदाजाला भारतीय फलंदाजांवर दडपण आणता आले नाही. गोलंदाज लसिथ मलिंगा,अकिला धनंजया, विश्वा फर्नांडो यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. तर, अँजेलो मॅथ्यूजने दोन बळी टिपले. 

धोनी@ 300! 
पाच वन-डे सामन्यांची मालिका काबीज करीत भारतीय संघाने श्रीलंका दौ-याची मोहीम फत्ते केली. चौथ्या सामन्यात सर्वांच्या नजरा होत्या त्या माहीवर. हा सामना केवळ औपचारिक असला तरी तो महेंद्रसिंह धोनीसाठी खास असेल; कारण धोनीच्या वन-डे कारकिर्दीतील तो 300 वा वनडे आहे. धोनी गेल्या 13 वर्षांपासून खेळत आहे. भारताकडून 300 वनडे खेळणारा धोनी हा देशाचा सहावा खेळाडू आहे. या यादीत सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. सचिनने सर्वाधिक 463 सामने खेळले आहेत.

Web Title: India beat Sri Lanka by 168 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.