गोवा महिला संघ देणार ‘गिफ्ट’? बंगालविरुद्ध उद्या विजेतेपदासाठी लढत

गोव्यात सध्या नाताळ सणाची धामधूम आहे. खिसमसला सांताक्लॉज लाडक्यांना ‘गिफ्ट’चे वाटप करतो. गोव्याच्या महिला संघाला आपल्या राज्याला अशीच एक सुवर्णभेट देण्याची संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 09:29 PM2017-12-25T21:29:23+5:302017-12-25T21:29:39+5:30

whatsapp join usJoin us
Goa women team to give 'gift'? Against Bengal, they have to fight for the title | गोवा महिला संघ देणार ‘गिफ्ट’? बंगालविरुद्ध उद्या विजेतेपदासाठी लढत

गोवा महिला संघ देणार ‘गिफ्ट’? बंगालविरुद्ध उद्या विजेतेपदासाठी लढत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- सचिन कोरडे 

पणजी : गोव्यात सध्या नाताळ सणाची धामधूम आहे. खिसमसला सांताक्लॉज लाडक्यांना ‘गिफ्ट’चे वाटप करतो. गोव्याच्या महिला संघाला आपल्या राज्याला अशीच एक सुवर्णभेट देण्याची संधी आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयोजित केलेल्या वरिष्ठ महिला क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या महिला संघाने शानदार प्रदर्शन करीत अंतिम फेरी गाठली. आता उद्या विजेतेपदासाठी त्यांचा सामना बंगालविरुद्ध होईल. या सामन्यात ते विजेते ठरले तर गोव्याच्या क्रिकेटसाठी ती एक ख्रिसमस भेट ठरेल. 
कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स या मैदानावर हा सामना खेळविण्यात येईल. गेल्या सामन्यात विदर्भ संघाचा पराभव करीत बंगालने स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. तर गोव्याने कर्नाटकचा ३ गड्यांनी पराभव केला होता. या सामन्यात सुनंदा येत्रेकरची नाबाद ४७ धावांची खेळी वैशिष्ट्यपूर्ण ठरली होती. संतोषी राणे (११) आणि भारती गावकर (१९) यांचेही योगदान गोव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. इतर फलंदाज जरी अपयशी ठरले असले तरी गोव्याच्या एकमेव सुनंदाने संघाला अंतिम फेरी गाठून दिली. एवढेच नव्हे, तर या कामगिरीच्या आधारावर गोवा संघाने पुढील वर्षी सरळ एलिट गटात प्रवेश निश्चित केला. गोव्याची कर्णधार शिखा पांडे ही या स्पर्धेत फलंदाजीत जरी अपयशी ठरली असली तरी तिने गोलंदाजीत सर्वाधिक १८ बळी घेतले आहेत. सुनंदा आणि शिखा या दोन्ही खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली आहे. सोबत संतोषी राणे, संजुलो नाईक यांनीही योगदान दिले आहे. प्रशिक्षक देविका पळशीकर यांनी संघासाठी खास मेहनत घेतली असून त्यांनी खेळाडूंचा ताळमेळ उत्कृष्टरित्या बसवला आहे. बंगालविरुद्ध सांघिक कामगिरी केल्यास गोवा ऐतिहासिक विजय नोंदवेल, असा विश्वास त्यांना आहे. 

दबाव त्यांचा आमच्यावर नाही : देविका पळशीकर
ईडन गार्डन्स हे बंगालचे ‘होम ग्राउंड’ आहे. घरच्या मैदानावर जिंकण्याची संधी त्यांच्याही पुढे आहे. निश्चितच आमच्यापेक्षा त्यांच्यावर दबाव अधिक असेल. याउलट आमच्या मुलींना अत्यंत मोकळपणाने पण तितक्याच जबाबदारीने खेळ करावा, असे सांगितले आहे. संघाची आतापर्यंतची कामगिरी पाहता कुठल्या तरी एका खेळाडूने पुढाकार घेत जिंकून दिले आहे. इतरांचीही त्याला साथ मिळालीच आहे. संतोषी राणे हिचे पुनरागमन गोव्याच्या संघासाठी महत्त्वपूर्ण आहे. शिखा-संतोषी यांच्याकडे गोलंदाजीची धुरा असेल. संजूल नाईक, शिखा आणि सुनंदा येत्रेकर हे त्रिकूट फलंदाजी सांभाळेल. या तिघींनी ४० षटकापर्यंत खेळ केल्यास संघ १६० हून अधिक धावा गाठेल आणि इतक्या धावा आम्हाला आव्हानासाठी पुरेशा आहेत. आम्ही केरळसारख्या संघाला अवघ्या ५० धावांत गारद केले होते. ईडन खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे गोलंदाजीवरच आमचा भर असेल. परिस्थितीनुसार फलंदाजी क्रमात बदल केला जाईल, असे संकेतही देविका पळशीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. 

झुलन, दिप्तीकडे लक्ष...
बंगालच्या संघात भारतीय संघातील वरिष्ठ महिला खेळाडू झुलन गोस्वामी आणि दिप्ती शर्मा यांचा समावेश आहे. झुलनकडे दीर्घ अनुभव आहे. तर दिप्तीने आतापर्यंतच्या सामन्यात ५०हून अधिक धावसंख्या केली आहे. त्यामुळे या दोघींवर गोव्याच्या खेळाडूंचे लक्ष असेल. दिप्ती शर्मा हिला लवकर बाद करण्याची रणनिती गोव्याने आखली असून ती यशस्वी झाली तर गोवा सामन्यात वर्चस्व गाजवेल. 

आम्ही दुस-यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. या वर्षी प्रशिक्षक देविका पळशीकर हिने खूप मेहनत घेतली आहे. प्रत्येक खेळाडूवर तिचे बारीक लक्ष होते. संघाची चांगली बांधणी केलेली आहे. त्यामुळे आम्ही फायनल जिंकणार असा विश्वास आहे. संघाने आतापर्यंत केलेल्या कामगिरीबद्दल अभिमान वाटतो- विणा फडके, महिला सदस्य (जीसीए).

Web Title: Goa women team to give 'gift'? Against Bengal, they have to fight for the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.