बरं झालं रिषभ पंतला वर्ल्ड कपसाठी नाही निवडलं, नाहीतर...

भारताच्या वर्ल्ड कप संघात न झालेला समावेश रिषभ पंतच्या कारकिर्दीसाठी फायद्याचा ठरू शकतो. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 01:52 PM2019-04-16T13:52:56+5:302019-04-16T13:57:36+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Rishabh Pant omission from world cup team may be helpful for his career, read how | बरं झालं रिषभ पंतला वर्ल्ड कपसाठी नाही निवडलं, नाहीतर...

बरं झालं रिषभ पंतला वर्ल्ड कपसाठी नाही निवडलं, नाहीतर...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारताच्या वर्ल्ड कप संघात रिषभ पंत नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.कुठल्याही भारतीय यष्टिरक्षकाला न जमलेला पराक्रम रिषभ पंतनं करून दाखवला आहे.त्यामुळे त्याच्यावर अन्याय झाल्याचं काही जणांना वाटतंय.

२०१९ मध्ये भारतात लोकसभेच्या निवडणुकीत काय होणार, याची जेवढी उत्सुकता देशवासीयांना आहे, साधारण तितकीच उत्कंठा यावर्षी इंग्लंडमध्ये काय होणार याचीही आहे. यंदाचा क्रिकेट वर्ल्ड कप क्रिकेटच्या पंढरीत होतोय. १९८३ मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर भारतानं पहिल्यांदा जगज्जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्याची पुनरावृत्ती विराटसेनेनं करावी, अशी तमाम क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. पण हे 'मिशन' अजिबातच सोपं नाही. एकापेक्षा एक तगडे प्रतिस्पर्धी या रणांगणात उतरणार आहेत. त्यांना टक्कर देऊ शकणारे १५ वीर भारताने काल निवडलेत. अनुभवी शिलेदार आणि नव्या दमाचे भिडू असा समन्वय साधायचा निवड समितीने प्रयत्न केलाय आणि तो बऱ्याच अंशी यशस्वीही झाल्याची चर्चा आहे. पण, या नव्या भिडूंमध्ये एक जिगरबाज युवा खेळाडू नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय. हा तरुण वीर म्हणजे, रिषभ पंत. यष्टिरक्षक म्हणून निवड समितीने महेंद्रसिंग धोनीसोबतदिनेश कार्तिकला पसंती दिल्यानं पंतचं तिकीट कापलं गेलं. पण, 'पंतां'ची निवड वर्ल्ड कपसाठी झाली नाही, हे बरंच झालं. कारण, संघात न झालेला समावेश त्याच्या कारकिर्दीसाठी फायद्याचा ठरू शकतो. 

कुठल्याही भारतीय यष्टिरक्षकाला न जमलेला पराक्रम रिषभ पंतनं करून दाखवला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात शतक झळकावण्याची किमया या तरुण-तडफदार वीरानं केली आहे. हा विक्रम पाहता, इंग्लंडमधील वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रिषभलाच पहिली पसंती द्यायला हवी होती, असं कुणालाही वाटेल. आयपीएलमधील त्याची कामगिरीही दिनेश कार्तिकपेक्षा सरसच आहे. त्यामुळे त्याच्यावर अन्याय झाल्याचं काही जणांना वाटतंय. पण, निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांचं म्हणणं नीट ऐकलं तर, पंतवर अन्याय नाही, तर या गुणवान खेळाडूला न्यायच दिला गेलाय, असं स्पष्ट जाणवतं.


   
टीम इंडियाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीच असेल. त्याला दुखापत वगैरे झाल्यास किंवा तो अनफिट झाल्यास दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळेल, असं प्रसाद यांनी स्पष्ट केलं. धोनी हा संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. यष्टिरक्षणासोबतच संकटसमयी संघाचं रक्षण करण्यात तो 'माही'र आहे. कर्णधार विराट कोहलीसाठीही त्याच्या टिप्स मोलाच्या ठरतात. त्यामुळे सर्व महत्त्वाच्या सामन्यात स्टम्पमागे धोनीच असेल, हे जवळपास निश्चित आहे. म्हणजे, दिनेश कार्तिकला कितपत संधी मिळेल, हा प्रश्नच आहे. अफगाणिस्तानसारख्या तुलनेनं दुबळ्या संघाविरुद्ध धोनीला विश्रांती देऊन कार्तिकचा विचार केला जाऊ शकतो. दिनेश कार्तिक २००७च्या वर्ल्ड कप संघातही होता. पण, त्याला राखीव खेळाडूंमध्येच बसावं लागलं होतं. यावेळी तसं होऊ नये, असं त्याला मनापासून वाटत असेल. कारण, वयाचा विचार केल्यास पुढचा वर्ल्ड कप तो खेळू शकेल का, याचं उत्तर 'नाही' असंच मिळेल. याउलट, रिषभ पंतची बाजू आहे.

कार्तिक आता ३३ वर्षांचा आहे. २००४ मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यामुळे अनुभवाच्या बाबतीत तो पंतपेक्षा उजवाच आहे. रिषभचं वय २१ वर्षं आहे. यष्टिरक्षण आणि फलंदाजीतील त्याचं कसब पाहता, भविष्यात तो धोनीची जागा घेऊ शकेल, असं मानलं जातं. त्यामुळेच त्याला यावेळी वर्ल्ड कपला पाठवायला हवं होतं, अनुभव घेऊ द्यायला हवा होता, असं एक मत आहे. परंतु, खेळायची संधीच मिळणार नसेल, तर त्याला किती आणि काय अनुभव मिळाला असता?

पार्थिव पटेलची निवड २००३च्या वर्ल्ड कप संघात झाली होती. तेव्हा तो १८ वर्षांचा होता. संपूर्ण स्पर्धेत राहुल द्रविडनं यष्टिरक्षण केलं होतं आणि पार्थिवचा फक्त 'दौरा' झाला होता. यावेळी वर्ल्ड कप संघात रिषभ पंतची निवड झाली असती तर कदाचित त्याचंही तसंच झालं असतं. एखाद्या सामन्यात खेळायची संधी मिळाली असती आणि नेमका त्यातच तो अपयशी ठरला असता, तर ते कायमस्वरूपी लक्षात राहिलं असतं. 

त्यापेक्षा, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, हे लक्षात घेऊन येत्या काळात रिषभनं आणखी कसून तयारी करावी. त्याच्याकडे वय आहे, शैली आहे आणि निवड समितीचा त्याच्यावर विश्वासही आहे. त्यामुळे यष्टींमागे धोनीचा वारसदार होण्याची संधी त्याच्याकडे आहे. त्यामुळे यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून त्यानं दर्जेदार कामगिरी करून दाखवावी आणि २०२३च्या वर्ल्ड कप संघात 'फर्स्ट चॉइस' विकेटकीपर म्हणून मानाचं स्थान मिळवावं, याच या उगवत्या ताऱ्याला शुभेच्छा! 


 

 

Web Title: ICC World Cup 2019: Rishabh Pant omission from world cup team may be helpful for his career, read how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.