ICC World Cup 2019: कोणाला संधी आहे उपांत्य फेरीची?

विद्यमान अव्वल चार संघ ठरणार ‘फॅन्टास्टिक फोर’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 02:09 AM2019-06-21T02:09:45+5:302019-06-21T07:09:21+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Who has the chance to make the semifinals? | ICC World Cup 2019: कोणाला संधी आहे उपांत्य फेरीची?

ICC World Cup 2019: कोणाला संधी आहे उपांत्य फेरीची?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे चार संघ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारतील, असे भाकीत अनेकांनी केले होते आणि सध्या या संघांची वाटचालही त्याच दिशेने सुरू आहे. केवळ फरक आहे तो गुणतालिकेतील स्थानांमध्ये. त्यामुळेच आतापर्यंत झालेल्या कामगिरीनुसार उपांत्य फेरीत कोणते संघ धडक मारतील यावर टाकलेली एक नजर....

ऑस्ट्रेलिया : पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वचषक स्पर्धेत कायम फॉर्ममध्ये येतो. त्यांना आतापर्यंत एकमेव पराभव टीम इंडियाकडून पत्करावा लागला. गुरुवारी बांगलादेशविरुद्ध बाजी मारत त्यांनी अव्वल स्थानी झेप घेतली. या संघाला उपांत्य फेरीची मोठी संधी आहे.

इंग्लंड : यजमान इंग्लंडला यंदा जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. पाकिस्तानविरुद्धचा अनपेक्षित पराभव वगळता इंग्लंडने दणकेबाज खेळ केला आहे. सर्व प्रमुख खेळाडू फॉर्ममध्ये असल्याने हा संघही सहजपणे उपांत्य फेरी गाठू शकतो.

न्यूझीलंड : गुणतालिकेत न्यूझीलंडने दुसरे स्थान मिळवताना एकही सामना गमावलेला नाही. भारताविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी आव्हानात्मक मानला जात होता, मात्र पावसामुळे नाणेफेकही न झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले होते. तरी एकूणच फॉर्म पाहता हा संघ नक्कीच उपांत्य फेरी गाठेल.

भारत : स्पर्धेतील सर्वात तगडा संघ म्हणून सहभागी झालेल्या टीम इंडियाने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना चौथे स्थान पटकावले आहे. मात्र भारताने इतर संघांच्या तुलनेत एक सामना कमी खेळला असून अद्याप एकही पराभव पत्करलेला नाही. पावसामुळे रद्द झालेला न्यूझीलंडविरुद्धचा सामना पूर्ण खेळला गेला असता, तर कदाचित भारतीय संघाने अव्वल स्थानही गाठले असते. पण सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारतीयांसाठी हे अव्वल स्थान फार दूर नाही हेही तितकेच खरे. आता मुख्य आव्हान आहे ते यजमान इंग्लंडला नमविण्याचे.

वेस्ट इंडिज : कागदावर भारी दिसणारा हा संघ प्रत्यक्षात फ्लॉप ठरला. पाच सामन्यांतून तीन पराभव पत्करावे लागल्यानंतर आता त्यांना न्यूझीलंड, भारत या तगड्या संघांसह अफगाणिस्तान, श्रीलंका यांचा सामना करायचा आहे. न्यूझीलंड व भारताला नमवण्यासाठी त्यांना कठोर प्रयत्न करावे लागतील.

दक्षिण आफ्रिका : मोठ्या स्पर्धेत हमखास अपयशी होण्याची परंपरा द. आफ्रिकेने या वेळीही कायम राखली. ६ सामन्यांतून केवळ एक विजय मिळवलेल्या आफ्रिकेला आता पाक, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे आहे. एकूण अवस्था पाहता या संघासाठी उपांत्य फेरी कठीण आहे.

बांगलादेश : सुरुवातीला दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर वेस्ट इंडिज यांना धक्का देत जोमाने सुरुवात केलेल्या बांगलादेशने यंदा सर्वांनाच प्राभावित केले. पण उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि भारत या बलाढ्य संघांना नमवावे लागेल. चारपैकी हे तीन सामने कठीण असल्याने बांगलादेशची स्थिती ‘जर-तर’वर अवलंबून असेल.

पाकिस्तान : सर्वात बेभरवशाचा हा संघ कधी मुसंडी मारेल सांगता येत नाही. ५ सामने झाल्यानंतर नवव्या स्थानी असलेल्या पाकला आता द. आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान व बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहे. यातील तीन सामने जरी पाकने जिंकले तर ते उपांत्य फेरीत येऊ शकतील.

श्रीलंका : पावसाचा दोन वेळा फटका बसल्यानंतर लंकेची अवस्था कमजोर झाली आहे. ५ सामन्यांतून ४ गुणांची कमाई केल्यानंतर आता त्यांना इंग्लंड, द. आफ्रिका, विंडीज आणि भारत यांचा सामना करायचा आहे. यातील किमान ३ सामने त्यांना जिंकावे लागतील.

अफगाणिस्तान : गुणतालिकेत सध्या तळाला असलेला हा संघ बहुतेक अखेरपर्यंत तळालाच राहण्याची शक्यता आहे. पाच सामन्यांतून अद्याप एकही विजय न मिळवलेल्या अफगाण संघाच्या गुणांचे खाते उघडलेले नाही. शिवाय पुढे भारत, बांगलादेश, पाक आणि विंडीज यांचे आव्हान असल्याने या संघाचे आव्हान जवळपास संपुष्टात आल्यासारखे आहे.

Web Title: ICC World Cup 2019: Who has the chance to make the semifinals?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.